विकास आणि समृद्धी - गुंतवणुकीची एक नवीन संधी

बहुतेकांना माहीत नसेल - गुंतवणुकीसाठी एक नवीन क्षेत्र उपलब्ध झाले आहे. पण ते केवळ आमंत्रितांसाठीच आहे (बाय इनव्हिटेशन ओन्ली). त्या निवडक निमंत्रितांत मी आहे.

निमंत्रणे येण्यासाठी काय निकष आहेत ते नंतर सांगतो. जर निमंत्रण आलेच तर हे काय आहे याची माहिती असावी म्हणून हा लेखनप्रपंच. तसेही निमंत्रणे पाठवण्याचे काम पूर्णतया अमानवी प्रज्ञाधारित आहे.

कल्पना म्हटले तर सोपी आहे. भारतात राज्ये अठ्ठावीस नि केंद्रशासित प्रदेश आठ. या आठातील जम्मू-कश्मीर, पुदुच्चेरी आणि दिल्ली यांनाही विधानसभा आहेत. म्हणजे एकतीस विधानसभा. लोकसभा सगळ्या छत्तीस ठिकाणांची मिळून.

तर विकास आणि समृद्धीची खळाळती गंगा गेले दशकभर वाहू लागली आणि या सगळ्या देशातून त्या प्रवाहात सामील होण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली. सुरुवातीला गती अगदी संथ होती. आग्रा घराण्याच्या एखाद्या परंपरानिष्ठ गायकाने नोम-तोम आलापीतच तासभर काढावा तशी. पण एकदा रंग भरायला लागल्यावर देशाच्या कानाकोपऱ्यातून कलकलाट सुरू झाला.

देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या मध्यप्रदेशातल्या चारेक वर्षांपूर्वीच्या घडामोडींनी दर्शवले की या प्रवाहाने सुटका-वेग (एस्केप व्हेलॉसिटी) गाठला आहे. तसेच पैसे गुंतवणुकीसाठीच्या संधी बऱ्यापैकी नीरस होत चालल्या होत्या. मुख्य म्हणजे गुंतवणुकीतील अभिजनांची संख्या सुमारे तेवढीच राहून गण्या-गंप्यांची संख्या भूमितीश्रेणीने वाढत होती.

सर्वसामान्य जनांना सहज जमणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे निर्बुद्ध मठ्ठपणा. हे माहीत असलेल्या आमच्यासारख्या सनातन्यांचे त्यामुळे पित्त खवळले होते.

लोकशाही वगैरे सरकारपुरते ठीक आहे. दहा गाढवे म्हणजे एक घोडा (वा एक गाढव दहा वेळेस समाजमाध्यमांतून चमकावले की एक घोडा) यावर निवडणुका खेळल्या जातात. पण पैसे गुंतवणुकीतही अंदाधुंद माजायला लागली तर कठीण आहे. आणि हे सोडून परदेश गाठायचा म्हटले तर त्या मार्गाला तर गण्ये-गंप्ये जवळपास शंभर टक्के. शिवाय आमच्या सनातनी अभिजन कंपूमध्ये बहुतेकांना प्रदूषणाचे व्यसन लागले होते. डीजेच्या भिंतींनी खिडक्यांच्या काचा महिनाभर हादरल्या नाहीत तर त्यांना डोके कलकलायला लागायचे. आणि पुण्याबाहेर तळेगांव-वडगांवपर्यंत आले नि गाडीच्या काचा उघडल्या तर त्या हवेने श्वास घेणे जड व्हायचे. आमच्यातला एकजण तर कान्हेफाट्याला पोहोचेपर्यंत बेशुद्धच पडला. त्याच्या ड्रायव्हरने समयसूचकता दाखवून गाडी आडवी घालून एक एस्टी अडवली आणि त्या एस्टीच्या सायलेन्सरजवळ आपल्या साहेबांचे डोके धरून एस्टीचालकाला पाच मिनिटे घोंघों करायला लावले (पाचशे रुपये द्यावे लागले). तेव्हा कुठे महाशय शुद्धीवर आले आणि तातडीने परतले. तरी संशयाला जागा नको म्हणून सोमाटणे फाट्याच्या टोलनाक्यावर पंचवीस मिनिटे ट्रक्सच्या सायलेन्सरजवळ त्याला उभे करून तोवर त्याच्या ड्रायव्हरने तीच हवा गाडीतही काचा उघडून भरून घेतली. मग काचा बंद करून साहेब निवांत पुण्याला पोहोचले.

पण इष्टापत्ती अशी की त्या जीवदायिनी एस्टीच्या तीन बाजूंनी असलेल्या जाहिराती त्या सहकाऱ्याच्या डोक्यात घट्ट घुसल्या. महाराष्ट्रात विकास एक्सप्रेसमध्ये सामील झालेले ते स्वप्रसन्न चेहरे पाहून त्याला ही कल्पना सुचली.

तर लोकसभेसाठी छत्तीस विभाग (राज्य वा केंद्रशासित प्रदेश). यांची इंग्रजी नावानुसार एक क्रमांकित यादी तयार केली. केंद्रशासित प्रदेश प्रथम (एरवी त्यांना तरी कोण मान देणार नि कधी) आणि राज्ये नंतर अशी. म्हणजे अंदमान-निकोबारला प्रथम क्रमांक, चंदिगढला दुसरा असे करत करत वेस्ट बंगाल छत्तीस.

या छत्तीस क्रमांकांनी एक कूटक्रमांक तयार होतो १७१ अंकी. मूळ कूटक्रमांक असा

१०००२०००३०००४०००५०००६०००७०००८०००९०००१००००११०००१२०००... अशी गाडी ३६००० पर्यंत सलग मारायची.

या १७१ अंकी आकड्याचे दोन उपप्रकार होतात. ते म्हणजे I आणि X. म्हणजे सुरुवातीला I वा X. म्हणजे १७२ स्थानी क्रमांक झाला.

I हे अक्षर लोकसभेसाठी विकासाच्या दिशेने, X हे अक्षर लोकसभेसाठी विकासाच्या विरुद्ध.

विधानसभेसाठी एकतीस विभाग. म्हणजे क्रमांक होईल १४६ आकडी आणि त्याचे दोन उपप्रकार K आणि C. K विकासाच्या दिशेने आणि C विकासाच्या विरुद्ध. म्हणजे १४७ स्थानी क्रमांक झाला.

गुंतवणूक करण्याची संधी आठवड्यातून एकदा असते. रविवारी रात्री ११:०० ते ११:४४ या वेळेत. त्याआधी प्रत्येक क्रमांकासाठी (१७२ स्थानी वा १४७ स्थानी) परतावा किती असेल हे रविवारी रात्री १०:१० या वेळी जाहीर केले जाते.

एक उदाहरण घेऊ. लोकसभेच्या १७२ स्थानी क्रमांकात झारखंडचे स्थान १८ आकड्याने सुरू होणारे. सोमवारी २६ फेब्रुआरी २०२४ रोजी झारखंडमधल्या एका लोकसभेच्या खासदाराने विकासप्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. रविवार २५ फेब्रुआरी २०२४ रोजी १७१I साठी जाहीर झालेला परतावा होता १७४ टक्के. म्हणजे ज्या कुणी त्या १७२ स्थानी क्रमांकात १८ आकड्यानंतर ००१ असे नोंदवले असेल त्या व्यक्तीला गुंतवलेल्या रकमेच्या १.७४ पट रक्कम मिळेल. हे एका राज्याचे उदाहरण.

जर कुणी विकासाच्या विरुद्ध गेले तर ते १७१X या १७२ स्थानी क्रमांकात दर्शवले जाईल. हा १७१X क्रमांक गेली काही वर्षे हललेला नाही. त्यावरचा परतावा अर्थातच किमान सहा आकडी असतो (टक्क्यांत).

तसेच विधानसभेबद्दल. रविवार १६ एप्रिल २०२३ रोजी कर्नाटकातील हुबळी-धारवाड मध्य येथील एका आमदाराने विकासप्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभेच्या १४७ स्थानी क्रमांकातील १४६C या क्रमांकाबद्दलची ही गोष्ट. त्यात कर्नाटकचा क्रमांक १४ ने सुरू होणारा. रविवार ९ एप्रिल २०२३ रोजी १४६C साठी जाहीर झालेला परतावा होता ५४५ टक्के म्हणजे ज्या कुणी रविवार ९ एप्रिल २०२३ रोजी त्या १४७ स्थानी क्रमांकात १४ आकड्यानंतर ००१ नोंदवले असेल त्या व्यक्तीला गुंतवलेल्या रकमेच्या ५.४५ पट रक्कम मिळेल.

आता निमंत्रणासाठीचा निकष आणि हा परतावा कोण देतो ते. दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत.

भविष्यवेध आणि भविष्यवेध - २ हे जर वाचले असेल तर त्यात वर्णिलेली 'व्यवस्था' हे त्याचे उत्तर. आणि त्यात नोंदवलेली पात्रता हीच या गुंतवणुकीसाठीची पात्रता. 'व्यवस्था' सर्वांवर लक्ष ठेवून असते. आणि योग्य व्यक्तीला न चुकता निमंत्रण येते.

समजून घेणाऱ्यास इषारा पुरे आहे.