एक तप मनोगतवर !

    मनोगतावर प्रवेश करून नुकतेच  मी एक तप म्हणजे १२ वर्षे पूर्ण करतोय असे माझ्या सदस्यत्वाकडे लक्ष टाकल्यावर दिसते.तसे पहाता मी मनोगत वर पहिले लेखन मी  ०७/०६/२००६ या दिवशी  केले म्हणजे त्या दृष्टीने माझे एक तप पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही पण सदस्य झाल्यापासून दहा महिने मी काहीच लिखाण केले नाही म्हणजे त्यादृष्टीने मी केवळ नावापुरताच सदस्य होतो, कदाचित त्याकालात काही प्रतिसाद मी नोंदवले असतील.पण पहिले लिखाण चर्चेचा प्रस्ताव स्वरुपात केल्यावर त्याला येणारे प्रतिसाद वाचून लिहावेसे वाटू लागले तत्पूर्वी मी लिखाण केले नव्हते असे नाही.नाझे लेख,कथा काही नियतकालिकातून प्रकाशित झाल्या होत्या पण आपण लिहिलेले कोणी वाचते की नाही व वाचले तरी त्यांचा प्रतिसाद काय आहे हे आजूबाजूला असलेल्या  मित्रपरिवारातून अपेक्षित असले तरी उपलब्ध होत नव्हते त्यामुळे लिखाण प्रसिद्ध झाले तरी प्रतिसादाविना त्यातून मिळणारा आन्ंद तसा अपुराच वाटे. त्यामुळे 'मनोगत'वर काही लिहिल्र की त्यामुळे मिळणारा प्रतिसाद हा प्रकार लिहिण्यास प्रोत्साहित करणारा होता.आजच्या काळातील व्हट्सॅपशी त्याची तुलना होईल.अर्थात तितकी सुलभता प्रतिसाद देण्याची नसल्यामुळे प्रतिसादांची संख्या मर्यादितच असे पण आपले लेखन वाचले जात आहे हा अनुभव आनंददायक होता.त्याबाबतीत एमिली डिकिन्सनचा कित्ता गिरवणे मला शक्य होते व तसे मी बरेच लिखाण "स्वान्तसुखाय" केलेही होते त्याचपैकी बरेच मी मनोगतवर प्रकाशित केले आणि मनोगत ने त्याचे स्वागत केले.   
    त्या उत्साहात अमेरिकेचरील काही अनुभव ''वारी'' या शीर्षकाखाली  लिहिले आणि त्यांस मिळालेला  प्रतिसाद अगदीच दुर्लक्षणीय नव्हता व त्यामुळे व त्याचबरोबर आता लिहिण्याची चटक लागल्यामुळे मी बरेच अनुभव लिहू लागलो पण अचानक त्यास ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली म्हणजे त्या माझ्या लेखनावर अपूर्वाई टाइप लेखन करून स्वत:ला पु.ल.देशपांडे बनवण्याचा (समजण्याचा?) प्रयत्न करत आहे असा टीकात्मक मजकूर दुसऱ्या एका अश्याच मराठी संकेतस्थळावर लिहिला जाऊ लागला हे एक मनोगती श्री ***** यांनी माझ्या निदर्शनास आणले व त्यामुळे माझे अश्या प्रकारचे लेखन थांबवावे की काय असे मला वाटू लागले,पण लिहिण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नसल्याने मी माझे अनुभवकथन तसेच चालू ठेवले व "वारी’चे जवळ जवळ २५ भाग पूर्ण केले .त्याशिवायही अनेक लेख,चर्चा प्रस्ताव ,कथा,काही कवितासुद्धा (तो माझा प्रांत नसताना ) मनोगत वरून प्रकाशित झाल्या . एक मनोगती श्री. विनायक "ज्ञानेश्वरी ' मनोगतवर प्रकाशित करत असताना त्यात घुसखोरी करून माझे ओवीबद्ध रूपांतर प्रतिसादाच्या रूपाने  काही काळ मी मनोगतवर सादर केले.
     "मनोगत" या स्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर वाह्यात लेखनास मज्जाव होता व आहे ही गोष्ट मला फार पटते .त्यामुळे आपल्या लिखाणाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तरी निदान कोणी नावे तरी ठेवणार नाही याची खात्री असे,तसे झाले असते तर माझे लिखाण लगेचच बंद झाले असते.चर्चेच्या प्रस्तावात माझे अनेकांशी तीव्र मतभेद झाले पण सर्वत्र संयत भाषेचाच वापर झाला याला प्रशासकांचा दृष्टिकोण कारणीभूत असावा.याच दृष्टिकोणामुळे व मनोगतींच्या उत्साहदायक प्रतिक्रियांमुळे इतका दीर्घकाळ मी "मनोगत" वर वावरत आहे. त्याबद्दल प्रशासक व मनोगतींचे मनापासून आभार !