'जमनापार'च्या निमित्ताने

मानवजात 'भटके शिकारी' या स्थितीतून हळूहळू 'शेतकरी' या स्थितीकडे आली आणि वसाहतींची सुरुवात झाली. या वसाहती अर्थातच शेतीसाठी आणि मानवी जीवनासाठी अत्यंत गरजेच्या असणाऱ्या एका मुख्य घटकाच्या - पाण्याच्या - उपलब्धतेनुसार झाल्या. आणि त्यानुसारच गावाचे वेगवेगळे भाग पडले.

पाण्याच्या (आणि शेतीच्या) पुरेशा सान्निध्यात, इतर मानवांच्या सहवासात पण पुरासारख्या अरिष्टांपासून पुरेसे लांब असलेले भाग अर्थातच पहिल्या पसंतीचे होते. इतर मानवांच्या सहवासात हे सुरुवातीला वन्यप्राण्यांपासून आणि नंतर शत्रू मानवप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी. त्यातून जे बाहेर टाकले गेले ते गावकुसाबाहेर हाकलले गेले.

कालौघात गावाचे वेगवेगळे भाग हळूहळू उच्च-मध्यम-कनिष्ठ वर्गात विभागले गेले.

नंतर पाणी या घटकाऐवजी वेगवेगळ्या व्यवसायांवरून गावाचे भाग पडत गेले. तांबट आळीची ठोकाठोक सतत कानी पडणाऱ्या भागापेक्षा तुलनेने शांत असलेला भाग उच्च. कामकाजाच्या ठिकाणांना जवळ असलेला भाग उच्च. रुंद रस्ते आणि कमी गर्दी असलेला भाग उच्च.

वेश्यावस्तीजवळचा भाग कनिष्ठ (पुण्यात बुधवारपेठ, कलकत्त्यात शोनागाछी, मुंबईत कामाठीपुरा इ).

तसेच मोठ्या शहराजवळचा, पण शहरात सामील नसलेला भाग मध्यम/कनिष्ठ. तीस-चाळीस वर्षांपूर्वी पुण्याच्या आसपास असलेले पण पुण्यात सामील नसलेले बावधन, उंद्री, पिसोळी, उत्तमनगर, बावधन, भूगांव हे भाग. मग हे भाग सामील झाले तरी त्यांचे नामकरण अशा पद्धतीने केले जाई की जवळच्या 'उच्च'श्रेणीतल्या भागाचा परप्रकाश नावावर पडावा. उंद्री म्हणण्या ऐवजी 'कोंढवा ऍनेक्स', भूगांव म्हणण्या ऐवजी 'न्यू बावधन', मुंबईत घामट-घाणेरड्या 'परळ' ऐवजी 'अपर वरळी' इ. त्याच्या पुढचा भाग म्हणजे सोसायट्यांना थेट 'ऑक्सफर्ड व्हिलेज' वा तत्सम परदेशी नावेच देणे.

एखाद्या गावाची वस्ती काही आपत्तीमुळे अचानक जनलोंढा येऊन वाढली तर अशा निर्वासितांचा भाग कनिष्ठ. मुंबईजवळचे उल्हासनगर आणि पुण्याजवळचे पिंपरी हा निर्वासित सिंधी लोकांची वस्ती असलेला भाग. तसाच दिल्ली शहराच्या पूर्वेकडचा भाग.

दिल्ली या शहराचा इतिहास, भूगोल नि संस्कृती सगळे अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. मधली शंभरेक वर्षे सोडली तर सुमारे पाचशे वर्षे देशाची राजधानी. भारतावर सगळी परकीय आक्रमणे पश्चिमेकडून झाली. अगदी सिकंदराच्या काळापासून.

उत्तरेला हिमालयाने संरक्षण केले. पूर्वेला ब्रह्मपुत्रेच्या अरण्याने. आणि उत्तरेचे नि पूर्वेचे शेजारी पाश्चिमात्य देशांसारखे पिपासू नव्हते.

पश्चिमेकडून येणारे आक्रमक खैबर खिंड ओलांडून कडवट शिखांना तोंड देत दिल्लीला पोहोचत तेव्हा त्यांना लुटीसाठी/राज्य करण्यासाठी गंगा-यमुनेने सुपीक केलेले पठार उपलब्ध होई. दिल्लीचे नांव देहरी-देहलीज-देहली-दिल्ली असे उत्क्रांत होत गेले.

देहरी म्हणजे उंबरठा. 'बाबुल मोरा' या गाण्यात वाजिद अली शाह कळवळून 'आंगना तो परबत भया, देहरी भयी बिदेश' [अंगण एखाद्या पर्वतराजीसारखे ओलांडायला दुष्कर आणी उंबरठा तर परदेशाइतका दूर झाला आहे] असे म्हणतो. त्यातला देहरी.

सत्ताकेंद्र असलेले दिल्ली हरियाणा नि उत्तर प्रदेशाच्या बेचक्यात वसलेले आहे. आणि राजस्थान नि पंजाबला अगदी जवळ. त्यामुळे दिल्लीतली वस्ती पहिल्यापासूनच मिश्र.

त्यात फाळणीनंतर आलेल्या लोंढ्यामुळे नवनवीन वसाहती उभ्या राहिल्या. हा लोंढा किती मोठा होता? तर दिल्लीची लोकसंख्या जवळजवळ दुप्पट होण्याइतका.

सुरेंद्र मोहन पाठक हे हिंदीतले एक लोकप्रिय लेखक. त्यांचे त्रिखंडात्मक ('न बैरी न कोई बेगाना', 'हम नहीं चंगे बुरा न कोय' आणि 'निंदक नियरे राखिए') आत्मचरित्र बरेचसे वाचनीय आहे. पाठक सुमारे सात वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब लाहोरहून निर्वासित म्हणून येऊन दिल्लीत स्थायिक झाले. पहिल्या खंडात बरेचसे आणि इतर खंडात विस्कळीत स्वरूपात या निर्वासित जीवनाचे वर्णन आहे.

दिल्ली परिसरात वसतीसाठी यमुनेचा पश्चिम काठ जास्ती योग्य मानला गेला आहे. पूर्व काठ दलदल आणि/वा पुराचा धोका असलेला. त्यामुळे उदार शासनकर्त्यांनी निर्वासितांना वस्तीसाठी पूर्व काठ दिला.

या वस्तीला दिल्लीच्या भाषेत म्हणतात 'जमनापार'. दिल्लीच्या सामाजिक उतरंडीत 'जमनापारी' ही एक सणसणीत शिवी आहे. दक्षिण दिल्ली म्हणजे अर्थातच सर्वोच्च. मग घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने जात पश्चिम दिल्ली, उत्तर दिल्ली, मध्य दिल्ली.

पूर्व दिल्ली म्हणजे गटारगाळ. महाविद्वान महामहोपाध्याय शशी थरूर यांच्या सभ्य आणि प्रासादिक भाषेत 'कॅटल क्लास'.

तीसेक वर्षांपूर्वी मी पतपडगंज (पट्परगंज) या पूर्व दिल्लीतल्या भागात काही काळ जाऊनयेऊन राहिलो होतो. लघुचित्रपटक्षेत्रात काम करीत असताना दूरदर्शनच्या 'मंडी हाऊस' या मुख्यालयात चकरा माराव्या लागत म्हणून. मंडी हाऊस हा भाग कॅनॉट सर्कल आणि इंडिया गेट या सर्वोच्चवर्णीय भागांच्या जवळ. तेव्हा तर ही सामाजिक उतरंड एवढी तीव्र नि स्पष्ट होती की मंडी हाऊसपासून थेट पतपडगंजला जाण्यासाठी रिक्षावाले येत नसत. दिल्ली आणि पूर्व दिल्लीच्या सीमेवर असलेल्या आयटीओ (इन्कम टॅक्स ऑफिस) इथपर्यंतच येत. तिथून पुढे वेगळे रिक्षावाले असत.

ही पार्श्वभूमी घेऊन त्यावर कथावस्तू बेतलेली 'जमनापार' ही एक वेबसीरीज नुकतीच (मे २०२४) प्रदर्शित झाली. ऍमॅझॉन प्राईमच्या 'मिनी टीव्ही' या विभागात ती पहायला मिळते. 'मिनी टीव्ही' म्हणजे जाहिरातीयुक्त पण मोफत प्लॅटफॉर्म. आणि जाहिराती अगदी माफक. एका एपिसोडमध्ये जास्तीत जास्ती तीन.

शांतनू (शॅंकी) बन्सल हा अभ्यासात बऱ्यापैकी हुशार असलेला एक 'जमनापारी'. सीए परीक्षेत दोन आकडी एआयआर (ऑल इंडिया रॅंकिंग) असणारा. त्याचे वडील के डी बन्सलही सीए. त्यांचे जमनापार भागातच सीए क्लासेस.

इतर सीए क्लासेसबरोबरची त्यांची स्पर्धा, ऑनलाईन सीए क्लासेस घेणाऱ्यांची ऑफलाईन सीए क्लासेसशी स्पर्धा, शॅंकीची लग्न झालेली आणि बराच वेळ माहेरीच असलेली थोरली बहीण शैलजा, मातृवात्सल्याचा केवळ अर्क अशी आई, या घटना नि पात्रांमधून कथा पुढे सरकते.

शॅंकीला 'जमनापारी' हा शिक्का पुसून उच्चवर्गात जायचे आहे. त्यासाठी तो टोपणनाव बदलण्यापासून (शॅंकीचे शान) राहण्याचे ठिकाण बदलण्यापर्यंत (दक्षिण दिल्ली) सर्वकाही करतो. शॅंकी आधी एका जमनापार वस्तीतच असलेल्या छोट्याशा सीए फर्ममध्ये आर्टिकलशिप करतो आहे. पण शेवटची परीक्षा उच्च गुणवत्तेने पास झाल्यामुळे त्याला एका उच्चवर्गीय दिल्लीतल्या उच्चवर्गीय सीए फर्ममध्ये नोकरी मिळते.

पुढे काय काय नि कसे कसे होते ते दहा एपिसोड्स (प्रत्येकी ३० ते ३२ मिनिटे) मध्ये मांडले आहे.

बहुतेक सगळ्या वेबसीरीजमध्ये होते तसे कथा तीनचार एपिसोड्सनंतर विसविशीत होत जाते. काही वेळा तर पुढे काय घडेल याचा अंदाज बांधण्याचाही कंटाळा येईल इतके रटाळ होते. पण थोडी सहनशक्ती आणि थोडे कुतूहल असेल तर जमू शकते. मुख्य कारण म्हणजे बहुतेक कलाकार आपापल्या ठिकाणी इतके चपखल बसले आहेत की लेखक-दिग्दर्शकाबरोबरीने (वा थोडे जास्त) कास्टिंग डिरेक्टरचे कौतुक करावेसे वाटते.

त्यातही केडी बन्सलची भूमिका साकारणारा वरुण बडोला हा नट नाव घेऊन वाखाणावा लागेल. चेहऱ्यामोहऱ्यात थोडी विनय पाठकची आठवण करून देणारा हा नट अनेक हिंदी सीरियल्स आणि काही हिंदी सिनेमांत दुय्यम/तिय्यम भूमिकांत दिसतो. तसेच त्याचा जावई पारसचे काम करणारा इंदर साहनीही उल्लेखनीय. शॅंकीचे काम करणारा रित्विक सहोर हा बराचसा योग्य वयामुळे खपून जातो. शॅंकीची आई हे पात्र साकारणारी अनुभा फतेपुरीया कमकुवत पात्रातही जीव ओतते.

कथा अर्थातच अतिरंजितपणाकडे झुकवलेली आहे. पण दिल्लीतल्या एका थोड्याशा वेगळ्या विश्वाची सफर करण्याचे कुतूहल असेल तर बघायला हरकत नाही.