चड्डी आणि भारतीय अर्थव्यवस्था

   (एक अतिशय क्षुल्लक आणि एक राष्ट्रीय महत्वाची अशा दोन गोष्टींची सांगड कशी काय बसते असा प्रश्न शीर्षक वाचल्यावर पडू शकतो )
कधी कधी सौ.च्या दूरदर्शित्वाचे फारच कौतुक करावेसे वाटते. मात्र माझे कौतुक करणे हे सुसरबाई तुझी पाठ मऊ या प्रकारातले असते हा तिचा दावा (किंवा आरोप) ! खरे तर कधी कधी हा शब्दही वापरणे  तसे अयोग्यच ठरेल कारण ती नेहमीच खूप पुढचा विचार करून माझ्या (किंवा कोणाच्याही ) फायद्याचंचं बोलत असते असा तिचा दावा  जो तिच्या समोर तरी अमान्य करणे मला शक्य (आणि योग्यही) नसते. तरीही असे कौतुक खरोखरच करावे वाटण्याचे कारण जो निष्कर्ष परवाच एका वाहिनीवरून प्रसारित झालेल्या बातमीतून निघत आहे तो तिला फार पूर्वीपासून लक्षात आला  होता हे माझ्या निदर्शनास आले हे ! त्या बातमीनुसार भारतीय अर्थकारणाचा आणि भारतातील सर्व पुरुषांचा (ज्यात मीही आलोच ! )प्रत्यक्ष संबंध आहे. !. नेहमीच वाहिन्यावर प्रसारित होणाऱ्या बातम्या  ऐकून पण फारश्या अंगाला लावून न घेता मी सोडून देतो पण या बातमीत प्रत्यक्ष माझ्या अंगाचाच संबंध असल्यामुळे ती अंगाबाहेर टाकणे मला शक्य नव्हते. या बातमीचा माझ्या क्रयशीलतेशीही संबंध होता (किंवा आहे असेही म्हणता येईल).
      लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला तिच्या वडीलधाऱ्यांकडून मिळणाऱ्या "अखंड सौभाग्यवती भव" याबरोबरच "अखंड क्रयवती भव" असा आशीर्वादही आमच्या सौ.ला मिळाला असावा. हल्ली अश्या आशीर्वादासाठी वाकणाऱ्यांची आणि त्यामुळे देणाऱ्यांची संख्याही घटत चालली आहे.(त्यातले एक कारण "अष्टपुत्रा सौभाग्यावती भव "असा आशीर्वाद बऱ्याच  जणांनी आचारात आणल्यामुळे झालेले गंभीर परिणाम ? पण असा आशीर्वाद न मिळताही आचरणात आणणारे अजूनही काही आहेतच असो!)  तिची लहानसहान खरेदी सदैव चालू असते बरीच खरेदी अमेरिकेला जाताना बॅगा भरतानाच किंवा अचानक घरी येणाऱ्या नव दांपत्याच्या किंवा अश्याच एकाद्या नात्यातील बालकाच्या हातावर ती एकादी वस्तू ठेवते तेव्हांच मला समजते. तरीही अमेरिकेला जाताना मला अनेक वस्तू माझ्यासाठीही खरेदी करण्याची आज्ञा ती करते इतकेच  काय  माझ्यासाठी खरेदी करण्याचीही तयारी दाखवते ,त्याचा मला राग येतो ! त्याचे मुख्य कारण : त्या खरेदीत ती माझ्या चड्ड्या व बनियन यांचाही समावेश करत असते.  तरीही हिला काय करायचेय माझ्या नको त्या गोष्टीत लक्ष घालून असा त्रागा न करता  "येवढी काय आवश्यकता आहे ?" असा सूर मी काढताच त्या विषयावरील तिचे स्पष्टीकरण ऐकल्यावर जगातील सर्व पुरुष जातींविषयी जणु ती बोलत असते हे लक्षात येते आणि त्या बातमीमागील अर्थ(शास्त्र) ध्यानात घेता ही गोष्ट इतक्या पूर्वीच तिला सुचली होती याबद्दल तिचे कौतुक करावे वाटते.
      ती बातमी भारतीय अर्थव्यवस्था मंदावत असण्याविषयी आहे.अर्थात अर्थव्यवस्थेचे हे निदान एके काळचे अर्थमंत्री पी चिदंबरम् यांना योग्य वाटले तरी बऱ्याच मनोगतींना (विशेषत: नमोगतींना)पटेलच असे नाही. घरातील जीवनावश्यक खरेदीपैकी दररोज वा क्वचित एक दिवसा आड आणाव्या लागणाऱ्या अर्धा लिटर दुधापलिकडे आर्थिक व्यवहार न करणाऱ्या मला तर देशाच्या आर्थिक स्थितीविषयी बोलण्याचा अधिकारच पोचत नाही.त्यामुळे ही बातमी उद्धृत करण्यापुरताच माझा सहभाग आहे असे मी (तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता च्या थाटात) म्हणू शकतो.पण माझ्या बायकोचा विचार मात्र केवळ माझ्यापुरता मर्यादित नसून भारताची अर्थव्यवस्था सुधारणे इतक्या महत्वाच्या विषयाची दखल घेणारा होता हे त्या बातमीमुळे मला आत्ता समजतेय.
     त्या बातमीनुसार पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या खपाचा राष्ट्राच्या  आर्थिक स्थितीशी प्रत्यक्ष संबंध आहे. .भारतात हा खप कमी होत आहे.  माजी
 US Federal Reserve Board Chairman ग्रीनपीस यानी पुरुष अंतर्वस्त्रांबाबतीत  
Men's underwear Growth Index हा सिद्धान्त इ.स.१९७० इतक्या पूर्वी मांडला आहे. त्या सिद्धांताच्या प्रकाशात   भारताची अर्थव्यवस्था उतरणीस लागली आहे.असा निष्कर्ष ग्रीनपीस यांनी काढला आहे. कारण या सिद्धांतानुसार कोणत्याही देशातील पुरुषांच्या अंतवस्त्रांचा खपावरून त्या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज करता येतो. जून २०१९ पर्यंतच्या तिमाहीत भारतात पुरुष अंतर्वस्त्राच्या खपात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत:: या दहा वर्षातील हा सर्वात कमी खप आहे. जॉकी ब्रॅन्डचा खप  या वर्षी फक्त २% नी वाढला व या दशकातील ही सर्वात कमी वाढ आहे.तर डॉलर व व्ही.आय.पी. ब्रॅन्डच्या अन्तर्वस्त्रांचा खप अनुक्रमे ४% व २०% नी घटला आहे.लक्स चा खप अगदी नसल्यातच जमा आहे. (Ref:Economic Times Indian Times.com ),  
      आता प्रश्न उद्भवतो की अन्तर्वस्त्रांचा विचार करताना  फक्त पुरुषांचीच का स्त्रियांची का नाही ? यावर विचार करता मलाच असे जाणवले की  अंतर्वस्त्रात काय किंवा  एकूणच वस्त्रात काय काटकसर करणे पुरुषालाच शक्य असते. (बाह्य वस्त्रात बऱ्याच स्त्रिया अलीकडे खूप काटकसर करताना दिसतात ते वेगळे ) पुरुषांना त्याबाबतीत आदर्श समर्थानीच घालून दिला आहे.  इतक्या पूर्वीचे कशाला अगदी चाळीस
पन्नास  वर्षापूर्वी मातृभोजनासाठी कोणाच्याही मुंजीत मुंजे म्हणून जेव्हां आम्हाला निमंत्रण असे तेव्हां बरेच मुंजे  अगदी फक्त लंगोट्या लावून येत असत.तशी अंतर्वस्त्रासाठी होजिअरी वापरण्याची चैन अलीकडल्या काळातीलच नाहीतर पैलवानी लंगोट हीच पुरुषाच्या अंतर्वस्त्राची परिसीमा होती.बनियन सुद्धा कापडी (त्यास कोपरी किंवा बंडी असे गावाकडे म्हणतात ) वापरण्याची पद्धत काही ठिकाणी अजूनही रूढ आहे.याउलट स्त्रिया बाह्यवस्त्रात कदाचित काटकसर करत असतील आणि ते फॅशनचे लक्षणही मानावे लागेल पण अंतर्वस्त्राबाबतीत पुरुषांवर मात करणे त्यांना शक्य नाही हे निश्चित !
           खरे पाहता पुरुष बालकाच्या हव्यासापोटी भारतातील अनेक राज्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण घटत आहे म्हणजे एकूणात त्यांच्या अंतर्वस्त्र खरेदीचा खप कमी व्हायला हवा पण परिस्थिती उलटी असेल तर खरे म्हणजे एकूणच वस्त्रखरेदीबाबत---- त्यातही अंतर्वस्त्राबाबतीत तर अधिकच ----पुरुष पूर्वीपेक्षाही उदासीन किंवा काटकसरी बनत चालले आहेत असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल  या परिस्थितीला आणखी एक बाब कारणीभूत आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण ! ते वाढत असल्याने व (माझ्यासारख्या)ज्येष्ठ नागरिकांना एकूणच कपडे खरेदी करण्यात फारसा रस नसल्यामुळे आणि अंतर्वस्त्रे तर इतरांना दिसतही नसल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वापर करूनच त्याना मोडीत काढणे शक्य होत असल्यामुळे---त्यांच्या खरेदीचे प्रमाण आणखीनच कमी होणे स्वाभाविक आहे त्यामुळे त्या घटनेचा एकदम देशाच्या आर्थिक परिस्थितीशी संबंध लावणे कितपत योग्य ठरेल शंकाच आहे. पण तसा असेल तर त्यासाठी माझ्या पत्नीचा ( नवऱ्याला अधिक अंतर्वस्त्रे  खरेदी करण्याचा आग्रह धरण्याचा )आदर्श सर्व बायकांनी ठेवणे इष्ट म्हणजे तरी  आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी असा निष्कर्ष  काढता येणे शक्य होणार नाही.