हिरव्या मिरच्या ४ (तीन-चार पेर लांबीच्या, मध्यम तिखट)
व्हिस्की ६० मिली (सिग्नेचर / ऍंटिक्विटी ब्लू)
ओवा एक टीस्पून
तेल ३० मिली
खमंग भाजलेल्या दाण्याचे भरड कूट तीन टेबलस्पून
मीठ
३० मिनिटे
दोन जणांसाठी
गोदरेजचे 'प्री-मॅरिनेटेड चिकन लॉलिपॉप'चे पाकीट फ्रीजमधून बाहेर काढून खोलीच्या सामान्य तापमानाला आणावे.
एक मार्ग म्हणजे फ्रीजमधून बाहेर काढून तीन-चार तास ठेवावे. तितका वेळ नसेल तर पातेलीभर मंद कोमट पाण्यात फ्रोजन पाकीट अख्खे घालावे. तीन-पाच मिनिटांनी पाणी बदलावे. तीन-चार वेळेस पाणी बदलले की काम होईल.
कांदा उभा नि पातळ कापून घ्यावा. डोसाभाजीसाठी कापतो तसा.
लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात.
मिरच्यांचे एक पेर लांबीचे तुकडे करून घ्यावेत.
नॉन स्टिक खोलगट पॅनमध्ये तेल तापवावे.
तेल धुरावल्यावर ठेचलेली लसूण नि कापलेल्या मिरच्या घालून लगेच परतावे. लसूण जळकटू लागली की ज्योत बारीक न करता चिरलेला कांदा घालावा. व्यवस्थित परतत रहावे.
कांद्याचा रंग गुलाबी झाला की ३० मिली व्हिस्की घालावी. ज्योत मोठीच असेल. कांदा भक्कन आग पकडेल नि पाचेक सेकंदात विझेल. आता कांद्याचा रंग चॉकलेटी झालेला असेल. ज्योत बारीक करून कांद्यापुरते मीठ घालावे नि परतावे.
मग त्यात सामान्य तापमानाला आलेले लॉलिपॉप घालावेत. सगळा कॅरेमेलाईज्ड कांदा लॉलिपॉपना लागेल असे परतावे. त्यावर झाकण ठेवावे. ज्योत बारीकच असू द्यावी.
पाचेक मिनिटांत झाकणाला आतून वाफ धरेल. झाकण काढून ज्योत मोठी करावी आणि परतावे. आता तेल कडेला सुटू लागले असेल.
एक चमचा ओवा घालून परतावे. मग ज्योत बारीक करून मिनिटभर परतावे आणि उरलेली ३० मिली व्हिस्की घालावी. आता आग पकडणार नाही. लगेच झाकण ठेवावे नि बारीक ज्योतीवर दहा ते बारा मिनिटे शिजवावे.
लॉलिपॉप शिजले की (झाकण काढून काट्याने कोचून पहावे) ज्योत बंद करून दाण्यांचे भरड कूट घालावे नि परतावे.
एकूण प्रकरण चिकन मंचुरियन (ड्राय) सदृश होते. पाच मिनिटांत वाढायला तयार आहे.
(१) प्री-मॅरिनेटेड चिकन लॉलिपॉप 'झोराबियन' या कंपनीचेही मिळतात. पण त्यांना बाहेरून कॉर्नफ्लोअर नि मैदा असे आवरण असते. त्यामुळे ते तळण्यासाठीच उपयोगी आहेत, या पाककृतीसाठी नाहीत. गोदरेजच्या लॉलिपॉपना असे आवरण नसते. पण मॅरिनेशन असते.
(२) व्हिस्की ही कांदा कॅरेमेलाईज होण्यासाठी निम्मी आणि व्हिस्की फ्लेवर देण्यासाठी निम्मी वापरायची आहे. सिग्नेचर आणि ऍंटिक्विटी ब्लू ही गोडसर चवीची व्हिस्की यासाठी योग्य. जॉनी वॉकर रेड लेबलही चालेल. इतर कुठली व्हिस्की वापरायची असल्यास माझी हरकत नाही.
(३) व्हिस्की न वापरता ही पाककृती करता येईल. कांदा, लसूण, मिरच्या, ओवा, दाण्याचे कूट न वापरताही करता येईल. तसेच ही पाककृती न करता जगण्याचा अधिकारही भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे याची नोंद घ्यावी.
(४) ओवा पाऊसकाळात सादळतो. तसे झाले असल्यास त्यामुळे चमचाभर ओवा तव्यावर खरपूस करून घ्यावा.
(५) दाण्याचे कूट खमंग हवे. पंडुरोग झालेले पांढुरके नको. बाजारात 'भरूची सेंग' वा तत्सम नावाचे टपोरे भाजलेले खारे दाणे मिळतात. त्यांचे कूट खमंग होते. 'हल्दीराम'चे खारे दाणे आकाराला लहान आणि तेलकट असतात. त्यांचा उपयोग नाही.
(६) कॅरेमेलाईज्ड आणि व्हिस्की फ्लेवर्ड कांदा, त्याला ओवा-लसणीची जोड आणि गोदरेज कंपनीचे मसाले यांचा हा संयुक्त प्रयोग आहे. नंतर सजावटीसाठी कोथिंबीर, पुदिना, ओले खोबरे, चाट मसाला, डाळींबाचे दाणे, काजू, क्रीम, गोमूत्र असले काही घालू नये.
स्वप्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.