सुमारे सहा वर्षांपूर्वी दिल्लीतल्या बुराडी भागात घडलेले हत्याकांड गाजले होते. एकाच कुटुंबातल्या अकरा व्यक्ती एकाच वेळेस मृत्यू पावल्या होत्या. दहा गळफास घेऊन, एक गळा दाबल्यामुळे.
कुठलेही अतार्किक खून/हत्या प्रकरण कथा/चित्रपटकारांना बीज पुरवते.
आरुषी तलवार खून प्रकरणावर आधारित 'रहस्य' हा २०१५ साली आलेला एक उत्तम चित्रपट होता. समर्थ लेखक-दिग्दर्शक (मनीष गुप्ता: द स्टोनमॅन मर्डर्स, ४२० आयपीसीचा दिग्दर्शक, 'सरकार'चा लेखक) आणि तगडे कलाकार (के के मेनन, आशिष विद्यार्थी, टिस्का चोप्रा, मीता वसिष्ठ, अश्विनी काळसेकर आणि इतर) यांनी तो चित्रपट एका उंचीवर नेऊन ठेवला होता.
तसा या कथानकावर २०१५ सालीच अजून एक चित्रपट आला होता, 'तलवार'. पण त्याचे लेखक-निर्माते-संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार म्हटल्यावर तो उच्च, खरेतर सर्वोच्च, दर्जाचा चित्रपट होता हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. त्याशिवाय का त्याला अकरा वेगळाली पारितोषिके मिळाली? 'रहस्य'सारखे एकुलते एक पारितोषिक नव्हे.
असो.
बुराडी हत्याकांडावर आधी डिस्ने-हॉटस्टार वर 'आखरी सच' ही मालिका येऊन गेली आहे. पण ती पहिल्यापासूनच हुकलेली होती. त्यामानाने नेटफ्लिक्सवरची 'हाऊस ऑफ सीक्रेट्स: द बुराडी डेथ्स' ही खूप चांगली होती.
हे बुराडी हत्याकांडाचे कथानक घेऊन कनिष्क वर्मा या दिग्दर्शकाने 'गांठ चॅप्टर १: जम्ना पार' ही मालिका नुकतीच (दोनेक आठवड्यांपूर्वी) जिओ सिनेमा वर प्रदर्शित केली आहे. कनिष्क वर्मा म्हणजे 'इन्साईड एज ३' या मालिकेचा नि 'फुटफैरी' या चित्रपटाचा दिग्दर्शक. यातली मालिका फारच उच्च दर्जाची होती. चित्रपट बरा होता. मी सागरिका घाटगेकडे पाहत पूर्ण केला.
गांठ या मालिकेची सुरुवात उत्कंठावर्धक आहे. सत्य घटनेवर आधारित कथानकांमध्ये होते तसे नावे आणि स्थाने बदलणे औचित्यपूर्ण मानले जाते ('तलवार' सिनेमाचे सोडा; संपूरणसिंह कालरा या व्यक्तीने वा त्याच्या कन्येने निर्माण केलेली कुठलीही गोष्ट औचित्य/अनौचित्याच्या पातळीच्या कितीतरी वर असते). तसे यात चुंदावत कुटुंबाला चंडेल करणे आणि बुराडी (मध्य दिल्लीत, यमुनेच्या पश्चिम तीरावर) ऐवजी जमनापार असलेले हकीकत नगर असे बदल केले आहेत. गंमत म्हणजे खरे हकीकत नगरही यमुनेच्या पश्चिम तीरावरच आहे. त्यामुळे कथानकात हकीकत नगरचे इंग्रजी स्पेलिंग बदलून 'के' ऐवजी 'क्यू' केले आहे. पण या शाब्दिक कसरती ठीक आहेत, फारशा खटकत नाहीत.
पात्रे पहिल्या एकदोन भागांत छान रुजतात. निलंबित अवस्थेत असलेला इन्स्पेक्टर गदरसिंग (मानव विज) सुरुवातीला थोडा अंगावर येतो. पण मग दोन पायऱ्या खाली उतरून रुळावर येतो. निलंबित असल्यामुळे तो रीतीरिवाजानुसार 'शराब के नशे में धुत्त' असतो. आणि निलंबित असल्याने त्याला 'रम'ही परवडत नाही, त्यामुळे 'देसी शराब'. पोलिस विभागांतर्गत घडामोडींमध्ये त्याला निलंबन रद्द करून ही केस सोपवण्याचा निर्णय होतो.
साक्षी मुर्मू (मोनिका पन्वर) हे पात्र एक वेगळाच पैलू घेऊन येते. साक्षी ही 'सव्हांत सिंड्रोम'बाधित मनोरुग्ण आहे. या रोगाने आजारी मंडळी सामाजिक वा बौद्धिक क्षमतांमध्ये थोडी उणी असतात पण एखाद्या क्षेत्रात (कला, गणित) फार उच्च दर्जाची असतात.
अवांतर - ऑटिझम हा मानसिक रोगही साधारण असाच आहे. सामाजिक क्षमता शून्याला टेकलेले याचे रुग्ण एखाद्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतात. अशा एका 'ऑटिस्टिक' मुलाला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन काढलेला 'मर्क्युरी रायजिंग' (१९९८) हा एक उत्तम चित्रपट आहे. आणि 'ऑटिस्टिक' लोकांच्या यादीतली काही नावे - ऍंथनी हॉपकिन्स, डॅरिल हॅन्ना, डॅन ऍक्रॉईड, ग्रेटा थनबर्ग.
तर इथे साक्षीला असंबंधित वाटणाऱ्या गोष्टीतले सूत्र पटकन उमगते. साक्षी ही मेडिकल कॉलेजमध्ये सायकिऍट्री वॉर्डमध्ये इंटर्न आहे. म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेण्याइतकी तिची बौद्धिक पातळी आहे. पण ती दलित-आदिवासी या राखीव कोट्यातून आलेली आहे. त्यामुळे तिला सतत उच्चवर्णीयांच्या टोमण्यांना तोंड द्यावे लागते. तिला 'सव्हांत सिंड्रोम'चा इलाज म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात.
च्यायला, ही सिनेमा/मालिकांमधली पात्रे गोळ्या खातात त्या मुठीमुठीने. अशा मूठभर गोळ्या आपण मर्त्य मानव खाऊ शकू त्या पेपरमिंटच्या किंवा बडिशेपेच्या.
या साक्षीला आर्थिक चणचणही आहे, त्यामुळे ती एका घराच्या गॅरेजमध्ये पीजी म्हणून राहते आहे.
गदरसिंगच्या चमूत 'हेड ऑफिस'कडून पाठवण्यात आलेली सत्यवती मित्तल (सलोनी बात्रा) आहे.
ओघात इतर पात्रे येतात नि जातात.
हे खून की सामूहिक आत्महत्या? सामूहिक आत्महत्या असल्या तर त्यांत काही तंत्र-मंत्र-मारण-जारण पैलू आहे का? मूळ आदेशानुसार मिळालेल्या ७२ तासांत गदरसिंग ही केस सोडवू शकतो का?
तीनेक भागांतच पकड उणावायला लागते. मानव विज ('अंधाधुन'मधला इन्स्पेक्टर मनोहर) प्रामाणिकपणे गाडा ओढतो. पण मग पकड निसटते ती निसटतेच. मधूनच एकादा सीन जखडून ठेवतो. पण ते म्हणजे वन-डे क्रिकेटमध्ये एखाद्याच ओव्हरमध्ये सलग दोन बॉलवर चौकार नि षटकार मारल्यासारखे. परत नो-रन आणि निअर-मिस.
शेवटी शेवटी तर आठच भागांची मालिका आहे. शेवटी कळेलच काय ते म्हणून रेटवले तर मालिकेच्या नावाकडे केलेले दुर्लक्ष महागात पडते. मालिकेच्या नांवात असलेल्या 'चॅप्टर १' चा अर्थ शेवटी कळतो. एक अतर्क्य वळण घेऊन मालिका थबकते.
बाकी कुठल्याही 'मर्डर मिस्ट्री'मध्ये कथारचना करताना हे आव्हान असतेच म्हणा. वाचक/प्रेक्षक कथानकात गुंतलेले असतात, कथानक पुढे जाते तसतसे तेही विचार करीत असतात, निष्कर्ष काढीत असतात, बदलत असतात, परतून विचार करीत असतात. त्यांची उत्कंठा ताणून ठेवायची आणि शेवटी उत्तर असे काढायचे की पुरेसा धक्का बसला पाहिजे.
उत्तम कलाकृतींमध्ये हे जसे जमलेले दिसून येते तसेच मध्यम/निम्न दर्जाच्या कलाकृतींमध्ये हे फसलेलेही नीट दिसते.
'गांठ' उत्तम दर्जात मोडत नाही. बरेच प्रयत्न करूनही.