वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र

युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका किंवा अमेरिका या देशाबद्दल न ऐकलेला माणूस या पृथ्वीतलावर आढळणे कठीण आहे. जवळ जवळ प्रत्येकालाच या देशाचे सुप्त आकर्षण असते. अमेरिकेतील अतिप्रगत पायाभूत सुविधा, थक्क करून टाकणारी वैज्ञानिक प्रगती, आंतरराष्ट्रीय राजकारणात दादागिरी करणारे या देशाचे राजकारण, या देशातील मोकळे सामाजिक वातावरण, वैयक्तिक प्रगतीसाठी न संपणाऱ्या संधी व प्रगतीस पोषक असे वातावरण हि यादी न संपणारी आहे.

अमेरिकेला माना अथवा न माना या देशाच्या प्रभावाने आपल्या सर्वांच्याच जगण्यावर परिणाम झालेला आहे. आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तूंपासून आपल्या करमणुकीच्या माध्यमांपर्यंत कुठलाही कोपरा अमेरिकेच्या प्रभावाखाली नाही असे म्हणता येणार नाही. अमेरिकेचे कौतुक करणारा असो वा जगातील प्रत्येक समस्येसाठी अमेरिकेला सतत दोष देणारा असो, अमेरिकेला भेट देण्याची संधी कुणीही नाकारणार नाही.

अमेरिकेला भेट न देताही, चित्रपट व इतर माध्यमांद्वारे आपल्याला अमेरिकेबद्दल बरेच माहीत असते. तिथले रुंद रस्ते, वेगात धावणारी वाहने, सार्वजनिक शिस्त, पोलिसांचा कुशल कारभार, नाइट लाईफ वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष भेट दिल्यावर दिसणारी अमेरिका बरीच वेगळी वाटते. आपल्या देशाने केलेल्या जोरदार प्रगतीमुळे बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटेनासे झालेले आहे. पण तरीही अश्या अनेक साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या अमेरिकन समाजाकडून आपल्या समाजाने शिकायला हव्या. विशेषकरून सार्वजनिक ठिकाणांवरील शिस्तपूर्ण आचरण, सौजन्य, स्वच्छता इत्यादी.  

पण राहून राहून एक  प्रश्न माझ्या मनात येतो की हा देश असा कसा महाबलाढ्य बनला, जगातील इतर नावाजलेल्या देशांपेक्षाही पुढे कसा गेला कारण फार नाही पण अडीचशे वर्षांपूर्वी देश अथवा संस्कृती म्हणून दखल घेण्याजोगे अस्तित्वही नव्हते. सुरुवातीला इंग्रज व पाठोपाठ इतर युरोपियन्स अन मग इतर देशातील लोक येतात काय अन हा देश घडतो अन असा घडतो की अलम दुनिया त्याला सलाम करेल. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी करतोय अन मला जे उमजतंय ते आपल्यापुढे या लेखमालिकेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये आपले सहकार्य फार मोलाचे आहे.

अमेरिका

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एका नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी इंग्लंडमधील साहसी दर्यावर्दींनी अटलांटिक महासागर ओलांडून एका भूमीवर पाऊल ठेवले. अन यातून एका राष्ट्राचा जन्म झाला जे पुढे जगाच्या हेव्याचा अन कौतुकाचा विषय बनले. पण तेथे स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मित्रांशी शत्रुत्व घ्यावे लागले. या नव्या राष्ट्राच्या रहिवाशांनी तत्कालीन महासत्तेविरुद्ध युद्ध छेडले जिची लष्करी ताकद जगात अभेद्य होती.

व्यापाराच्या नव्या संधी शोधण्यासाठी जहाजे भरून व्यापारी अन त्यांचे सवंगडी अटलांटिक महासागर पार करण्यास निघाले. मे १६१० म्हणजे कोलंबस ने अमेरिकन भूमीवर पाऊल ठेवल्याच्या १२० वर्षांनंतरही हा प्रवास अत्यंत धोकादायक होता. अश्याच एका जहाजावर जॉन रॉल्फ नावाचा एक खलाशी होता. २४ वर्षीय जॉन व्यवसायाने शेतकरी होता. अत्यंत महत्त्वाकांक्षी, आत्मनिर्भर अन द्रष्टा असलेला जॉन एक जन्मजात उद्योजक होता. आज ज्या प्रवासाला विमानाने केवळ ६ तास लागतात त्याच प्रवासाला त्या काळात दोन महिन्यांपेक्षाही अधिक वेळ लागायचा. त्या काळातील ७०% खलाशी प्रवासाला निघाल्यापासून वर्षभरातच दगावत असत. पण तरीही हि जोखीम नक्कीच आकर्षक होती कारण उत्तर अमेरिका हि अमर्यादित संधी देणारी भूमी होती.

एक भूप्रदेश जो विपुल साधन संपत्तीने भरभरून होता. सर्वप्रथम बहुमूल्य अशी जमीन जी अर्ध्याहून अधिक घनदाट जंगलांनी व्यापली होती. अन त्या जमिनीवर ६ कोटींहून अधिक संख्येने असलेले बायसन प्राणी. अन त्याहून विशेष म्हणजे अमेरिकन जमिनीच्या पोटात सोने चांदी सारखे मौल्यवान धातू बऱ्याच प्रमाणात असल्याची वंदता होती. हे नवे रहिवासी सोन्याचा मोठा साठा मिळाल्याखेरीज थांबणार नव्हते.

पण जॉन जेव्हा पूर्व किनाऱ्यावरील जेम्सटाउन वसाहतीवर पोचला तेव्हा त्याला तेथील परिस्थिती नरकाहूनही भयंकर वाटली. त्याच्यापूर्वी ५०० हून अधिक लोक तिथे पोचले होते त्यापैकी केवळ ६० जिवंत राहू शकले होते अन मरणाऱ्यांपैकी बहुतांश भूकबळी होते. जॉन रॉल्फ च्या आगमनापूर्वी जे वाचले ते जवळ असलेल्या घोड्यांचे मांस खाऊन एवढेच नव्हे तर चामड्याच्या वस्तू शिजवून त्यावर कशी बशी गुजराण करत होते. जगण्यासाठी करावी लागलेली अमानवी तडजोड म्हणजे एका माणसाने तर आपल्या गर्भवती असलेल्या बायकोला मारले व तिचे मांस खाण्याची तयारी करत असताना इतरांनी त्याला पकडले व या गुन्ह्यासाठी त्याला मृत्युदंड दिला. हि घटना जॉन येण्याच्या ३ महिन्यांपूर्वीची.

सुरुवातीची जेम्सटाउन वसाहत

नव्याने आलेले ब्रिटिश स्थलांतरित या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते. अन कष्टाची कामे करण्याची त्यांची तयारी नव्हती. सोबत मोठा अन्नसाठा आणण्याऐवजी त्यांनी सोने ओळखणाऱ्या रसायनांचा साठा आणला होता ज्याचा उपयोग सुरू करण्याइतकेही सोने त्यांना सापडू शकले नाही. अन हि भूमी त्यांच्यासाठी अजूनही परकीयच होती. जेम्सटाउन वसाहतीची उभारणी स्थानिक नेटिव्ह अमेरिकन्सच्या (Powhatans) साम्राज्याच्या मधोमध झालेली होती. अन्नासाठी तडफडणारे ६० रहिवासी जवळ जवळ २० हजार स्थानिकांनी वेढले गेले होते. नेटिव्हजकडे वेगाने वापरता येतील असे धनुष्यबाण होते. त्या तुलनेत ब्रिटिशांकडे असलेल्या बंदुका फारच वेळखाऊ होत्या. अन लौकरच दोहोंमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. या सर्व परिस्थितीमुळे नव्याने आलेल्या रहिवाशांपुढे जिवंत राहण्याच्या प्रयत्नांखेरीज करण्यासारखे काहीच नव्हते.

जॉन रॉल्फ मात्र सर्वांहून वेगळा होता. तो येथे आल्यावर साधन संपत्ती लुटून पळून जाण्यासाठी आलेला नव्हता. त्याने बरोबर येताना तंबाखूचे बियाणे आणले होते. त्याने तंबाखूची लागवड सुरू केली. त्यापूर्वी दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमध्ये तंबाखूचा प्रसार झाला होता. तत्कालीन तंबाखूंच्या बियाण्यांचा जागतिक व्यापार स्पॅनिश व्यापाऱ्यांच्या ताब्यात होता. थोड्याच कालावधीत जॉनने लावलेले तंबाखूचे पीक हाती आले. त्याने उत्पादित केलेल्या तंबाखूची आजची किंमत १ दशलक्ष डॉलर्स होते यावरून त्याच्या यशाची कल्पना करता येईल.

अन या तंबाखूच्या जोरावर नव्या रहिवाशांनी नेटिव्हांशी मैत्री केली. जॉन रॉल्फने स्थानिक टोळीप्रमुखाच्या कन्येशी (Pocahontas) विवाह केला. साहसी व मुत्सद्दी असलेल्या Pocahontas ने १६०७ मध्ये कॅ. जॉन स्मिथ याचे प्राण वाचवले होते व रहिवाशांना काही वेळा अन्नधान्याची मदतही केली होती. लग्नानंतर काही वर्षांनी तिचे तैलचित्र इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाले. अन या वसाहतीला इंग्लंडमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली. शेक्सपिअरने त्याच्या नाटकातही वसाहतीचा उल्लेख केला. लंडनमधील मोठे गुंतवणूकदार वसाहतीमध्ये नव्या मोहिमांद्वारे गुंतवणूक करू लागले.

Pocahontas

Pocahontas - पारंपारिक वेशात

जॉन व Pocahontas

जॉन व Pocahontas

Pocahontas तिच्या थॉमस या पुत्राबरोबर

Pocahontas व तिचा पुत्र थॉमस

त्यानंतर दोनच वर्षांत वसाहतीतील प्रत्येकजण तंबाखूचे उत्पादन घेऊ लागला अन यामार्गेच जेम्सटाउन ची भरभराट झाली. अजून दोन वर्षांनी हजार नवे रहिवासी आले त्यांनी काही आफ्रिकन गुलामही बरोबर आणले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढे जाऊन या गुलामांपैकी काहींनी तेथे जमीन पण खरेदी केली. पुढील ३० वर्षांत व्हर्जिनिया राज्यात बाहेरून आलेल्यांची संख्या वीस हजारांवर पोचली.

तंबाखूच्या भरघोस उत्पादनामुळे या प्रदेशाची दखल संपूर्ण जगात घेतली जाऊ लागली. पुढील दीडशे वर्षे उत्तर अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या जिन्नसांमध्ये तंबाखू आघाडीवर होता.

सर्व चित्रे जालावरून साभार.

स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.

क्रमशः