पंचायत - फसत चाललेला डाव

'पंचायत' ही वेबमालिका गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये आली. फार गुंतागुंत नसलेले कथानक, रघुवीर यादव नि नीना गुप्ता सोडता बाकीचे बहुतेक सगळे नवोदित कलाकार, बोलीभाषा वा दृष्यभाषा यात कुठेच अतिरेकीपणा नसणे या कारणांनी ती आवडणे सहजशक्य झाले. नीना गुप्ता आणि एकदोन प्रासंगिक पात्रे सोडता त्यात स्त्री पात्रेच नव्हती. त्यामुळे विवाहपूर्व / विवाहबाह्य / विवाहोत्तर अशा कुठल्याच प्रकारचा मसाला नव्हता.

पदवी परीक्षा झाल्यावर चांगल्या 'पॅकेज'ची नोकरी मिळत नाही म्हणून एक होतकरू तरुण एका पंचायत कार्यालयात सचिव म्हणून रुजू होतो. 'कॅट' ची तयारी करून आय आय एम ला प्रवेश घेणे हे त्याचे मुख्य ध्येय. त्यासाठी नोकरी करणे हे उपध्येय. गावची सरपंच एक महिला, पण तिचा पतीच सगळा कारभार बघतो आहे. एक उपसरपंच आणि एक कार्यालयीन सहायक. बाकी पात्रे एपिसोडच्या गरजेप्रमाणे.

त्या मालिकेतल्या एका भागाचा 'टोन' थोडा उपदेशात्मक होता (भुते अस्तित्वात नसतात हे तात्पर्य असलेले कथानक) पण बाकी ग्रामीण जीवनातील लोभ-मोह-हेवा-द्वेषयुक्त मानवी नातेसंबंध हेच केंद्रस्थानी होते. मग ग्रामपंचायत सचिवाने स्वतःसाठी चाकांची फिरती खुर्ची आणल्यावर सरपंचपतीला आलेला न्यूनगंड आणि त्यावर निघालेला उपाय, संततीसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी घोषणा आणि ग्रामीण मनांवर त्याचा झालेला भलताच परिणाम अशी कथानके एकेका एपिसोडमध्ये फुलवली होती. डाव एपिसोडगणिक रंगत चालला होता. सहायक भूमिकांमधील पात्रे (विशेषतः उपसरपंच आणि कार्यालयीन सहायक) आब-तोल-मर्यादा न सोडता बेतशीर रंग भरत होती.

शेवटच्या एपिसोडमध्ये शेवटच्या पाच मिनिटांत एक नवीन पात्र आणून 'सीझन २' ची यथायोग्य व्यवस्था करून ठेवली होती.

सीझन २ उत्सुकतेने पहायला घेतला. आणि त्याच्या पहिल्या एपिसोडपासूनच काही गोष्टी जाणवू लागल्या. विनोदाचा दर्जा खालावलेला नव्हता. पण सीझन १ मध्ये विनोद एपिसोडभर सहजसुंदर खळाळत होता. आता तो तुटक तुटक होत चालला. अधूनमधून चांगले/बरे चुटके पेरलेले कथानक असे शेवटी त्याचे स्वरूप झाले.

आणि प्रत्येक एपिसोडला वेगळेच कथानक घेण्याच्या अट्टाहासापायी त्या एपिसोडमध्ये ते कथानक काहीही करून गुंडाळायचा प्रघात पडला. पहिल्याच एपिसोडमध्ये गावच्या मेळ्यातल्या नर्तकीचे पात्र आणून तिच्या तोंडी एक उत्कंठावर्धक संवाद घातला. आणि तिला दुसऱ्या एपिसोडपासून नाहीसेच करून टाकले. या एकेका एपिसोडमध्ये काहीही करून गुंडाळण्याच्या नादात भारतातली खेडी खरोखर ओ डी एफ (ओपन डेफिकेशन फ्री) झाली आहेत की नाहीत या महत्वाच्या मुद्द्यालाही एका एपिसोडमध्ये टप्पल मारून ठेवली आणि परत पुढे काहीच नाही. मग ग्रामीण जातीप्रधान जीवनात मुलीचे लग्न ठरवताना येणाऱ्या अडचणी, गावात सीसीटीव्ही बसवल्यावर होणाऱ्या गंमतीजंमती असे विषय एकेक एपिसोडमध्ये कत्तल करण्यात आले. त्या भागातला आमदार हा पूर्ण खलनायक दाखवला आणि एका ऐवजी दोन एपिसोडमध्ये तो धागा अर्धवट खेचला.

थोडक्यात बहुतांशी 'भाग २' चे जे होते तेच दुर्दैवाने झाले.

'सीझन १' ने ज्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा अपेक्षाभंग जास्ती जाणवला.

'इनसाईड एज' ही मालिका सीझनगणिक प्रगल्भ होत गेली. आणि आता जर 'आयपीएल' नामक विचकटपणा कुणी बघितला तर 'इनसाईड एज' किती भविष्यदर्शी होती याची खात्री पटेल.

सीझन २ मध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये ज्याला फुलवून अजून एक/दोन एपिसोड करता येतील असे कथाबीज दमदाटी करून झाकून ठेवले आहे. आता त्या कथाबीजांना घेऊन सीझन ३ करणार आहेत की काय कोण जाणे. मी तरी त्या वाट्याला जाणार नाही एवढे निश्चित.