गावदाबी - एक प्रशांत वादळ

शोषित समाजातल्या व्यक्तीचे आत्मकथन हा प्रकार मराठी साहित्यात येऊन प्रचलित झाल्याला साधारण अर्धशतक लोटले. त्याआधी शोषित समाजातल्या व्यक्तीचे जीवन बहुतांशी कथा-कादंबऱ्यांतून येत असे (अण्णा भाऊ साठे आणि श्री म माटे ही मला आठवणारी दोन नावे).

ही आत्मकथने आधी अनुल्लेखाने मारण्याचे प्रयत्न झाले. तरीही ती शब्दांकित होत राहिली तेव्हा ती साचेबद्ध असतात असा एक आक्षेप घेण्यात आला. शोषकांकडून होणारा अन्याय-अत्याचार शोषितांनी व्यक्त करणे म्हणजे तेच तेच सांगत/लिहीत राहणे ऊर्फ साचा ही सडकी कल्पना ज्या कुजक्या समीक्षकी डोक्यातून आली असेल त्याला सलाम ठोकून पुढे झाले की लक्षात येते की या शब्दांकनाला साचा म्हणण्यापेक्षा वाड्मयप्रकार (genre या इंग्रजी शब्दाला मला सुचलेला प्रतिशब्द; अधिक योग्य प्रतिशब्द सुचवणाऱ्याचे आगाऊ आभार) म्हणणे योग्य होईल.

साचेबद्ध असल्याचा आक्षेप योग्य वाटावा असे लिखाण काही काळानंतर घडू लागले हे खरे. त्यात writer, not the writing हा अभिनिवेश जास्ती होता. अमुक समाजातल्या व्यक्तीचे लिखाण थोर आहे हे म्हणणे म्हणजे आतापर्यंत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करणे आहे आणि ते केलेच पाहिजे अशा अभिनिवेशाने 'प्रागतिक', 'पुरोगामी' आदि मंडळी सरसावली. कोत्या प्रतिगामी समीक्षेला तेवढेच निर्बुद्ध उत्तर.

मात्र या गदारोळात दुर्दैवाने अस्सल अभिव्यक्ती दोन्ही बाजूंनी मार खाऊ लागली आणि अनुल्लेखाची शिकार झाली. कलाकृती काय आहे यापेक्षा कलाकार कोण आहे यावर त्याचे परीक्षण होऊ लागले. त्यामुळे बसवलेल्या गणपतींच्या भाऊगर्दीत स्वयंभू मूर्ती झाकोळल्या गेल्या.

एवढी प्रस्तावना अशासाठी की स्वयंभू कलाकृती शोधणे म्हणजे कंटाळवाणे काम होऊन बसले. पण एवढ्याएवढ्यात एक अस्सल लखलखीत स्वयंभू कलाकृती हाती लागली आणि परम संतोष जाहला.

आधी एक मान्य करतो - ज्या ठाकर या आदिवासी समाजातल्या व्यक्तीचे हे आत्मकथन आहे तो समाज दक्षिण कोंकण नि गोवा इथे अस्तित्वात आहे हे मला माहीतच नव्हते. मी मध्य कोंकणातला (रत्नागिरी जिल्हा). हिंडण्याची आवड आणि गोवाप्रेम यामुळे दक्षिण कोंकण/गोवा हेही बऱ्यापैकी माहितीचे असा माझा समज होता. आणि रत्नागिरी जिल्ह्यात आदिवासी (ज्या आदिमानवांना हा शब्द झोंबतो त्यांच्याकरिता 'वनवासी') असे वेगळे काढून दाखवता येण्यासारखे नाहीत हे माहीत होते. उत्तर कोंकणातले (रायगड जिल्हा, पेण-पनवेल-कर्जत-खालापूर तालुके) आदिवासी - कातकरी नि ठाकर- माहीत होते. तसेही 'जैत रे जैत' मधल्या गाण्यामुळे ठाकर बहुतेकांना माहीत असतात.

पण दक्षिण कोंकण आणि गोवा या पट्ट्यात वाड्या-वस्त्या असण्याइतक्या संख्येने ठाकर होते, त्यांची नावे कधी न ऐकली (त्या पट्ट्यात तरी) अशी होती (लेखकाचे नाव मोहन रणसिंग), त्यांची जातपंचायत होती, गिरणी कामगारांत त्यांची मंडळी बऱ्या संख्येने होती हे माहीत नव्हते. भूतकाळ यासाठी की सध्याची परिस्थिती माहीत नाही.

लेखक मोहन रणसिंग साधारण आत्ता पासष्टी-सत्तरीचे असावेत. असावेत कारण हे आत्मचरित्र असूनही त्यांनी सनावळ कुठेच मांडलेली नाही. अंदाजेच हिशेब मांडावा लागतो. गोवा १९६१ साली भारतात आला; लेखक चारेक वर्षांचा असताना गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. अशा संदर्भांवरून वय अंदाजले.

पिंगुळी या कुडाळजवळच्या खेड्यात यांची सुरुवातीची वीसेक वर्षे गेली. त्यांचा लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक.

अत्यंत निर्विष, निर्विकार म्हणता येईल इतके निर्विष, लिहिणे लेखकाला कसे जमले कुणास ठाऊक.

दक्षिण अफ्रिकेतल्या डग्मोर बोएटी (डग्लस महोंगा बुटी) या लेखकाच्या 'फॅमिलिऍरिटी इज द किंग्डम ऑफ द लॉस्ट' या आत्मचरित्रात अशी जीवघेणी सहजता आहे. तीसेक वर्षांपूर्वी वाचलेल्या त्या पुस्तकाची मनापासून आठवण आली. अर्थात बोएटीच्या लिखाणात थापेबाजपणाही खच्चून भरला आहे. इतका की वाचून भारल्यानंतरही 'हे खरे की कसे' हा प्रश्न छळत राहतो. असो.

मोहन रणसिंग यांची खरी जीवनलढाई ही या पुस्तकातल्या कालावधीनंतरच सुरू झाली असे ते प्रस्तावनेत लिहितात. पण या पुस्तकाखेरीज त्यांनी अजून पुढे लिहिले असल्यास ठावे नाही. आणि या पुस्तकातली जीवनलढाई इतकी बिकट आहे की पुढली लढाई म्हणजे महासंग्रामच असावा. तसे सूचनही प्रस्तावनेत आहे.

या पुस्तकातील भाषा नि वर्णन पहिल्यापासून खिळवून ठेवते. लेखकाच्या जन्मापासून सुमारे विसाव्या वर्षापर्यंतचे हे चरित्र. 'गावदाबी' म्हणजे रोकड्या भाषेत जातपंचायतीला दिलेला तोबरा/मुखलेप. मधुर ध्वनी साठी मृदंगालाही मुखलेप लागतो. माणसांना तर अधिकच. ही 'गावदाबी' लेखकाला देण्याची वेळ का येते? लेखक ती देतो का? 'गावदाबी' न दिल्यास काय होते? त्यातून सुटका होण्यासाठी काय करावे लागते? या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाच्या उत्कर्षबिंदूपाशी मिळतात. तोवरचा प्रवास म्हणजे हे पुस्तक.

सुरुवातच एकदम मंत्रून घालणारी आहे. लेखकाला नि त्याच्या वडिलांना उठून शिरोड्याला जायचे आहे. जयवंत दळवी आणि वि स खांडेकरांनी नकाशावर आणलेले शिरोडा. पण त्या दोघांच्याही लिखाणाच्या परिघाच्या पूर्ण बाहेरच्या समाजातला लेखक नि त्याचा बाप. गैरसमजूत नसावी. खांडेकर हे माझे किंचित नि दळवी हे मोजणीपल्याडचे आवडते लेखक. पण त्या दोघांनाही हा ठाकर समाज दिसलाच नाही हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. तर शिरोड्याला जाण्याचे कारण काय? तर "झालं होतं काय की देवळाजवळ खेळताना माझ्या कुल्याला कुत्रा चावला होता" आणि "कुत्र्याच्या चावण्यावर चांगलं औषध देणारा वैद्य शिरोड्याला होता. म्हणून बाबा मला शिरोड्याला घेऊन चालला होता". आठ-दहा वर्षांच्या मुलाला हा बाप पायीपायी किती अंतर घेऊन चालला होता? सुमारे पस्तीस किलोमीटर. पण त्याबद्दल कढ काढण्याऐवजी तो उल्लेख येतो कसा, तर "दुकानातल्या काचेच्या बरण्यांतील शेंगदाण्याचे, बेसनचे, चिरमुल्यांचे लाडू, शेव, चकली पाहून हे सगळंच आपल्याला खायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं असे विचार मनात यायचे. पण जिथे प्रवासाला पैसे नाहीत म्हणून गडी मला वीस-पंचवीस मैल चालत नेत होता, तो मला खाऊ कसं काय देणार! त्यामुळे बरण्यांतल्या पदार्थांकडे पाहून मनातल्या मनात जिभल्या चाटणं एवढंच मला परवडत होतं".

रेडी गावच्या मॅंगनीज खाणीत काम करण्यासाठी आई-बाप शिरोड्याला राहत होते. तिथे आठेक दिवस राहून औषधोपचार केल्यावर मोहनबुवा घरी परतले. तोवर आईबापाचा पगार झाल्याने परतीचा प्रवास मोटारीने झाला.

इथपासून सुरू होणारी कहाणी लेखक विसाव्या वर्षी मुंबईत पोहोचेपर्यंतचा कालपट उलगडते. पण ही अंगावर येणारी प्रामाणिक सहजता बांधून घालते. मी एका बैठकीत पुस्तक संपवले, कारण त्याशिवाय गत्यंतर नव्हते. असे पुस्तक दशकातून एकाद्या वेळेस हाती लागते. प्रशांत भासणारे हे वादळ कुठेही आक्रस्ताळेपणा न करता अंतर्बाह्य हलवून सोडते, भीमसेन जोशींच्या तानेसारखे.

अजून काही वानवळा देण्याच्या मोहाला बळी पडतो.

लेखकाच्या घराजवळ एक लग्न आहे. त्यात जेवायला (अर्थातच भीक मागून जेवायला, ठाकरांना पंगतीला कोण घेणार?) जायचे नाही असे आईने बजावलेले आहे. पण "रावळाच्या घरात लग्न होतं त्या आधी दोन दिवसांपासून आमच्या घरात अन्न-पाण्याची जरा तंगीच होती. एका वेळेला आयेनं कुणाकडून तरी कुळीथ मागून आणले. ते उकडले आणि आम्हांला खायला दिले. त्यावर पाणी प्यालो. जेवण झालं. संध्याकाळी तेही नव्हतं. जेवणाची काही हालचाल दिसली नाही की मी जाऊन जेवणाची भांडी रापत असे. भांडी रिकामी दिसली की पाणी प्यायचं व झोपून द्यायचं". त्यामुळे लेखक जाऊन भात, वडे, सांबारा, भाजी अशा पदार्थांनी भरलेली पत्रावळ भिकेत घेतोच. पण मग प्रश्न येतो. "घरी माझ्यासारखीच आये उपाशी आहे याची मला जाणीव होती. म्हणून जेवण सरळ घरी घेऊन जायचं ठरवलं. पण अर्ध्यावर आलो आणि आयेनं दिलेला दम आठवला. जेवण घेऊन गेलो तर आये रागावणार. रागावली म्हणून हरकत नाही. पण रागाच्या भरात जेवण टाकून दिलं तर? ना तुला ना मला असं होईल. त्या विचारानं मी घोलीत एका झाडाखाली बसलो आणि सगळं जेवण जेवलो. पोटाचा नगारा झाला."

घरी गेल्यावर मातोश्रींचा प्रश्न, "मोवन, पॉट कसा मोटा दिसताय?". मोहनच्या मौनातून काय ते उत्तर मिळाल्याने मातोश्री मारहाण करायला सज्ज होतात. तेवढ्यात एक शेजारीण येऊन मोहनला वाचवते. मातोश्रींचा बांध फुटतो "कसला नशीब घेवन माझी पोरा जन्माला आलेत देवालाच ठावक. एक पावटीलासुद्धा पॉटभर अन तेस्नी गावत नाय". शेजारीण धीर देते "कशाला रडतेस? ज्याना चॉच दिलेय तो दाणा देत्याला. हेच दिस काय असंच ऱ्हातेलं? शेणातलं किडं काय शेणातच ऱ्हात्यात? आज उद्या भाईर पडत्यातच मां?"

लेखकाचे भाष्य अजूनच भेदक. "ताईनं सहानुभूती दाखवली खरी. परंतु आमच्या सद्यःपरिस्थितीवर तिनं नकळत अगदी विदारक टिपणी केली. कुणीही सहानुभूती दाखवायला आलं तर त्यांना शेणातल्या किड्यांशिवाय दुसरं काही सुचतंच नव्हतं". आधीही कुणीतरी 'शेणातले किडे आज ना उद्या शेणाबाहेर पडतातच' असा धीर दिला होता हा संदर्भ.

एकदा लेखकाला मित्रांबरोबर जांभळे खाण्याची इच्छा होते. पण लेखकाच्या दगडांना जांभळे दाद देत नाहीत. सोबतचा मित्र एकाद दुसरी जांभूळ पाडत होता, लेखकाला देऊ करीत होता. पण लेखक "मी माझ्या कष्टाची जांभळं खातेलो" असे बाणेदार उत्तर देऊन त्या उंच झाडावर चढतो. भरपूर जांभळे पाडण्यात यशस्वी होतो आणि अखेर स्वतःही त्या झाडावरून पडतो नि बेशुद्ध होतो. तो मेला समजून सगळ्यांची रडारड. अखेर दवाखान्यात आठवडाभर काढून घरी रवानगी होते. तोंड फुटलेले, तीन दगड डॉक्टरांनी काढले असले तरी एकादा अजून आत असल्याची शंका. पण कुणी विचारलं तर मला उत्तर द्यावंच लागत नव्हतं. बाजूला लवू (जांभळं पाडताना सोबत असलेला मित्र) किंवा अन्य कोणी असला तर तोच उत्तर द्यायचा, "त्यानं कष्टाची जांभळं खाल्ली"

स्वतः शिकण्याची इच्छा, आवड नि क्षमता असलेला आणि मोहनलाही शिकण्यासाठी प्रवृत्त करणारा थोरला भाऊ. भावाभावांमध्ये प्रेमही खूप. पण शिस्त लावायची म्हणजे झोडून काढायचे हा हिशेब पक्का. मोहनने काही केल्यास त्याला चिंचेच्या फोकाने फोडून काढणे ठरलेले. त्यावर लेखकाची टिपणी "दर दोन महिन्यांनी नवीन चिंचेचं फोक त्याला आणावं लागायचं"

असो. टंकत बसलो तर पुस्तकच उतरवावे लागेल.

गावदाबी.

लेखक - मोहन रणसिंग.

प्रकाशक - लोकवाड्मय गृह

पहिली आवृत्ती - जानेवारी २०१८

किंमत - रु ३००