इनसाईड एज - एक प्रगल्भ होत गेलेली वेब मालिका

चारेक वर्षांपूर्वी वेबमालिका आपल्या (किमान माझ्या) जाणीवांत अवतरल्या.

दूरदर्शनवरच्या मालिका येऊन आता पस्तीसहून जास्ती वर्षे होऊन गेली. पहिल्या पाचदहा वर्षांनंतर त्या मालिका बेचव होत गेल्या. आठवड्याला एक ते आठवड्याला पाच अशी पाचपट फुगल्यावरही बेडकाचा बैल कसा होणार? तरीही अट्टहासाने मालिका बघत राहणाऱ्या लोकांना आंबोण घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाउसेसचे कारखाने सुरू राहिले.

रिऍलिटी शो या नावाने एक वेगळा धुमाकूळ सुरू झाला. त्यात अर्थ शोधणारी आणी त्याचेही व्यसन लावून घेणारी मंडळीही भरपूर निघाली.

थोडक्यात, कुठल्याही उपगल्लीतल्या हळदीकुंकवालासुद्धा 'टीव्हीस्टार' असे बिरूद लावणारी मंडळी 'विशेष पाहुणे' म्हणून येऊ लागल्याचे ठिकठिकाणच्या फ्लेक्सवरून कळू लागले.

एवढा बेडौल पसारा मांडूनही 'टी आर पी' नावाच्या एका अमूर्त संकल्पनेमुळे प्रॉडक्शन हाउसेसकडे पैशाचा ओघ वाढत गेला. त्या वाढत्या ओघाला पाहून त्याहून जोमाने या क्षेत्रात शिरू पाहणाऱ्यांची संख्या वाढू लागली.

वेबमालिका या अवतरण्याचे मुख्य कारण म्हणजे हे अर्थकारण. या ओघात हात घालून आपल्याही ओंजळीत धनसंचय करावा म्हणून नवनवीन मंडळी आंतरजालाचा सहारा शोधू लागली. आता टीव्हीची गरज संपली. लॅपटॉप आणि नंतर मोबाईल यावरच सगळी दृक-श्राव्य माध्यमे ओसंडून वाहू लागली.

अवांतर: आठेक वर्षांपूर्वी हा प्रकार भारतात आलेला नव्हता. तेव्हा मला काही काळ कामानिमित्त हाँगकाँगला राहावे लागले. तिथल्या 'एमटीआर' (ट्यूब, उपनगरी रेल्वे) मधून रोज प्रवास करताना प्रत्येक व्यक्ती कानात बोंडके घालून खाली मान घालून मोबाइलकडे एकटक पाहत आहे हे दृश्य गमतीदार वाटले. तोवर मला मोबाइलवर ईमेल बघता येते एवढीच ज्ञानप्राप्ती झालेली असल्याने 'एमटीआर'मधून जातानाही सतत "काम करणाऱ्या" या मंडळींबद्दल मला आदर वाटला होता. 'किती ही प्रगती, इथेच तर इंडिया मार खाते' असे विचारही तरळून गेल्याचे आठवते. आता ही 'प्रगती' आपल्याकडेही आल्यामुळे मी (मार खाऊन) गप्प आहे. असो.

सुरुवातीला हिंदी वेबमालिकांना आपली जागा सापडण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवणे गरजेचे होते. 'वेबमालिकांना सेन्सॉर नाही' ही बाब त्यांनी वापरली. अगदी जोरात वापरली. 'सॉफ्ट पॉर्न' श्रेणीतील अनेक कार्यक्रम (मस्तराम, कविता भाभी इ इ) एम एक्स प्लेअरसारख्या मोफत प्लॅटफॉर्मवरून ओसंडू लागले. ज्यांना थेट नागडे व्हायचे नव्हते अशा मंडळींनी आडून आडून (हिंदी चित्रपटसृष्टीतला पन्नास दशके जुना वाक्प्रचार वापरायचा झाला तर 'कथानकाची गरज म्हणून') नग्नता, शारीरिक आणि भाषिक हिंसा यांचे मिश्रण थापायला सुरुवात केली.

यात एरवी संयत भूमिका करण्याबद्दल माहिती असलेली मंडळीही सामील झालेली दिसल्यावर हताश व्हायला झाले. पंकज त्रिपाठी हा एक गुणी नट. पण त्याच्या नावाला भुलून 'मिर्झापूर' नावाची वेबमालिका पाहायला सुरुवात केल्यावर 'अरे वा' चे 'अरे देवा'मध्ये रूपांतर झाले आणि दोनतीन भागांतच सहनशक्ती संपली. रिचा चढ्ढा ही 'तमंचे' या चित्रपटातल्या भन्नाट कामामुळे नजरेत भरली होती. 'तमंचे'च्या दोन वर्षे आधीच आलेला 'गॅंग्ज ऑफ वासेपूर'मध्येही ती होती हे नंतर समजले.

'गॅंग्ज ऑफ वासेपूर' हा चित्रपट वेबमालिकांचा आदर्श म्हणायला हरकत नाही. हिंसा, शिवीगाळ नि नग्नता यांचे यथायोग्य मिश्रण. पण चित्रपट म्हणून तो फार चालला नाही. मनोज बाजपेयी, रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दिन सिद्दिकी, रीमा सेन, पियुष मिश्रा, जयदीप अहलावत, जमील खान, हिमा कुरेशी अशी मांदियाळी असूनही. या चित्रपटाला आलेल्या सेन्सॉर बोर्डच्या प्रमाणपत्राची आणि चित्रपटगृहाची गरज या दोन अडचणी वेबमालिकांना नसल्याने वेबमालिका बोकाळल्या.

रिचा चढ्ढाच्या नावाला भुलून 'इनसाईड एज' ही वेबमालिका बघायला सुरुवात केली. चांगल्या कलाकारांची मांदियाळी जमवलेली होतीच. पण भाषिक हिंसा आणी उत्तान नग्नता फारच बटबटीत वाटली. अखेर "नाईलाजाचा नाईलाज झाल्याखेरीज चित्रपट, पुस्तक, खाद्यपदार्थ आणि दारू अर्ध्यातून सोडायची नाही" या तत्त्वामुळे 'इनसाईड एज १' या नावाखालचे सगळे भाग बघून टाकले.

विवेक ओबेरॉय बऱ्याच कालावधीनंतर पाहिला. रिचा चढ्ढाला उत्तानतेच्या अंगणात निर्लज्जपणे बागडावे लागले. पण तनुज वीरवानी, सिद्धांत चतुर्वेदी, अंगद बेदी, सायनी गुप्ता, संजय सुरी, जितिन गुलाटी या मंडळींनी लक्ष वेधून घेतले. तनुज वीरवानीलाही उत्तानतेच्या अंगणात थोडे नाचायला लागले, पण एरवी त्याने चांगले काम केले. तो रती अग्निहोत्रीचा मुलगा हे नंतर समजले. तसेच अंगद बेदीने अत्यंत सुंदर वठवलेली क्रिकेट कॅप्टनची भूमिका भावल्यानंतर तो बिशनसिंग बेदीचा मुलगा हे कळाले. मनू रिषी चढा हा 'दूर के दर्शन' या नितांतसुंदर कॉमेडी चित्रपटातून लक्षात राहिला होता. इथेही त्याने फार चांगले काम केले. अमित सयाल हाही एक गुणी नट छाप पाडून गेला.

कोव्हिडकाळातल्या दुष्काळात फडताळे धुंडाळताना 'इनसाईड एज २' आहे हे समजले. त्यात आमिर बशीर आहे हे कळाल्यावर उडीच मारली. 'अ वेडन्स्डे'मधला एक पोलिस इन्स्पेक्टर (दुसरा जिमी शेरगिल) म्हणून तो अनुपम खेर - नसिरुद्दिन शाह जोडगोळीसमोरही छाप पाडून गेला होता. नंतर 'गुडगांव' (हे चित्रपटाचे नाव आहे; भक्तमंडळींनी 'गुरुग्राम' असे वाचावे) या गडदकाळ्या चित्रपटातही तो लक्षात राहिला. आणि 'फ्यूचर तो ब्राईट है जी' या भेदी नावाच्या कॉमेडीत तर त्याने धमालच उडवली. शिवाय विद्या माळवदे आणि एली आवराम ह्या दोन 'आय कॅंडीज' म्हटल्यावर 'इनसाईड एज २' तातडीने पाहून टाकला. कुठून कोण जाणे, पण मालिकानिर्मात्यांना उपरती झाली आणि उत्तानतेचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. आणि कथानक सुदृढ होऊ लागले.

क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण या तीन गोष्टींचे संपूर्ण ज्ञान प्रत्येक भारतीयाला गर्भातच 'अभिमन्यू' मोड मध्ये मिळते. या वेबमालिकेत या तिन्ही गोष्टींचे झकास कॉकटेल आहे. आणि प्रत्यक्षात घडलेल्या / घडत असलेल्या गोष्टींचे अस्वस्थ करणारे सूचन आहे. राजकारणाचे सूचक चित्रण करणे अत्यंत अवघड. बटबटीतपणाकडेच बहुतांशी चित्रण झुकते. राजकारणी ही परग्रहावरून आलेली जमात असून तिला दुष्टपणा, क्रौर्य, विषयांधता आणि भ्रष्टाचार असे चार पाय असतात आणि घराणेशाहीचे शेपूट. पुढे 'कथानकाच्या गरजेप्रमाणे' त्याला जात्यंधता, धर्मांधता, देशद्रोहीपणा आदि उपांगे फुटतात अशी साधेसोपी मांडणी करण्याकडेच बहुतेक सगळ्यांचा कल असतो.

'इनसाईड एज'मधले राजकारण वेगवेगळ्या अंगांनी येते. निवडीमधले राजकारण, निवडलेल्या संघातले जातीय राजकारण, नियामक मंडळातले आर्थिक राजकारण अशी वेगवेगळी अंगे 'इनसाईड एज १', 'इनसाईड एज २' आणि 'इनसाईड एज ३' मध्ये प्रगल्भ होत जातात. स्वतःच्या मालकीचे स्टेडियम असलेला राजकारणी, स्वतःच्या अप्रत्यक्ष मालकीचे टीव्ही चॅनेल असलेला राजकारणी यात आजच्या काही राजकारण्यांचे अंधुक स्मरण करून देण्याची क्षमता आहे. पण तिथे ते साधर्म्य संपते. आणि कथानक सुरू राहते. विशेषतः 'इनसाईड एज ३'मध्ये तर त्या राजकारणाला कौटुंबिक संबंधांची एक मसालेदार फोडणीही दिलेली आहे. ते थोडे अस्थानी वाटू शकेल. पण शेवटी नाट्य/चित्रपटकलेचा मूलाधार काय, तर 'विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ'. त्यामुळे गप्प बसावे हे बरे.

अवांतर: बटबटीत चित्रणावरून आठवले. १९८४ साली अलाहाबादच्या लोकसभा निवडणुकीत अमिताभ बच्चन आणि हेमवतीनंदन बहुगुणा हे आमनेसामने आले होते. त्यात बहुगुणा हरले. यातील नाट्य कथांकित करण्याच्या नादात ह मो मराठ्यांसारख्या लेखकानेही 'कमिताप' आणि 'गुणबहू' ही दोन पात्रे निर्माण करण्याचा धवडपणा केला होता.

समारोपादाखल एवढेच म्हणतो की सशक्त होत जाणारे कथानक, उत्तम अभिनय, उच्च निर्मितिमूल्ये (का नसावीत? एका एपिसोडचे बजेट दोन कोटी रुपये अशी वदंता आहे) यासाठी ही वेबसीरीज बघण्यासारखी आहे. विशेषतः आमिर बशीर आणी विवेक ओबेरॉय या दोन एरवी फारशा पुढे न आलेल्या कलावंतांनी जी काही बहार आणली आहे 'इनसाईड एज ३'मध्ये त्याला तोड नाही.

अर्थात 'काव्हिआत एम्प्टॉर' हे तत्त्व लक्षात ठेवणे गरजेचे आहे याची कृपया नोंद घ्यावी.