सजले अंतर

नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर

वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर
दारी निघताना होती  पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर
काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर 
प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर
मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...
- कुमार जावडेकर