रोमन हॉलिडे (१९५३)
आज सकाळीच मित्राचा फोन आला. दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देऊन झाल्यावर कुठे जाणार आहेस दिवाळीत असं मी त्याला विचारलं तर युरोपची ट्रीप करणार आहे आणि रोमला जास्त दिवस राहणार आहे असं त्यानं सांगितलं. रोम मध्ये जास्त दिवस का असं त्याला विचारताच प्रिन्सेस अँन आणि ज्यो ब्रॅडली यांना भेटून येतो असं तो म्हणाला आणि, व्वा लेको, तुझी इच्छा सफळ होऊ दे, मी इथेच त्यांना रोमला न जाताच भेटतो असं म्हणताच मी येतोच तुझ्याकडे आता त्यांना भेटायला असं हसत म्हणाला आणि निरोप घेतला.
रोमन हॉलिडे बद्दल काय सांगावं..! अतिशय तरल अशी एक आंबटगोड प्रणयकथा. प्रिन्सेसच्या प्रेमात ज्यो ब्रॅड ली काय आपणही पडतोच. मी हा सिनेमा किती वेळा पाहिला असेन याची गणतीच नाही परंतु प्रत्येक वेळी काहींना काहीतरी नवीन सापडतं. प्रिन्सेसचा गोड निरागस चेहरा नजरेसमोरून हटत नाही. तिचा पहिलाच सिनेमा पण काय चमक दाखवली आहे तिने! कुलीन, सालस, मर्यादशील, विचारी, विनयशील, विवेकी, शालीन, नम्र, मोहक, मनोहर, डौलदार, आकर्षक, सुंदर...., किती विशेषणं लावावीत! एकाच वेळी ऐश्र्वर्यशाली असण्याचा आणि क्षणात भाबडेपणा दाखवण्याचा उत्तुंग अभिनय कारकिर्दीतील पहिल्याच चित्रपटात प्रिन्सेस अँन ( ऑड्रे हेपबर्न ) करते तेंव्हा दर्दी रसिकांना कळतं की ऑड्रे नक्कीच ऑस्कर मटेरियल होणार आहे. ज्याच्यावर प्रेम बसलय तो पाठमोरा होऊन निघून जात असताना तिचा दुःखी झालेला चेहरा आणि जेंव्हा तिला स्वतःला उमगतं की या माणसावर आपलं मन जडलय तेंव्हा तिचा आनंदाने उत्कट झालेला चेहरा हे दोन्ही मुद्राभिनय तिने अशा संयत प्रकारे केलंय कि या अभिनयाच्या राणीचं कौतुक करायला शब्दच थिटे पडावेत, आणि ते ही तिच्यासमोर
ज्यो ब्रॅडली ( ग्रेगरी पेक ) असा अनुभवी तगडा आणि आयकॉनिक अभिनेता असताना!
ग्रेगरी पेक यांच्या अभिनयाबद्दल काय लिहावं... "टू किल अ मॉकिंगबर्ड" ज्यांनी पाहिलाय त्यांना नक्कीच कळेल कि ग्रेगरी पेक कोण आणि काय होते ते. प्रिन्सेस अँनच्या मूक प्रेमाला संमती देऊन आपण राजे म्हणून मिरवावे कि हे क्षणिक प्रेम विसरून जाऊन आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहावे या प्रश्नावर होणारी मानसिक घालमेल दाखवणे आणि तेही संयत स्वरूपात हे अशा अभिनयाच्या बादशहाला जमणारच होतं. तिला पाठमोरा होऊन लांब पावलं टाकत जाताना त्याचा जो हार्ट ब्रेक झालाय तो त्यानं त्याच्या केवळ चालण्यातून व्यक्त केलंय! अर्थात तिच्यापासून दूर होण्याचा निर्णय त्याच्यासारखा सभ्य आणि सुसंस्कृत माणूस घेणारच होता यात काय संशय.
रोमन हॉलिडे हा असा गोड सिनेमा आहे की नजरेनी हजार वेळा सेवन केलत तरीही तुम्हाला मधुमेह होणार नाही याची खात्री बाळगा. हा सिनेमा विनोदी आहे पण आचरट नाही, याला चाफ्याचा सुवास आहे पण याचं निर्माल्य होत नाही.
ह्या दोन अभिनेत्यांसोबत अजून एक पात्र आहे. ते या चित्रपटात कमालीचं काम करतेय. वेस्पा स्कूटर! चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वेस्पाची विक्री एवढी तुफान झाली कि कंपनीनं आपलं स्कूटरचं उत्पादन चरम सीमेवर नेलं होतं. या व्हेस्पा सोबत रोम शहर एवढं सुंदर कधीच भासलं नाही.
हा सिनेमा पाहिल्यावर एकदातरी प्रेमात पडावं असं वाटल्याशिवाय राहणार नाही, मग त्या प्रेमाचा अंत जरी कायमचा विरह असला तरीही. चित्रपटातला शेवटचा प्रसंग ज्यात ज्यो ब्रॅडली प्रिन्सेसला नजरेनं सांगतोय कि तिचा त्याच्यावरच्या असणाऱ्या विश्वासाला तो कधीच तडा देणार नाही तेंव्हा असं वाटतं कि प्रेमात पराभव झाला तरीही बेहत्तर पण कधी प्रेम केलंच नाही असं व्हायला नको ह्या उक्तीला त्यानं अगदी मूर्त स्वरूप दिलंय. ज्योनं तिला एकदा म्हंटलंच होतं कि " आयुष्य आपल्याला हवं तसं असतंच असं नाही अँन..."
सुरूवातीला कॅरी ग्रँट या अभिनेत्याला ज्यो ब्रॅडलीची भूमिका देऊ केली होती पण त्यानेच ती ऑड्रेसमोर तो अगदी वयस्कर वाटेल म्हणून नाकारली. ग्रेगरी पेक यांनी होकार दिला आणि तिला अकॅडमी अवार्ड मिळेल हे भाकीत वर्तवलं. तिच्या अभिनयाची चुणूक बघून त्यांनी निर्मात्याला " इन्ट्रोड्यूसिंग ऑड्रे हेपबर्न " ही ओळ काढून टाकण्यास सांगितले आणि आपल्या बरोबरच तिचं नाव टाकावं असं सांगितलं.
ऑड्रे हेपबर्नला अकॅडमी अवार्ड तर मिळालाच शिवाय गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा अवार्ड ही मिळाला.
संपूर्ण चित्रपटात एकमेकांनी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हंटलं नाही. त्यांना "आय लव्ह यू" म्हणायची गरज भासलीच नाही. काश्मीर की कली मध्ये शर्मिला टागोर म्हणते ना...." मुहब्बत जो करते हैं, मुहब्बत जताते नहीं.. धड़कने अपने दिल की कभी.. किसी को सुनाते नहीं, मज़ा क्या रहा जब की खुद कर लिया हो मुहब्बत का इज़हार अपनी ज़ुबां से.." अगदी तसं. या ओळी ऐकल्यानंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हातात गुलाब घेऊन आय लव्ह यू म्हणायचं कि " सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा..." ऐकवायचं हे ठरवावं लागेल.