कोठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर भाजपची अवस्था "दैव देते आणि कर्म नेते" अशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या , महापुराचे थैमान अश्या आपत्ती आल्या असूनही जनतेने "दगडापेक्षा वीट मऊ" असा विचार करून युतीला अगदी काठावरचे नसले तरी राज्य चालवण्याजोगे बहुमत दिले होते. शिवसेनेने मुख्य मंत्रीपदाचा आग्रह धरला नसता तर सर्व काही बऱ्यापैकी सुरळीत झाले असते. भाजपला अगदी १२० जागा मिळाल्या असत्या तरी शिवसेनेस बाजूस सारून त्यानी १४५ चा आकडा गाठला असता. तरीही देवेन्द्रजी "मी पुन्हा येईन हे कश्याच्या आधारावर म्हणत होते हे कळणे अवघडच आहे. काँग्रेसमुक्त भारत अशी प्रतिज्ञा केलेल्या भाजपाला साथ देऊन स्वतःचे आणखी खच्चीकरण करून घेण्याची तयारी आता तरी कॉंग्रेस दाखवील अशी मुळीच शक्यता नव्हती. शरद पवार यानी अगोदरच विरोधी पक्ष म्हणून काम करू असे जाहीर केले होते पण त्तो त्यांचा कात्रजचा घाट असेल आणि ते पुन्हा आपल्याला वश होतील अशी आशा भाजपला असावी.यामुळे काही अपक्षांच्या जिवावर आपण बहुमत प्राप्त करू अश्या दिवास्वप्नात गुंग राहून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरले नव्हते येवढाच राग फक्त फडणीस आळवत राहिले . आश्चर्य म्हणजे त्या काळात ज्या अमित शहांच्या आश्वासनाचा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सारखा पुनरुच्चार करत होते ते अमित शहा अगदी चुप होते जेव्हां महाशिवयुती होण्याची शक्यता दिसू लागली तेव्हा त्यानी असे काही ठरले नव्हते अश्या अर्थाची पुटपुट केली एवढेच !.आपापल्या आमदारांना अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवून ते फुटणार नाहीत याची पुरेपूर काळजी शिवसेना , कॉंग्रेस व राष्ट्रवादी यानी घेतली असता भाजपाला सरकार बनवता येणे हे केवळ काही चमत्कार घडला तरच शक्य होते आणि तसा चमत्कार घडलादेखील ! त्यादिवशी आमच्यासारख्या आशावादी जनतेला वाटलेही खरच भाजपातील चाणक्यांनी आपली करामत दाखवली आणि तो एक दिवस आम्ही फारच आनंदात घालवला. पण हा फुगा केवळ ७८ तासातच फुटला कारण न्यायालयानेच त्याला टाचणी लावली. अजूनही देवेंद्रजी सहा महिन्यानंतर चमत्कार घडवण्याची आशा करत आहेत आहेत. पाहूया त्यांचा आशावाद किती सत्यात उतरतो ते , त्यासाठी त्यांना शुभेच्छा !
.