निर्वस्तू आणि अपरिवर्तनीयता (३)

अपरिवर्तनीयता हे निर्वस्तूचं (म्हणजे आपलं) अमूल्य गुण वैशिष्ट्य आहे.  आपल्या अपरिवर्तनीयतेचा उलगडा न होण्याचं कारण विविध आणि नवनवीन अनुभवांची आस आहे. सर्व अनुभव हे इंद्रिय गम्य आहेत आणि त्यांचा दायरा देहापुरता मर्यादित आहे. जगण्यासाठी अनुभवाची आवश्यकता आहे पण जोपर्यंत आपली अपरिवर्तनीयता उलगडत नाही तोपर्यंत प्रत्येक अनुभव आंदोलित करत राहणार हे नक्की, मग तो प्रिय असो की अप्रिय .  

दुसरा गैरसमज असा की अनुभवातून उलगडा होईल ही एक सार्वत्रिक धारणा आहे. त्यामुळे अपरिवर्तनीयता हा उलगडा आहे, तो अनुभव नाही हे समजणं आवश्यक आहे. निर्वस्तूत बदल असंभव आहे, सारे बदल हे वस्तूत आहेत मग तो देह असो की विचार की भावना.  याचा अर्थ अपरिवर्तनीयतेचा उलगडा भावना किंवा जाणीव शून्य करतो असा नाही तर जाणिवेतून निर्माण होणारे विचार किंवा भावना आपल्यात परिवर्तन घडवू शकत नाहीत. थोडक्यात, तुम्ही जीवनाचा चलतपट सर्वतोपरी आनंदानं भोगता पण त्याच्या क्षणोक्षणी होणाऱ्या परिणामापासून मुक्त होता. 

रूपकात्मक दृष्टीनं अपरिवर्तनीयता आरशासारखी आहे, ज्यात सर्व दृग्गोचर होतं पण खुद्द आरशात परिवर्तन होत नाही. अर्थात, आरश्याच्या पुढे जाऊन आपल्याला केवळ दृश्यच नाही तर संवाद आणि भावना देखिल समजतात (जी क्षमता आरशात नाही) परंतु ती दृश्य, प्रसंग, वाक्य, भावना अथवा जाणिवा आपल्यात परिवर्तन घडवू शकत नाही.

अपरिवर्तनीयतेचा उलगडा होण्यासाठी आपल्या जाणण्याच्या क्षमतेची आणि क्रियाशून्यतेची विलोभनीयता समजणं आवश्यक आहे. आपण काहीही उच्चारण करू  शकत नाही कारण शांतता हा निर्वस्तूचा स्वभाव आहे. तरीही नाम, ध्वनी, श्लोक,  मंत्र, ब्रह्मवाक्य इत्यादी गोष्टींचा अध्यात्मात इतका बोलबाला आहे की बोलता सोय नाही. लोक धर्मग्रंथांची पारायणं वषानुवर्ष करतात. मंत्रांचा उद्घोष इतक्या जोमात चालू असतो की ऐकणारा भ्रमित होऊन जातो पण या कार्यक्रमातून आपण कायम उच्चारण शून्य आहोत हा उलगडा कसा होईल ? आपली जाणण्याची क्षमता कानांद्वारे उन्मुख झाली तर आपल्याला ऐकू येईल पण आपण काही उच्चारू शकू ही शक्यता शून्य ! आपल्याला आपण बोलतो असं वाटतं ती वस्तुस्थिती नाही. बोलण्याची क्रिया स्वरयंत्राद्वारे झालेली शारीरिक क्रिया आहे, आपल्याला ती फक्त समजू शकते. तद्वत, मेंदूत चाललेले संवाद ही सुद्धा शारीरिक क्रियाच आहे, आपल्याला ती जाणवते पण आपणच मनात बोलतो असा जो एक सार्वत्रिक भ्रम आहे तो सर्वस्वी चूक आहे.  आपली क्रियाशून्यता इतकी कमालीची आहे की आपण काहीही उच्चारण करू शकत नाही या एका उलगड्यासरशी कमालीची शांतता प्रस्थापित होते. शांत होण्यासाठी इतर कोणतीही साधना करण्याची काहीएक आवश्यकता नाही कारण शांतता आपण खुद्दच आहोत.

तद्वत, आपलं स्वरूप निर्वस्तू (नॉन मॅटर) आहे ती अचल आणि सार्वभौम स्थिती आहे.  देह चालतो किंवा क्रियामान असतो किंवा विचार आणि भावना मेंदूत अथवा हृदयात उमटतात तेंव्हा त्या स्वरूपात कोणताही बदल घडवू शकत नाहीत. परंतु आपण देहात आहोत या ठाम धारणेमुळे देह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला तर आपल्याला आपणच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलो असं वाटतं. शिवाय भाषा देह आणि स्वरूप यातला फरक न जाणणाऱ्यांनी तयार केली आहे त्यामुळे आपणही सर्रास मी तिकडे गेलो, मी काम केलं, माझे विचार, माझ्या भावना असंच म्हणतो. या दुहेरी पेचामुळे म्हणजे आपण देहात आहोत आणि भाषा यामुळे क्रियाशून्य आणि अपरिवर्तनीय स्वरूपाचा उलगडा मुश्कील होतो.  

यावर दोनच उपाय आहेत :

(१)  काहीही झालं तरी आपण बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती निश्चयात्मकतेनं जाणणं. जे उच्चारण होतं ते स्वरयंत्रातून होतं आणि ज्याला आपण मनाचं बोलणं म्हणतो ती मेंदूची क्रिया आहे. भाषा आपण शिकलेलो आहोत, शांतता आपलं स्वरूप आहे त्यामुळे शांतता हा उलगडा आहे; ती शिकवता येत नाही. आपण शांतता आहोत या उलगड्यासरशी; आपण देहात आहोत हा भ्रम दूर होतो  आणि त्या बरोबरच माझे विचार, माझ्या भावना आणि मी बोलतो या धारणा पण कायम स्वरूपी निस्सरित होतात.

(२) भाषा वापरतांना शब्दभ्रमापासून सावध होणं. ज्या वेळी आपण घरुन ऑफिसमधे आलो असं वाटतं त्या वेळी देहानी स्थानांतर केलेलं असतं, आपल्याला ते फक्त कळतं, खुद्द आपल्यात काहीएक बदल झालेला नसतो. बालपण ते सांप्रतात आपलं बरंच वय झालं असं आपल्याला जे वाटतं ती केवळ दैहिक प्रक्रिया आहे; खुद्द आपण जसेच्या तसे आहोत !  

एकदा आपल्याला स्वत:च्या अपरिवर्तनीयतेचा उलगडा झाला की आपण कायम मुक्तच होतो, कोणतीही दैहिक, वास्तविक किंवा काल्पनिक घटना आपल्यावर कोणताही परिणाम घडवू शकत नाही हा  उलगडा पण आपसूकच होतो.