प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट: 'चंडिगढ अम्रितसर चंडिगढ', एक (पुनर्निमित) पंजाबी चित्रपट

'मुंबई पुणे मुंबई' नावाचा एक मराठी चित्रपट आहे. विसविशीत कथा, विनोदनिर्मितीचा कुंथून कुंथून केलेला प्रयत्न, कॅमेऱ्याची गरजेबाहेर फिरवाफिरवी, मुलीने मुलाला 'आर यू अ व्हर्जिन' हा प्रश्न विचारला की स्त्रीमुक्ती झालीच हा 'पुरोगामी' अभिनिवेश...

प्रथेप्रमाणे त्याचे भाग २, भाग ३ असे जास्तीजास्ती असह्य भागही आलेले आहेत.

थोडक्यात काय, एक नेहमीचा मराठी चित्रपट. निर्माता पैसे खर्च करायला तयार असला की भिकार भुक्कडांची मांदियाळी जमवायला वेळ लागत नाही याची प्रचीती देणारा. एक निर्माता शहाणा होईस्तोवर दुसरा तयार असतो. भाग २ आणी भाग ३ साठी अर्थातच दुसरा आणि तिसरा निर्माता. असो.

याच दिग्दर्शकाने हा चित्रपट हिंदीतही मुंबई दिल्ली मुंबई या नावाने केल्याचे कळाले. निर्माता अर्थातच चौथा. हा चित्रपट येऊन गेला यापलिकडे त्याबद्दल लिहिण्यासारखे काही नाही.

या पार्श्वभूमीवर चंडीगढ अम्रितसर चंडीगढ हा पंजाबी चित्रपट दिसला तेव्हा मूळ चित्रपट माहीत असल्याने हाही कळेल अशा साध्या भावनेने तो पहायला घेतला. [शुद्धलेखनाचा झटका आलेल्यांसाठी - चित्रपट पंजाबी आहे, त्यामुळे पंजाबी उच्चार तसाच ठेवला आहे. तो मान्य नसेल तर दुसरा पंजाबी उच्चार 'अंबरसर' घ्या नि पुढे व्हा]

अवांतर - पैंजण नामक मराठी चित्रपट पंचवीसेक वर्षांपूर्वी आला होता. तो चित्रपट म्हणजे एका मल्याळी चित्रपटाचे मराठीकरण होते. मराठी दोनपाच टक्क्यांपेक्षा जास्ती समजत नसलेल्या आणि मूळ मल्याळी चित्रपट बघितलेल्या एका मल्याळी मित्राने तो चित्रपट माझ्याबरोबर मजेत बघितला. तीच मजा आपणही अनुभवावी म्हणून चित्रपट बघायला सुरुवात केली.

आणि सुखद आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसले. चित्रपट नाव घेऊन पुनर्निर्माण आहे (श्रेयनामावलीत तसा स्पष्ट उल्लेख आहे). पण मूळ पटकथेतले पोकळ भाग नीट भरून काढले आहेत. मूळ पटकथेत नायिकेच्या फोनची बॅटरी मरते. पुण्यात तिला कॉफी पाजणारी, तुळशीबागेत नि लोहगडावर घेऊन जाणारी व्यक्ती भेटते पण सेलफोनचा चार्जर मात्र अख्ख्या पुण्यात कुठेही मिळत नाही. पंजाबी चित्रपटात नायिकेचा फोन ('व्हायब्रेट मोड'वर असलेला) सायकल रिक्षात विसरतो आणि एक वेगळीच गंमत सुरू होते. असा सगळ्या पटकथेवरून एक नीट हात फिरवून घेतलेला आहे.

नायकाच्या भूमिकेत जिप्पी (रुपिंदर सिंग) ग्रेवाल. हा एक पंजाबी गायक-नायक. त्यामुळे या(ही) चित्रपटात त्याला स्व-आवाजातली गाणी आहेत. ही पंजाबी चित्रपटांतील एक लोकप्रिय गोष्ट दिसते. दिलजीत दोसांझ हाही असाच एक पंजाबी पॉप गायक नि नट. असो. तर जिप्पी ग्रेवाल इथे दाढी-फेटाधारी शीख नायक आहे. कुठलाही अभिनिवेश न आणता सहज वावर आणि निर्मळ भोळा चेहरा. याच्या नादाने मग अनेक पंजाबी चित्रपट पाहिले.

नायिकेच्या भूमिकेत सरगुन मेहता. ही मूळची टीव्हीवाली. त्याआधी बीकॉम केलेली. कुठल्याही नाट्य/अभिनय प्रशालेशी संबंध न आलेली. दहाबारा चित्रपटांतूनच (सगळे पंजाबी) कामे केलेली. अत्यंत मोहक, पण तेवढ्यावरच थांबली आहे (कथा आणि भूमिका). उथळ/उठवळ अजिबात नव्हे. एक गंमत म्हणजे नायिका म्हणून पहिला चित्रपट करण्याच्या दोन वर्षे आधीच लग्नबंधनात अडकलेली. लग्न झालेल्या नायिका जनतेला चालत नाहीत असा एक प्रवाद आहे म्हणून गंमत वाटली. हिने मोहकपणाच्या जोडीला संयत अभिनयाचा वस्तुपाठच घालून दिला आहे.

राजपाल यादवचे पात्र मूळ कथेत नाही. इथे ते आणून अंबरसरमधले बिहारी सायकल रिक्षावाले हा एक वेगळाच पैलू कथेला जोडला आहे.

तसेच मूळ कथेत नसलेले कलम म्हणजे नायिकेच्या माजी बॉयफ्रेंडचे पात्र अम्रितसरमध्येच राहते असे दाखवले आहे.

एकूण, एक अत्यंत प्रेक्षणीय चित्रपट. प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट या ओळी सार्थ करणारा.