श्री संतराम (भाग तिसरा)

                                            सुलक्षणा आलेली देवींना कळलं होतं, पण त्यांनी तिकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. आपणच सुरुवात करावी असं 

वाटून ती चाचरत म्हणाली, " आज्ञा देवी........ " आणि पुढील प्रतिक्रियेसाठी थांबली. न लागलेल्या झोपेतून जाग्या होत देवी म्हणाल्या, "
आलीस ? अशी मंचकाच्या जवळ ये.    " दिवसाचा प्रहर असूनही कक्षात अंधारलेलं वातावरण ठेवण्यात  देवींना चांगलीच रुची असायची. म्हणजे आलेल्या माणसावर दडपण येतं. आणि त्याच्या स्वतःच्या क्षमतेच्या भ्रामक कल्पनेला तडा जातो असलं काहीतरी त्यांचं तर्कट  होतं. ते काही प्रमाणात खरं होतं. सुलक्षणा तशी चांगलीच अनुभवी दासी होती. तरीही देवींच्या  लहरी स्वभावाचं तिला फार  भय वाटे. तितकी ती महाराजांना घाबरत नसे. कारण महाराज विचार करूनच शासन करीत असत.एकदा देवींनी तिच्याकडे आपादमस्तक पाहिलं आणि उठून बसत त्या नाजुक आवाजात म्हणाल्या, " जीव नकोसा झालाय का सुलक्षे ? .... " त्यांना उत्तराची अपेक्षा नव्हती. हे सुलक्षेला लक्षात आलंय  हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. मग त्या म्हणाल्या, "  किती प्रमाद पोटात घालायचे ?(संतराम त्यांच्या कक्षात येणार नसल्याचे  कळल्यापासून त्यांचा ताबा सुटला होता ) काही वर्षांपूर्वी  त्या दोन सरदारांना विषप्रयोग करून नष्ट  करण्याचं साधं  कर्मही  तुझ्याने झालं नाही. उलभोजनाची अशी थाळी तू आमच्या  चौरंगावर  ठेवती झालीस. किस्त्रीचं लक्ष होतं म्हणून बरं  नाहीतर आज तुला शासन करायला आम्ही अस्तित्वातच राहिलो नसतो. ....... " सुलक्षणेने मान अधिकच खाली घातली. यांना बहुतेक महाराज जे काही बोलले ते कळलेलं दिसतय. पण आपण तर त्यांच्या आज्ञेनेच महाराजांकडे गेलो होतो. .... तिची चर्या जवळून पाहत त्या म्हणाल्या, " तुझ्यावर आमचा जीव होता म्हणून प्रकरण महाराजांपर्यंत आम्ही जाऊ दिलं नाही. पण त्यानंतर तुझे प्रमाद वाढतच गेले. इतक्या जर आम्ही तुला नकोश्या झालो आहोत तर तुझे प्राण राहिलेलेच  बरे. "   आता मात्र सुलक्षणेला घाम फुटला. पण कपाळावरचे घर्मबिंदू आणि पाठीवरून कमरेच्या घळीत शिरणारे घामाचे थंड थेंब तिला थोपवता आले नाहीत. अंगाला थरथर सुटली. थोडावेळ दडपण असेच ठेवून देवी  म्हणाल्या, " चल समोरच्या भिंतीतला गुप्त मार्ग उघड आणि कूपाकडे चालू लाग. " असं  म्हटल्याबरोबर सुलक्षणेने त्यांच्या पायांवर लोळण घेतली. त्यांचे पाय अश्रूंनी भिजवीत ती म्हणाली, " देवी आपण मला कारागृहात आजन्म ठेवा पण देहांत शासन देऊ नका. "     असं कोणी  पायावर लोळण   घेऊ लागलं की देवींना राक्षसी आनंद होत असे. वास्तविक पाहता शासन आणि  गुन्हा यांचं प्रमाण अयोग्य होतं. महाराज असते तर त्यांनी त्याचा तौलनिक विचार करूनच शासन केलं असतं. पण त्या देवी होत्या. आणि लहरी आसुरी नंद मिळवण्यात त्यांना  फार सुख वाटे. देवी कुत्सित हसत म्हणाल्या, " सांगितल्याप्रमाणे कर, सुलक्षे. " मध्येच कोणी आलं तर फार बरं होईल म्हणजे तेवढं तरी  जगता येईल असं तिला वाटलं. पण कुणालाही आत येऊन  देण्याची काळजी देवींनी घेतलीच असणार. काही बोलता सुलक्षा उठली.  आणि समोरच्या भिंतीकडे चालू लागली. मंचकावरून उठता देवी म्हणाल्या, " समोरचं गवाक्ष उघड, सुलक्षे. या क्षणीचा प्रकाश एकदा  डोळे भरून पाहून घे. पुढे सगळा अंधकारच आहे. .......... " आज्ञेप्रमाणे सुलक्षेने भिंतीतले  गवाक्ष उघडले. सूर्यनारायण पण क्रोधाविष्ट दिसत होते. तिला आपल्या एकुलत्या एका पुत्राची आठवण झाली. काहीही बोलणं म्हणजे निव्वळ निर्दयपणाला साद घालण्यासारखं होतं. देवींना इच्छा झाली तर त्या स्वतः गुप्त दरवाजा उघडून थेट कूपातही ढकलतील , त्यापेक्षा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तरी करावं. पाषाणासारखे जड झालेले  पाय तिने उचलले आणि भिंतीतली कळ दाबली. एक लहानसा चौकोन उघडा झाला. ज्यातून एकावेळेला एकच माणूस उभा राहून  जाऊ शकेल इतक्या रुंदीचा मार्ग अंधुक दिसू लागला. थोड्यावेळाने डोळे अंधाराला सरावताच खाली उतरणाऱ्या पायऱ्या ज्या एका कूपाकडे वळत होत्या त्या दिसल्या. मागून देवींचा कठोर आवाज आला. " चल हो पुढे. ...... " थंड होणारे निर्जीव पाय   यांत्रिकपणे हालवीत सुलक्षणा आत उतरू लागली. तिचा हात तिच्या गळ्यातल्या चमकणाऱ्या हिऱ्यांच्या माळेवर गेला, जी देवींनीच तिला दिली होती. आता या माळेचा काय उपयोग ? असे म्हणून तिने ती खेचली, आणी हिरा गिळून जीव नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  पण नियतीला देवींची इच्छा पुरी करायची असावी. त्यामुळे एकही हिरा हातात न येता ते सगळेच उड्या मारीत इतः स्ततः   विखुरले गेले.  हे देवींच्या लक्षात आले नाही. सुलक्षणेची निराशा झाली. पण कोणी या मार्गाने कधी गेला तर त्याला हिरे सापडले असते आणि जर ही गोष्ट महाराजांपर्यंत पोहोचली तर केव्हातरी  देवींना काही ना काही शासन झालच असतं. अर्थात तसा तपास झाला तरच ही शक्यता होती. मात्र  सुलक्षणेच्या मनात तसं काही नव्हतं. ............... देवींनी दिवाणखान्यातला एक लहानसा पलिता हातात घेतला व तिच्या मागून उतरू लागल्या. शासनाची तामिली  त्यांच्या समोरच व्हावी असं त्यांना वाटत होतं. ........ दहा बारा पायऱ्या संपल्यावर एक सपाट पण उतरत्या  जागेचं कातळातलं वर्तुळ दिसलं . मध्ये लहान पण खोल असा एक कूप होता. तिथे कठडा नव्हता की खांब. विचार करायला कुठेतरी धरावं लागतं. निदान जिवावरच्या संकटात तरी. तिने परत एकदा प्रयत्न करून पाहिला. पुढचा पाय वर्तुळातल्या  सपाट जागेवर  लगेचच पाऊल ठेवणं म्हणजे मृत्यूला त्वरित आमंत्रण देणं ठरलं असतं. म्हणून सुलक्षणा कातळाच्या भिंतीला पाठीकडून चिकटत सरकत पुढे गेली.  मध्येच थांबून शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या कठोर मुद्रेच्या देवींकडे तिने एकवार पाहिलं. त्यांच्या हातातल्या उंच धरलेल्या पलित्याच्या उजेडात त्यांचा चेहरा तिला एखाद्या रानटी लोकांच्या उग्र रूपाच्या देवी सारखा वाटला. जड श्वासामुळे लहान मोठ्या होणाऱ्या त्यांच्या नाकपुड्या  आणि एकूणच तोंडावरले विकट  सैतानी हास्य त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यांमध्ये उतरलेलं होतं. त्याची पर्वा न करता सुलक्षणेने काकुळतीने म्हटले, " देवी , पाहिजे तर मला 
इथेच बंद करून ठेवा, पण कूपात उडी मारायला सांगू नका. मी आपण म्हणाल तर माझ्या एकुलत्याएक मुलालाही आपल्या सेवेत आजन्म ठेवीन, पण मला मारू नका हो. मला जगू द्या. " ...........        तिथून देवींचे  पाय धरणं तिला शक्य नव्हतं नाहीतर तिने तेही केलं असतं आणि त्यांचे पाय सोडलेही नसते. उत्तरादाखल फक्त देवींची आज्ञा तेवढी बाहेर पडली, " भिंतीचे हात सोड सुलक्षे आणि पुढे वाक "     तिने तसे केले असते  तर तिचे पाय सरकून ती घसरत आपोआपच कूपात ओढली गेली असती. तिने एकवार कूपाकडे पाहिले. पलित्याच्या उजेडात तिला अंधार जास्तच भयावह वाटला. जणू काळ्या शाईनेच कूप भरला असावा असे तिला क्षणभर वाटले. घामाने डबडबलेले अंग फार काळ भिंतीला चिकटून राहिले नसतेच. तरीही जिवाची आशा भयंकर असल्याने तिच्या मनाएक खुनशी विचार आला. देवी तिच्यापासून एक हातच दूर उभ्या होत्या. फक्त थोडं  धैर्य धरून जर देवींचा हात पकडला असता तर त्याही तिच्या सोबत कूपात पडल्या असत्या. तेवढं धैर्य तिला गोळा 
करणं भाग होतं. जणू तिच्या मनातले विचार वाचल्यासारखे करून देवी म्हणाल्या, " दगाफटका करण्याचा विचारही करू नकोस सुलक्षे, चल लवकर आत उडी मार " तरीही तिची तयारी होईना तिने  पुन्हा एकदा कूपाकडे पाहिले. आतला अंधार तिला गिळण्यासाठी आतूर झालेला दिसला. देवी मुद्दामच दोन पायऱ्या वर चढल्या. तरीही सुलक्षा कूपाकडे जाण्यास तयार होईना. मग मात्र  देवींनी हातातला पलिता तिच्या अंगावर फेकला. पलित्याचा प्रहार  चुकवण्याच्या प्रयत्नात सुलक्षेचा तोल जाऊन ती कूपाकडे घसरली. आता गडद अंधार पसरला. पडता पडता तिला मानवी आवाज ऐकू आला तो फक्त देवींच्या विकट हास्याचा ......... त्वरेने वळून देवींनी  वरच्या पायऱ्या काही क्षणांत पार केल्या आणि त्या कक्षात परतल्या. त्यांचाही श्वास वेगाने होत होता. त्याच स्थितीत त्यांनी भिंतीतली कळ दाबली. दगडी चौकोन पुन्हा निर्जीवपणे जागेवर बसला, पुन्हा उपयोगात येईपर्यंत......
                                                      देवी परत मंचकावर बसल्या. का कोण जाणे पण त्यांना सुलक्षेचे शब्द आणि हीन दीन झालेली चर्या आठवू 
लागली. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांकडे त्या पाहत राहिल्या. जणू काही त्या ते प्रथमच पाहत होत्या. मन असं निर्विचार आणि पोकळ का 
झालेलं आहे त्यांना कळेना. कूप तसा भयावह होता. तिथे जायला कुणीही घाबरलं असतंच. असा थोडा लेचापेचा विचार अचानक त्यांच्या मनात आला आणि त्यांना आपल्या मनात दयेचा उदय झाल्याची जाणीव झाली.  मग मात्र त्यांनी तो विचार झुरळासारखा झटकून टाकला. सुलक्षेसारखी  यःकश्चित दासी ती काय , तिचा एवढा विचार करण्याची आपल्याला काय  आवश्यकता असा दांड्गट विचार त्यांच्या मनात आल्या बरोबर त्यांचं मन लवकरच पाषाणासारखे निर्दय झाले. वेळ जावा म्हणून त्या आरशासमोर उभ्या राहिल्या. आरशात चेहरा पाहताच त्यांना शेजारी दुसरा एक चेहरा दिसला. तो होता. सुलक्षेचा. त्या भय वाटून आजूबाजूला पाहू लागल्या. हिचा जीव गेलाय की नाही ? का आपण परत एकदा कूपाच्या तळघरात जाऊन पाहायला हवं . त्यांना खात्री वाटेना. मन असा पर्याय का सुचवतंय ?  त्यांना कळेना.  आजपर्यंत ज्या पुरूषांना यमसदनाला पाठवले त्यांच्या बाबतीत असा विचार कधी आला नाही. फार कशाला त्यांना फेकले तेव्हा सुद्धा त्या  किती शांत आणि 
अविचल होत्या. त्यांना ते सगळं आठवलं. पण सुलक्षेने तर उगाचच मनात प्रवेश केला होता. इतका काय तिचा विचार करायचा. म्हणून त्यांनी स्वतःचं डोकं जोरात हालवलं. तिच्या मुलाला आपल्या सेवेत ठेवणं  म्हणजे स्वतःला न संपणारं शासन करून घेण्यासारखं होतं. फार तर त्याला जगण्यासाठी मदत करायला हरकत नाही . तीही गुप्तपणे. आपलं नाव उघड होणार नाही याची काळजी घेऊनच. मग त्यांनी उगाचच 
पुन्हा चेहरा जवळच ठेवलेल्या तस्तामधल्या गुलाबपाण्याने धुतला. हळुवार पणे पुसला. आज रात्री महाराज कक्षात येणारे होते. सुलक्षेचे कोणतेही चिन्ह इथे ठेवून चालणार नाही हे लक्षात येऊन त्यांनी स्वतःच्या कक्षाची पाहणी केली. 

                                                                                                                                      (क्र म शः)