रूप-प्रतिरूप

दुर्गेशचा फोन आला आणि मी दचकून जागा झालो.

उठून आवरून ऑफिसला जायच्या तयारीत असताना आजची मीटींग थेट पुढल्या आठवड्यावर गेल्याचे कळाले तशी मी ऑफिसचे कपडेही न बदलता आरामखुर्ची गाठली होती. म्हणजे आज ऑफिसला जाणार नाही हा संदेश मी माझ्यासाठी प्रसारित केला होता. ही आरामखुर्ची फक्त सुट्टीच्या दिवशीच वापरायची असा मी उगाचच नियम केला होता.

ही आरामखुर्ची मी तयार करून घेतली होती. स्पेशल लोअर बॅक सपोर्ट, एअर व्हेन्टिलेशन, कन्टिन्यूअस रिक्ल्यायनेशन इ इ. इच्छा असल्यास ती संपूर्ण आडवी समतल करता येई. थोडक्यात, तिचा बिछाना करता येई.

आरामखुर्चीत पडून पेपर वाचतावाचता डोळा लागला होता. सकाळच्या दहा-सव्वादहा वाजताच उन्हाच्या झळा जाणवत होत्या.

आमच्या इमारतीच्या आणि बाणेर टेकडीच्या मध्ये ही सतरा मजली अजस्त्र इमारत उभी राहिल्यावर उन्हाळा जास्तीच जाणवू लागला होता.

एक तर टेकडीचे दर्शन होईनासे झाले होते, एक हायवेजवळचा पश्चिमेचा कोपरा सोडला तर. आणि दुसरे म्हणजे कोंडनानी बिल्डर्सनी या इमारतीला 'व्यावसायिक' श्रेणीत बांधकामाची परवानगी मिळवली होती. सगळी इमारत भिंतींऐवजी चकाकत्या काचांनी अवगुंठित झाली होती. त्यामुळे एखाद्या सुमो पैलवानाच्या ढेरीवर आपटणारी कुठलीही वस्तू जशी तत्परतेने परत फेकली जाते तसा प्रकाश (आणि उष्णता) त्या इमारतीवरून चहूबाजूंना परावर्तित केली जात होती.

A + R + T = 1. मला उगीचच चारेक दशकांपूर्वी बीएस्सी करताना शिकलेले समीकरण आठवले. यातल्या R (रिफ्लेक्शन) चीच किंमत जवळपास १ असावी. त्यामुळे A (ऍबसॉर्प्शन) आणि T (ट्रान्समिशन) नगण्य. एल एल बी करण्याआधी मी बीएस्सी (फिजिक्स) केले होते हेच विसरायला झाले होते त्यामुळे हे समीकरण अचानक आठवल्याने आश्चर्यच वाटले.

डोळे न उघडताच मी फोन हातात घेतला.

फोन दुर्गेशचा होता हे कसे कळाले? तर त्याच्यासाठी वेगळा रिंगटोन लावला होता. घोड्याच्या टापांचा.

त्याची कहाणी अशी की दुर्गेशची बायको संयोगिता. कॉलेजमध्ये आमचे त्रिकूट प्रसिद्ध होते. संयोगितेच्या नावावरून दुर्गेशचे नाव मी 'पृथ्वीराज' ठेवले होते. म्हणून घोड्याच्या टापा.

संयोगितेचे नाव तिच्या आई-वडिलांनी काय कारणाने वा हौसेने ठेवले होते कुणास ठाऊक. युनायटेड वेस्टर्न बॅंकेच्या हेड ऑफिसमध्ये चीफ मॅनेजर असलेले तिचे वडील काशिनाथ हरी पटवर्धन रत्नांगिरीच्या खालच्या आळीतून निघून साताऱ्याच्या कूपर कॉलनीत घर बांधून स्थायिक झाले होते. थोरल्या मुलाचे नाव लक्ष्मण आणि धाकट्या मुलीचे नाव सुनीता. यात मधल्या मुलीचे नाव संयोगिता ठेवण्यामागचे कारण कळण्याबाहेरचे होते.

बाकी जन्मतः ठेवलेले नाव तिला मोठेपणी शोभून दिसे. ती देखणी होती. पण ते देखणेपण चित्पावनी घारी-गोरी चाफेकळी नाक इ इ श्रेणीतले नव्हते. एखाद्या ऐतिहासिक राजघराण्यातल्या महाराणीसारखे होते. साडेपाच फुटांच्या वरची उंची, मजबूत हाडपेर, थोडासा पुरुषी चेहरा.

पुण्याला कॉलेजात आल्यावर ती बास्केटबॉल टीमची कॅप्टन तर झालीच, शिवाय बॅडमिंटनमध्ये तीन पदके (एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी) पटकावून बसली. मी तिचा मिश्र दुहेरीतला भिडू.

दुर्गेश त्यामानाने अगदीच मिळमिळीत. पुस्तके, बुद्धिबळ, ब्रिज यापलिकडे त्याची धाव कधी गेली नाही. तो मूळचा पुण्याचाच. घोले रोडवरचा सगळ्यात जुना बंगला त्याच्या आजोबांचा. रावबहादुर शिरोळ्यांचा. त्यांच्या घराण्यात गेल्या पाचेक पिढ्या 'फक्त एक मुलगा' अशी वंशसातत्याची परंपरा होती. त्याला दुर्गेशही अपवाद नव्हता. त्याच्या वडिलांची पूर्णवेळ व्यसने दोन - घोडेस्वारी (स्वतःच्या मालकीच्या घोड्यांवर अर्थात) आणि व्हिंटेज कार संग्रह. १९५८ सालची मर्सिडीज बेंझ ३०० एस एल रोडस्टर ही त्यांच्या व्हिंटेज कार्सच्या ताफ्यातली सगळ्यात 'नवीन'. त्याचे वडील महिन्यातला बऱ्याच वेळ त्यांच्या तळेगांवजवळच्या स्टड फार्मवर राहत. चारदोन दिवस पुण्यात.

त्या सरदार घराण्यात असला ग्रंथकीटक कुठून आला याचे जाहीर आश्चर्य त्याच्या आजोबांना मरेपर्यंत (आजोबा मरेपर्यंत) वाटत राहिले.

बुद्धिबळातला तो चॅंपियन होता. टिकून राहिला असता तर ग्रॅंडमास्टर झाला असता. पण कॉलेजात दुसऱ्याच वर्षी त्याला संगणकाचे वेड लागले. संगणक ही अप्राप्यच नव्हे तर अतर्क्य नि अविश्वसनीय गोष्ट असण्याचा तो काळ. दुर्गेशचे मूळ प्रेम गणितावर. लिनीअर अल्जिब्रा नि व्हेक्टर कॅल्क्युलस शिकताशिकता तो संगणकाच्या आहारी गेला नि तिथेच रमला. मग बुद्धिबळ नि ब्रिज छंदापुरते उरले, पुस्तक वाचनातून वेळ उरला तर.

सध्या तो स्वतःची एक बुटिक सॉफ्टवेअर कंपनी चालवीत होता. बावधनला त्याच्या पिढीजात मालकीची एक दीडेक एकराची जागा होती. त्यात त्याने एक बंगला (त्या दोघांसाठी; दोघांना मूलबाळ नव्हते), एक तीनमजली ऑफिस, एक बॅडमिंटन कोर्ट नि एक स्विमींग पूल एवढे बांधून घेतले होते. घोले रोडच्या जागेत आता 'निओ मॉल' झाला होता.

गेल्या पंचवीस वर्षांत त्याच्या कंपनीतली कर्मचारीसंख्या कधी पन्नासच्या वर नि चाळीसच्या खाली गेली नाही. गेल्या पाच वर्षांत त्याचा रेव्हेन्यू कधी पाच मिलियन डॉलरच्या वर नि चार मिलियन डॉलरच्या खाली गेला नाही. सास (सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस) ही संकल्पना त्याची नव्हती, पण असायला हरकत नव्हती इतका तो त्यात मुरला होता. अमेरिकेतल्या दोन क्लायंट्सनी त्याने सुरुवात केली होती आणि ते दोन क्लायंट्स अजूनही होते. बाकीचे केवळ 'वर्ड ऑफ माऊथ' या प्रकारातून आलेले. त्याच्याकडे आजही 'मार्केटिंग'साठी कुणीही नेमलेला माणूस नव्हता. एखादा नवीन क्लायंट आला(च) तर कुणीतरी सीनीयर सॉफ्टवेअर एंजिनिअर जाऊन एस ओ डब्ल्यू (स्कोप ऑफ वर्क) ठरवून येई. किंमतीबद्दल दुर्गेश ठरवेल ते. फक्त प्रोजेक्ट स्वीकारण्याआधी तो स्वतः क्लायंटच्या ऑफिसला एकदा जाऊन येई. तिथले 'वर्क कल्चर' आवडले तर पुढे, नाहीतर मागे. किमान निम्मी क्लायंट मंडळी (होऊ इच्छिणारी) या चाळणीतून गळून जात.

मी कोल्हापूरच्या गंगावेशीतल्या दांडेकर वाड्यातून पुण्यात अवतरलो होतो. बारावीचे मार्क ठीकठाक होते, पण इंजिनिअरिंग इतके ठीकठाक नव्हते.

माझे वडील त्यांच्या काळची मॅट्रिक पार करून लांज्याजवळच्या देवध्याहून नोकरीसाठी कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर म्युनिसिपल काउन्सिल मध्ये ते क्लार्क म्हणून चिकटले (नि सुपरिटेंडंट म्हणून निवृत्त झाले). अंथरूण पाहून त्याच्या चार बोटे आतच पाय पसरावे हा हर्डीकरी हिशेबीपणा त्यांच्या रक्तात होता. पण माझ्यापर्यंत तो पोहोचला नाही, थेट धाकट्या अवधूतकडेच गेला.

म्हणजे मी हिशेबी नव्हतो असे नव्हे. पण माझा हिशेब आळस भावनेने प्रेरित होता. कमीतकमी अभ्यास करून कसे बरे मार्क मिळवावेत, कमीतकमी व्यायाम करून कसे वडीलधाऱ्यांच्या नजरेतून सुटावे (दांडेकर वाड्यात आमचे शेजारी मालशेकाका वाड्यातल्या नि आसपासच्या सगळ्या मुलांना आपल्या देखरेखीखाली वाड्याच्या अंगणात सूर्यनमस्कार, जोर, बैठका आदि करायला लावीत; त्यातली न्हाणीघराच्या बाजूच्या कोपऱ्यातली जागा त्यांच्या अर्धअधू दृष्टीला नीटशी उमगत नसे हे कळाल्यावर मी वहिवाटीच्या हक्काने तो कोपरा ताब्यात घेतला. मग जोरबैठकांच्या वेळी श्वासोच्छवासाचे योग्य आवाज काढले की झाले), वगैरे.

म्हणून मी लग्नही केले नव्हते. पण धाकट्या अवधूतने लग्न करून आई-आबांना सून, नातू इ सर्व पुरवले होते. तो कोल्हापुरातच टॅक्स कन्सल्टंट म्हणून स्थिरावला होता. फक्त दांडेकर वाड्यातून तो कळंब्याच्या आयटीआयजवळ बंगल्यात रहायला गेला होता. तसेही दांडेकर वाड्याची जागा भाड्याचीच होती. तिथे आता सातमजली अंबाबाई रेसिडेन्सी उभी आहे. अवधूतने तिथे दोन फ्लॅट घेऊन ठेवले होते (त्याच्या दोन मुलांसाठी). मीही तिथे फ्लॅट घ्यावा असा त्याचा नि आबांचा आग्रह होता. 'स्थावर मालमत्ता जोडून ठेवावी' या आबांच्या पिढीच्या तत्त्वाला अनुसरून. तेव्हा मी "अरे तू नि मी काय वेगळे आहोत का?" असा बंधूप्रेमाचा देशस्थी अघळपघळ संवाद उच्चारून कशीबशी सुटका करून घेतली होती.

ही पुण्याची जागाच विकत घेताना माझा धीर कसाबसा टिकला होता. तेही बिल्डर असलेल्या माझ्या एका कॉर्पोरेट क्लायंटने (ईटीएल बिल्डर्स) त्याचे मलेशियातले एक कारखाना बांधणीचे कायदेशीर कंत्राट मी नीट पार पाडून दिले होते त्याबद्दल अगदी नगण्य किंमतीत मिळवून दिला होता म्हणून. ही सोसायटी एका पाचमजली इमारतीची होती, ईटीएल बिल्डर्सच्या दृष्टीने 'इन्फ्रा डिग' अशी. त्याच्याकडच्या एका सिव्हिल एंजिनिअरने वेगळा होऊन बिल्डरगिरी सुरू केली होती त्या एंजिनिअरला सांगून मला हा फ्लॅट देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

अशा वाटाघाटींमध्ये संयोगिता पटाईत होती. तिनेच हे सगळे घडवून आणले होते.

आम्ही कॉलेजमध्ये कसे भेटलो ही कहाणी मजेशीर होती.

संयोगितेच्या गुहागरच्या आजीने (आईची आई) संयोगिता पुण्यात आल्यापासून गोळीबार सुरू केला होता. "मुलीच्या जातीला हा अगोचरपणा शोभतो का? कसले पुरुषी खेळ नि कसल्या लांड्या कपड्यांत सगळ्यांसमोर खेळायचे? उषे (संयोगितेच्या आईचे नाव), पार वाया घालवलीस हो मुलीला. गुहागराच्या केतकरांच्या (संयोगितेच्या आईचे माहेर) इभ्रतीचा तरी विचार करायचा? वादविवाद स्पर्धेत भाग घेऊ दे फार तर" वगैरे. झाले एवढेच, की बास्केटबॉल नि बॅडमिंटन याबरोबरच ही 'डिबेट क्लब' काय भानगड असते ते पाहू म्हणून संयोगिता ऍम्फी थिएटरच्या एका वर्गात भरणाऱ्या डिबेट क्लबमध्ये आली.

दुर्गेश प्रथमदर्शनीच तिच्या मोहात पडला होता. तोही मागोमाग आला.

मला बॅडमिंटनची आवड होती. खेळताही यायचे बऱ्यापैकी. पण मला कुणीतरी सांगितले की डिबेट क्लबमध्ये फारच तुरळक उपस्थिती असते. बऱ्याचदा अनेक स्पर्धांत तीनपेक्षा जास्ती विद्यार्थी सहभागी होत नाहीत. मी त्याचा अर्थ असा लावला की केवळ भाग घेतला की तिसरे बक्षीस तरी पदरात पडेल. म्हणून मी गेलो.

तिथे गेल्यावर मला कळाले की मला मिळालेली माहिती चुकीची होती. शंभर वर्षे पूर्ण करीत असलेल्या आमच्या कॉलेजच्या डिबेट क्लबलाही बहुधा तितकीच वर्षे पूर्ण होत होती. आणि तिथे झुंबड होती. इच्छुकांची 'ऑडिशन' चालू होती. मी मागे सरकत भिंतीला खेटून उभा राहिलो.

संयोगिता बॅडमिंटन कोर्टवर शिरल्याच्या आवेशात वर्गात शिरली. तिने नजरेने सगळी उपस्थित मंडळी टिपली आणि शटल अलगद प्लेस करावे की स्मॅश मारावा या दुविधेत ती आवेशपूर्ण पोजमध्ये उभी राहिली. आजूबाजूची पाचदहा मंडळी टरकून बाजूला झाली आणि 'ऑडिशन' घेणारी मंडळी दृग्गोचर झाली. समोर होतकरू 'क्यांडिडेट' दिसल्यावर डिबेट क्लब प्रमुख कोल्हटकर सरांनी "विज्ञान आणि तंत्रज्ञान - परस्पर पूरक की परस्पर मारक" असा विषय तिच्यावर फेकला. संयोगिता बी ए सायकॉलजी वाली. हे बॅडमिंटन कोर्ट नव्हे आणि डिबेट हे आपले काम नव्हे हे उमगल्यावर ती मुकाट चालू लागली. मोझेस-समुद्र न्यायाने गर्दीने दुभंगून तिला वाट करून दिली. तिच्या मागोमाग दुर्गेश आणि त्याच्यामागे मी.

"काय थर्ड क्लास गर्दी आहे तुमच्या पुण्यात!" तिने एक जहरी वाग्स्मॅश मारला. पुणेरी दुर्गेशने तो मुकाट झेलून तिला पॉईंट दिला. तसाही बॅडमिंटन कोर्टवर तिचा स्मॅश शंभरेक किमीच्या वेगाने यायचा (हे मी नंतर अनुभवले). मी "ह्यॅ तर काय. यापेक्षा रंकाळ्याची नायतर भवानीमंडपातली गर्दी बरी" असे म्हणून माझे अपुणेरी (आणि सकोल्हापुरी)पण सिद्ध केले.

"बनवडा खायचा का?" दुर्गेश धीर करून पुटपुटला. मी नि संयोगिता दोघेही बुचकळ्यात पडलो. एक तर नीट ऐकू आले नाही, आणि जे ऐकू आले त्याचा अर्थ कळाला नाही. "नाही, इथल्या कॅंटीनचा स्पेशल आहे. अख्ख्या पुण्यातून येतात लोक इथे खायला" दुर्गेशला व्हॉल्यूमचे बटन सापडले होते बहुतेक. कारण हे नीट ऐकू आले. हा काय पदार्थविशेष हे पाहू तर या म्हणून दोघेही हो म्हणालो.

आणि आमची मैत्री जुळली.

तर अशा या दुर्गेशने घोड्याच्या टापांनी मला उठवले होते.

"काय च्यायला सकाळी सकाळी त्रास आहे..."

"अरे मूढ अधमा, प्रातःकाली अर्वाच्य वाणी?" माझ्याशी बोलताना दुर्गेश हाताला लागतील ते संस्कृत शब्द (त्याच्या भाषेत 'बामणी') पेरीत असे.

"व्हय भाड्या, भडव्या, भोसडीच्या."

"ठीक ठीक, आजचा कोटा पूर्ण झाला. सकाळी सकाळी झोपा काढण्यापेक्षा जरा इकडे ये"

"इकडे?"

"इथे. पुण्यात. बावधनला. घरी."

"या उकाड्यात या गर्दीत या रस्त्यांवरून गाडी चालवीत?"

"अरे, दुसऱ्यांसाठी गाडी चालवणे हा काही लोकांचा व्यवसाय असतो. त्यांना पूर्वी टांगावाले म्हणत, आता रिक्षावाले म्हणतात. नवीन पिढी त्यांना ओला/उबर म्हणते. त्यांना दे काय ते पैसे नि ये. आल्यावर क्लेम कर, रिएंबर्स करतो" (कऱ्हाडे लोकांच्या हिशेबीपणाबद्दल टोमणे मारण्याची संधी दुर्गेश सोडीत नसे).

मी तयार होतोच. फक्त तोंड धुऊन स्वैपाकघरात थोडी आवरासावर केली नि निघालो. बाणेर ते बावधन जेमतेम वीस मिनिटे लागली.

रस्त्याला लागून ऑफिसची इमारत, मग कव्हर्ड स्विमींग पूल नि बॅडमिंटन हॉल, मग सिक्युरिटी गेट आणि मागे बंगला. मी सिक्युरिटी गेटपाशी जाऊन तोंड वर केले. वरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला फेस रेकग्निशन सॉफ्टवेअर जोडले होते. माझी ओळख पटायला सुमारे तीन दशांश सेकंद लागले नि गेट उघडले. मी आत आल्यावर बंद झाले.

दुर्गेश तळमजल्यावरच्या त्याच्या खाजगी ऑफिसमध्ये धिप्पाड रिव्हॉल्व्हिंग चेअरमध्ये मागे रेलून बसला होता. जाणवण्याइतपत थकलेला नि निस्तेज.

"बस" खोल गेलेल्या आवाजात तो म्हणाला.

"अरे गेल्या वीस मिनिटांत दमलास? फोनवर एवढा उधळत होतास नि एकदम काय झाले? संयोगिता कुठे गेली?" मी काळजीच्या स्वरात विचारले. दुर्गेश तसा तंदुरुस्त होता, पण व्यायामाची त्याला साफ नावड होती. उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यापासून तो नाइलाजाने योगासने आणि चालणे करायला लागला होता. पण संयोगिता नसली की तो दांड्या मारायच्या नवनवीन युक्त्या शोधून काढी. त्याचे फिटबिट त्याच्याच हातावर आहे ना ते तपासणे गरजेचे झाले होते.

"संगीता (तो 'यो' गाळून तिला संगीता म्हणत असे) गेलीय तिकोन्याला. मी रात्री जाणारे."

तिकोना पेठ गावाजवळ त्यांनी दोन एकराचा एक तुकडा घेऊन त्यात एक छानसे पश्चिममुखी घर बांधले होते. पाठीशी तिकोना किल्ला, समोर तुंग, पायाशी पवना धरण. सभोवताली बाराफुटी उंच तारेचे कुंपण.

"मी ठीक आहे. आता मी जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. आणि कुणाशीही याबद्दल बोलू नको. संगीताशीही नको."

"हूं".

"गेली काही वर्षे मी एका वेगळ्याच प्रयोगात गुंतलो होतो. त्याला 'डार्क एनर्जी' म्हण, 'द सिस्टीम' नाहीतर अजून काही. तुला तसेही कंप्यूटरबद्दल स्पेलिंगखेरीज काही कळत नाही. आणि स्पेलिंगही 'स्पेलचेक'मुळे"

हे खरे होते. बीएस्सीच्या शेवटल्या वर्षात 'ऑप्शनल' म्हणून कंप्यूटर हा विषय आमच्या वेळेस नुकताच सुरू झाला होता. पण साठ मुलांच्या तुकडीत जेमतेम दहाबारा जणांनाच तो मिळे. माझे मार्क जरी पुरेसे असले तरी मी तो विषय टाळून 'अप्लाईड न्यूक्लिअर फिजिक्स' घेतला होता. भारतात तेव्हा 'कॅट स्कॅन' ही संकल्पना नुकतीच रुजू लागली होती. आणि ऍटॉमिक फिजिक्स हा माझा (तोपर्यंत) आवडीचा विषय होता. पण बीएस्सी पूर्ण होईपर्यंत ती आवड काही खरी नाही हे उमगले. मग काय करायचे? आतापर्यंतच्या शिक्षणाशी संबंधित नसलेले काहीतरी एवढेच मनात होते. विचार करकरून मी चार्टर्ड अकाउंटंट किंवा वकील या दोन पर्यायांवर येऊन अडलो. मग संयोगितेने मला अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पुढला मार्ग दाखवला - छापाकाटा करून मी वकिली करायला गेलो.

"तर न हसता नि न टोमणे मारता ऐक."

"आपण कंप्यूटर वापरतो, आता इंटरनेट वापरतो, आणि या दोन्ही गोष्टी आपण कसकशा तयार केल्या आणि सुधारत नेल्या हेही जाणतो.

"गेली काही वर्षे मला असे जाणवायला लागले की कंप्यूटर नि इंटरनेट हे आपण समजतो तसे नि तितके सरळसोपे प्रकरण नाही."

"वाईट प्रोग्रामिंग मुळे सिस्टीम क्रॅश होणे यात काही आश्चर्य नाही. वाईट कारागिरी ही मानवी इतिहासाचाच एक भाग आहे. झालेल्या एका ताजमहालामागे न होऊ शकलेले पाचपन्नास असतात."

"तुला माहित नसेल, कार्ल बेन्झ नि गॉटलिब डाईमलर एक दुचाकी तयार करण्याच्या खटपटीत होते. यशस्वी झाले असते तर हिल्डरब्रॅंड नि वोल्फम्युलर यांच्याही आधी डाईमलर-बेंझ दुचाकी आली असती. पण कार्ब्युरेटरमधले फ्लोट चेंबरचे डिझाईन सदोष झाल्याने यांची दुचाकी दहातल्या सात वेळेस चालूच होत नसे."

दुचाकी वाहनांच्या बाबतीत दुर्गेश 'हिज फादर्स सन' होता.

"तर मी कंप्यूटर केव्हा आणि का चूक करतो हे तपासायला लागलो तर 'बॅड वर्कमनशिप' याखेरीजही काही कारणे आहेत हे मला उमगायला लागले."

"पण आश्चर्यकारक गोष्ट पुढेच आहे. काही वेळेस चुकीचे प्रोग्रामिंग होऊनही कंप्यूटर बरोबर काम करतो अशा केसेस सापडायला लागल्या. त्याचा शोध घेत पुढे गेलो तर असे जाणवले की आपण प्रोग्रामिंग करतो नि कंप्यूटर/इंटरनेट त्याबरहुकूम वागतात हे अर्धसत्य आहे. कंप्यूटर-इंटरनेट ही एक स्वायत्त संस्था आहे. ती संस्था आपल्या स्वायत्त अस्तित्वाच्या अनेक खुणा मागे सोडते. पण त्या खुणा इतक्या पुसट असतात की सतत शंकेला जागा. आणि त्या खुणांचा अर्थ लावण्याचे तंत्र फारच काऊंटर-इंट्यूइटिव्ह. शिवाय त्याचे मॅन्युअलही कुठे उपलब्ध नाही."

"जांभई दाबू नकोस, येऊ देत. मी कॉफी मागवतो. दहा मिनिटे थांबू."

त्याचा आवाज अजूनच खोल गेला होता. त्याने इंटरकॉमवरून गर्वेशला दोन कॉफी आणायला सांगितले आणि खुचीच्या मागे मान टेकवून डोळे मिटले. गर्वेश हा नेपाळी मुलगा गेली तीन वर्षे दुर्गेश-संयोगिताकडे कुक म्हणून काम करीत होता. तिथेच मागे आऊटहाऊसमध्ये राहायला होता. मितभाषी आणि बहुगुणी. लेकाचा कोंकणी वड्यांपासून कोल्हापुरी रश्श्यापर्यंत सगळे नीट शिकला होता. फेटून घोटून केलेली कॉफी ही तर त्याची खासियत.

मला डुलकी यायला लागलीच होती. पण दुर्गेश जे काही बोलत होता तेही वेगळे वाटत होते. मी कंप्यूटर फारसा वापरीत नसे. आणि मला त्यातले फार कळतही नसे. दुर्गेशची कंपनी काय करते याची तांत्रिक माहिती मला अजिबात नव्हती. त्याचे सगळे लीगल कॉन्ट्रॅक्ट्स मला तोंडपाठ होते आणि दुर्गेशला त्याबद्दल सही करण्याखेरीज काही माहीत नव्हते. कामाची ही विभागणी उभयपक्षी सोयीची होती. मग हा अनाक्रमण करार त्याने आज का मोडला असावा?

दहा मिनिटांत कॉफी आली. दुर्गेशने डोळे उघडले नि म्हणाला "आता मी आधी तुला एक प्रात्यक्षिक दाखवतो नि मग पुढे".

समोरच्या लॅपटॉपवरून त्याने स्काईप कॉल सुरू केला आणि लॅपटॉप फिरवून स्क्रीन माझ्याकडे करून म्हणाला, "बोल".

समोर स्क्रीनवर दुर्गेश होता. पण वेगळ्या कपड्यांत. "बोला वकील बाबू", माझ्यासाठी त्याचे नेहमीचे संबोधन वापरून तो म्हणाला.

मी गोंधळलो. मग सावरलो.

"काय खुळचट पणा लावलाहेस दुर्गेश? स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून 'डबल रोल'चा खेळ? एवढेही न कळण्याइतका मी तंत्रज्ञान-निरक्षर नाही हे विसरू नकोस" मला वैताग आला होता.

"त्याला त्याच्या मागची खिडकी उघडायला सांग, हातातला पेपर दाखवायला सांग नि मागचा टीव्ही नीट दिसेल असा वेबकॅम ऍडजस्ट करायला सांग" मी काहीच बोललो नसल्यासारखा दुर्गेश (माझ्यासमोरचा) म्हणाला.

मी मुकाट तसे केले. स्काईपवाल्या दुर्गेशने आधी हातातला पेपर वेबकॅमजवळ आणून दाखवला. आजचा इंडियन एक्सप्रेस, पुणे एडिशन. मग मागे वळून खिडकीचा पडदा दूर केला नि लॅपटॉप उचलून मागेमागे गेला. खाली दिसणारा गजबजलेला हायवे, पलिकडची ह्युंदाईची शोरूम... मला एकदम वीज चमकल्यासारखे झाले. हा तर बायपासवरच्या सयाजी हॉटेलमधल्या आठव्या मजल्यावरचा दुर्गेशचा आवडता प्रीमीयम स्वीट. खाली दिसणारा बायपास नि पलिकडची गारवे ह्युंदाई शोरूम. मग परत लॅपटॉप फिरवून त्याने वेबकॅम टीव्हीवर रोखला. 

त्या दिवशी सकाळी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) अकरा वाजता चांद्रयान-४ चे उड्डाण होणार होते. टीव्हीवर त्याचे लाईव्ह प्रक्षेपण चालू होते.

थोडक्यात, हे करून ठेवलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हते. पण मग हा स्काईपवाला दुर्गेश बोलत का नव्हता काही?

"बोला वकील बाबू" स्काईपवरचा दुर्गेश म्हणाला.

"बुचकळ्यात पडलास ना? आता तुझ्यासमोरचा दुर्गेश काय ते सांगेल तुला. बाय"

स्काईप कॉल बंद झाला.

माझ्यासमोरच्या दुर्गेशने त्याच्या मोबाईलवर काहीतरी केले, एक दीर्घ श्वास घेतला. आणि आतापर्यंत मरगळलेला, खोल आवाजात बोलणारा दुर्गेश एकदम तरारून उठला. ऍनिमेशन फिल्ममध्ये जसे पेरलेल्या बीचे झाड होते, ते मोठे होते नि त्याला लगेच फुले येतात तसे मला वाटले.

"तर मगाचचे कंटाळवाणे निद्रोत्तेजक भाषण आता कळायला लागले का? असो, थोडक्यात सांगतो. मला रिअल टाईम क्लोनिंग करण्याचे तंत्र सापडले आहे. मी स्वतःच्या एक वा जास्त प्रती काढू शकतो. अजून मला पूर्णपणे हे तंत्र आत्मसात करता आले नाहीये, पण शिकतोय."

"थोडक्यात, सयाजीच्या स्वीटमधला दुर्गेश खरा आहे."

मला जेटलॅग नि हॅंगओव्हर एकदम आल्यासारखे वाटायला लागले.

"अरे, पण... असो. पण तू एवढा मरगळलेला कशाने झाला होतास? आणि आता एकदम नॉर्मल?"

"सांगतो. तंत्र असे आहे की मला माझ्या प्रती काढता येतात. मूळ अधिक एक वा मूळ अधिक दोन वा जास्तीही. अजून मी मूळ अधिक एक प्रत यावरच प्रयोग करतो आहे."

"या तंत्रामध्ये एक मूलभूत नियम आहे. सर्व मानवी शक्ती, क्षमता आणि कौशल्ये ही या सर्व प्रतींमध्ये विभागली जातील. या नियमाला अपवाद करता येत नाही. किमान मला तरी अपवादाबद्दल अजून माहीत नाही."

"शारिरीक क्षमता घे. आज सकाळी मी गर्वेशला मुद्दाम कुंभारवाड्यावर तारूच्या दुकानातून मासे आणायला पाठवले. 'इथे कोथरूडमध्येसुधा तारूचे दुकान आहे' अशी तो किरकीर करीत होता पण त्याकडे लक्ष दिले नाही. तिथे जाऊन कुठले मासे ताजे आहेत ते पाहून फोन कर असे बजावून सांगितले."

"माझी प्रत तयार करण्यासाठी सुमारे पंचवीस मिनिटे लागली. गर्वेश लेकाचा अर्ध्या तासात पोहोचलाही कुंभारवाड्यावर. मग त्याला फोनवर उगाचच 'मांदेली आण, सुरमई नको, बांगडा आण, नाहीतर बांगडा राहू दे, सुरमईच आण' असे उलटसुलट बजावले."

"फोन ठेवल्यावर मी माझ्या प्रतीमध्ये माझ्या सर्व शक्ती, क्षमता नि कौशल्ये ८०% भरल्या नि दिला पाठवून 'सयाजी'ला. मी इथे निवांत झोपलो."

"माझी प्रत 'सयाजी'मध्ये पोहोचून त्याने चेक इन केले आणि रूमबाहेर 'डू नॉट डिस्टर्ब' लावून टाकले. मग तुला फोन करण्यासाठी मी माझ्या शक्ती, क्षमता नि कौशल्ये ८०% माझ्याकडे घेतल्या. तेवढ्यापुरता प्रतिदुर्गेश रूममध्ये मरगळून पडला."

"मग परत त्याला ८०% दिले नि मी खुर्चीत निस्तेज होऊन बसलो. पण यावेळी शारिरीक क्षमता ८०% दिली होती. नि विचार क्षमता ३० टक्केच. कारण तुला सर्व समजावून सांगण्यासाठी मला ७०% तरी विचारक्षमता लागणार होती."

"सध्या आपण फक्त शारिरीक नि विचारक्षमतेबद्दल बोलतोय. इतर अनेक कौशल्ये आहेत. अगदी मोबाईल वापरण्यापासून संवाद साधण्यापर्यंत. ही सर्व मी त्याला ८०% दिली कारण चेक इन करताना इंग्रजीत बोलणे, क्रेडिट कार्ड स्वाईप करणे इ गोष्टी त्याला नीटच जमायला हव्या होत्या."

"आतापर्यंत मी पाचसात वेळेला प्रती काढून पाहिल्या होत्या पण त्या केवळ इथल्या इथे. संगीता नसताना. आज पहिल्यांदा प्रत काढून बाहेर स्वायत्त पाठवली त्यामुळे मीही घाबरलेला होतो. आता १०% क्षमता देऊन त्या दुर्गेशला रूममध्ये झोपवून टाकलाय म्हणून मी परत टवटवीत दिसतोय."

माझे जेटलॅग-हॅंगओव्हर काँबिनेशन अजूनच तिखट झाले.

"पण ही देवाणघेवाण कशी होते? आणि तू मूळ नि तो प्रत हे कोण ठरवते?" मी कसाबसे प्रश्न शब्दांकित केले.

"हे माझ्या मोबाईलवरचे ऍप या सगळ्या गोष्टी करते. हे ऍप ज्याच्याकडे ती मूळ प्रत. आणि एक लक्षात घे, मीसुद्धा अजून पडत धडपडतच शिकतोय. कंप्यूटर-इंटरनेटचा कणा असलेली ही 'सिस्टीम' मला थोडीथोडी कळायला लागली आहे. ही 'सिस्टीम' अस्तित्वात आहे हाच माझ्यासाठी मोठा शोध होता. जमेल तसे शिकतोय."

"अजून एक महत्वाचा विना-अपवाद नियम सांगतो नि थांबतो. मृत्यू. कुठल्याही एका प्रतीचा मृत्यू झाला तर बाकीच्या सर्व प्रती तत्क्षणी मृत्यू पावतील. तिथे मूळ प्रत नि बाकीच्या असा भेद नाही".

"असो. आता मी गाडी काढून 'सयाजी'ला जातो,

मी थकून डोळे मिटले.

गेल्या शतकाच्या अखेरीस अवतरलेल्या डॉली या मेंढीने जितके प्रश्न उपस्थित केले त्याच्या शतपटीने या तंत्रातून प्रश्न निर्माण होणार होते. नैतिक, कायदेशीर, मानसिक, सामाजिक.... थोडक्यात मानवाचे अस्तित्व ज्या ज्या गोष्टींनी सिद्ध होते त्या सगळ्या गोष्टींना हे तंत्र मुळापासून हादरवून टाकणार होते.