खानदानी शफाखाना - गंभीर विषय, थिल्लर मांडणी

सेक्स एज्युकेशन अर्थात शरीर विज्ञान (वा शरीर-संबंध विज्ञान; 'सेक्स' या शब्दाला एकच नेमका मराठी प्रतिशब्द मला माहीत नाही) याबद्दल बराच मतामतांचा गल्बला आहे. पण एकंदरीत या विषयाची माहिती/ओळख ही पद्धतशीरपणे न होता तुकड्यातुकड्यांत होते. बऱ्याचदा चोरूनमारून मिळालेला ऐवज (पूर्वी पिवळ्या वेष्टनातली पुस्तके, नंतरच्या काळात हैदोस/धिंगाणा इ, त्यानंतर 'नॅन्सी फ्रायडे', 'ह्यूमन डायजेस्ट', शेवटी आंतरजाल) हा या विषयाची प्रस्तावना असते. त्यात तथाकथित सामिष विनोदांची भर पडते.

बाकी विनोदांचे सामिष-निरामिष वर्गीकरण करणारा कोण महामूर्ख आहे कळत नाही.

तर या विषयाची पद्धतशीर ओळख करून न दिल्याने होणारे मानसशास्त्रीय परिणाम पदोपदी पहायला मिळतातच. बलात्कार हे हिमनगाचे टोक झाले. एकंदर समाजव्यवहारात 'बाईची जात' हे एक गंमतीदार प्रकरण पहायला मिळते. संख्येत जवळपास निम्मी आणि महत्वात जवळपास शून्य. आणि हे महत्व शून्यावर आणण्यात कळीची भूमिका बजावण्यासाठी परत या 'बाईच्या जाती'तलीच मंडळी इरेसरीने पुढे. असो.

तर 'सेक्स एज्युकेशन' हा विषय महत्वाचा आहे यात वाद नाही. तो चित्रपटांतून मांडणे वा त्या विषयाच्या अवतीभोवती कथा रचणे हे फारसे घडत नसे. सत्तर-ऐंशीच्या दशकात तर थेट प्रसूतीशास्त्राचे शैक्षणिक चित्रपट 'गुप्त ग्यान' नावाने खपवले जात. हल्ली या विषयाच्या अवतीभवतीने बरेच उत्तम चित्रपट आले आहेत. 'विकी डोनर', 'शुभ मंगल सावधान', 'शुभ मंगल जादा सावधान', 'बधाई हो', 'चंडीगढ करे आशिकी', 'अलिगढ', 'बधाई दो' आदि.

खानदानी शफाखाना हाही याच जातकुळीतला असेल म्हणून बघितला.

आणि निर्भेळ पश्चात्ताप पदरी पडला.

सिनेमॅटिक लिबर्टी या संकल्पनेबद्दल बराच घोळ डोक्यात ठेवून दिग्दर्शिकेने (शिल्पी दासगुप्ता) काम केले आहे - खरे तर केले नाही. कथा आणि मग पटकथा ही कुठल्याही चित्रपटाची सुरुवात हवी. इथे मूळ कथा अशी काही एकसंध असलीच तर दिग्दर्शिकेने केले आहे ते असे - रॅन्डम नंबर जनरेटर वापरून त्या एकसंध कथेतली पाने निवडली. मग ती रॅन्डम पद्धतीने जुळवून छायाचित्रण केले. कंटिन्यूइटी, टाईम-लॅप्स, फ्लॅशबॅक आदि गोष्टी फाट्यावर मारल्या. मग संकलनासाठी परत 'रॅन्डम इज एव्हरीथिंग ऍंड एव्हरीथिंग इज रॅन्डम' या मंत्राचे सहस्त्रावर्तन केले. या सगळ्यात कथानक बरेचसे घुसमटून आणि उरलेले रक्तस्त्रावाने मरणपंथाला लागले. शेवटी एक अविश्वसनीय कोलांटी मारून कथानकाच्या हरिणाचा बेडूक करून (अखेर) बाई थांबली.

गोष्ट अशी - मामाजी हे एक युनानी हकीम.

युनानी म्हणजे आयुर्वेदासारखेच पाला-वनस्पती-मुळ्या आणि काढे-अर्क-चूर्ण आदि व्यवस्था असलेली चिकित्सापद्धत. पण ती @#@# लोकांची असल्याने तिला 'हिंदुस्तानी' समाजमानसात स्थान नाही.

आयुर्वेदिक वैद्य असे पात्र न घेता युनानी हकीम घेऊन दिग्दर्शिकेने धार्मिक समतेचे मार्क मिळवले. अर्थात मामाजी आणि कथानकातली बाकीची सगळी मंडळी पक्की हिंदू आहेत. धार्मिक समता ही शेवटी मिठासारखी असते. चवीपुरतीच. जास्ती झाली तर तोंडे खारट होतात.

हे मामाजी वीस वर्षांपूर्वीच शीघ्रपतन, शैथिल्य आदि अनुच्चरणीय रोगांनी पीडित जनतेला आपली औषधे देऊन बरे करत असतात. खरे तर करत नसतात. त्यांचे रुग्ण तहहयात त्यांची औषधे घेत असतात. वैद्यकीय ज्ञानकण - हे 'गुप्त रोग' अपरिवर्तनीय असतात. एकदा झाले की झाले. मग आयुष्यभर औषधे घेत बसा. तर हे मामाजी आपल्या वैद्यकीय ज्ञानाची जाहिरात करण्यासाठी साक्षात टीव्हीवर जाहिराती करतात. त्याला हिंदुस्तान युनानी इन्स्टिट्यूट ऍंड रिसर्च सेंटर (पंजाबमधील होशियारपूरमध्ये असलेली एक अखिल भारतीय संघटना) आक्षेप घेते आणि आपल्यातून काढून टाकते.

हे मामाजी होशियारपूरच्या ऐन बाजारात आपला शफाखाना (दवाखाना) चालवतात. सर्व रोगी अर्थातच 'गुप्त रोग' पीडित. वैद्यकीय ज्ञानकण दोन - प्रकट रोगांवर युनानी पद्धतीत इलाज नाहीत. एक दिवस एक रुग्ण मामाजींची भर बाजारात गोळी घालून हत्या करतो. बरे केले नाही म्हणून नव्हे, तर नको तेवढे बरे केले म्हणून.

बबीता ऊर्फ बेबी बेदी ही त्यांची भाची. तिला छळायला वाईट नोकरी, नसलेला (गचकलेला) बाप, असलेला दुष्ट काका इ मंडळींची यादी तयार आहे. तिला एक विधवा आई, लग्न झालेली एक बहीण आणि 'मेरी शादी क्यूं नही करते' हा मूलभूत प्रश्न जाणाऱ्या - येणाऱ्याला विचारणारा एक भाऊ आहे.

मामाजी मृत्यूपत्रात शफाखाना ही मालमत्ता (जिची किंमत कोटी रुपयांच्या घरात आहे) बेबीच्या नावाने करतात. अट अशी की तिने हा शफाखाना सहा महिने चालवावा. मग स्वमर्जीप्रमाणे विकावा वा चालवावा. जर तिने सहा महिने रोज तिथे जाऊन तो चालवला नाही तर ती मालमत्ता हिंदुस्तान युनानी इन्स्टिट्यूट ऍंड रिसर्च सेंटरच्या मालकीची होईल.

बेबीची आई (मामाजींची सख्खी बहीण) ही स्वतःच्या भावाची निर्विवाद लाज वाटणारी बाई (तो काहीतरी अश्लील, घाणेरडी कामे करत होता ना). त्यामुळे "हा शफाखाना अजिबात चालवायला घेऊ नये, शेवटी 'इज्जत' म्हणून काही आहे की नाही" ही तिची ठाम भूमिका.

पण बेबी तो शफाखाना चालवायला घेते. त्यासाठी एका हस्तलिखित चोपडीतून युनानी वैद्यक शिकते. मार्केटिंग करते. एका पंजाबी रॉकस्टारला (तो मामाजींचा रुग्ण आहे) कपाटातून बाहेर काढायला बघते. समाजप्रबोधन करते. समाजाच्या शिव्या खाते. घरातून बाहेर काढली जाते (काका ते काम करतो, तिच्यासकट तिच्या सगळ्या कुटुंबालाच बाहेर काढतो). तुरुंगात जाते. घाबरत घाबरत प्रेम करते. कोर्टात अश्राप गायीची भूमिका करते. मग मध्येच नख्या काढून वाघीण होते. थोडक्यात, शूटिंगच्या दिवशी जी चिठी निघाली असेल त्याप्रमाणे माकड उड्या मारते. आणि शेवटी कथानकाचा पूर्ण विस्कोट झाला की शांत होते.

कथानक गौतम मेहरा. दिग्दर्शिका शिल्पी दासगुप्ता. निर्माते मंडळ म्हणजे गुलशन कुमारची पिलावळ.

काम करण्यासाठी सोनाक्षी सिन्हा, वरुण शर्मा, नादिरा बब्बर, अन्नू कपूर, कुलभूषण खरबंदा, राजीव गुप्ता, राजेश शर्मा, हॉबी धालिवाल आदि मंडळी. बादशाह आणी प्रियांश जोरा हे 'इंट्रोड्यूसिंग' पाटीसकट.

सोनाक्षी सिन्हा एकटीच्या खांद्यावर अख्खा चित्रपट ओढत नेईल अशी दिग्दर्शिकेची अंधश्रद्धा. त्यामुळे सोनाक्षी पडद्यावर नाही अशी मधून मधून दोनपाच मिनिटे जातात एवढेच.

वरुण शर्मा हा तसा गुणी नट. फुकरे, डॉली की डोली, फ्राय डे अशा चित्रपटांतून धमाल केलेला. इथे तो काय करतो त्याचे त्यालाच कळत नाही.

नादिरा बब्बर या रंगभूमीवरील अभिनेत्रीने ज्या पाचसहा चित्रपटांत काम केले त्यातला हा एक. हे काम का केले तिलाच माहीत असू शकेल.

अन्नू कपूरला या चित्रपटाआधी दोन वर्षे आलेल्या 'जॉली एल एल बी २' चा हा सीक्वेल आहे असे वाटत असावे.

कुलभूषण खरबंदा इथे फ्लॅशबॅक असो वा वर्तमानकाळ, सतत एकाच वयाचा (ऐंशीचा) दिसतो. फक्त छायाचित्रात पन्नाशीचा दिसतो.

राजीव गुप्ता 'हिंदी मीडियम', 'मदारी', 'गुड्डू रंगीला' आदि चित्रपटांतून लक्षात राहिलेला. इथे लक्षात राहत सोडा, येतही नाही.

राजेश शर्मा हा 'लक्ष्मी', 'पती, पत्नी और वोह', 'ड्रीम गर्ल', 'इंडियाज मोस्ट वाँटेड' या चित्रपटांतल. त्याचेही तसेच.

हॉबी धालिवाल पंजाबी चित्रपटसृष्टीतले प्रस्थ. इथे 'असून अडचण नसून खोळंबा' श्रेणीत.

प्रियांश जोरा काम चांगले करतो. बादशहा (आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया) हा पंजाबी रॉकस्टार कॅमेऱ्यासमोर जा ये करतो. मधून मधून संवादही म्हणतो.

मराठी थिसॉरस करायचा असेल तर 'सवंग, थिल्लर, उठवळ, पांचट, बटबटीत, अर्थहीन' या शब्दसमूहासाठी या चित्रपटाचे पोस्टर द्यायला हरकत नाही.