संगीत दिग्दर्शन आणि स्वर

रामदास कामत हे माझ्या आवडत्या गायकांपैकी एक.

तसेही कोंकणात पन्नासेक वर्षांपूर्वी ब्राह्मणी घरांत 'नाट्यसंगीत' ही एक जनप्रिय करमणूक होती. चारपांच घरांत मिळून एक पेटी, तबला आणि हौशी गायक एवढा ऐवज सहजी गोळा होई. कॅसेट्सही हळूहळू रुजू लागल्या होत्या. त्यामुळे रामदास कामत, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे आदि मंडळी प्रसिद्ध होती. वसंतराव, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व हेही होतेच, पण ते जास्ती करून शहरांत. कदाचित कामत, कारेकर नि कडकडे यांच्या गोवा-कोंकण कनेक्शनमुळे ते कोंकणात जास्ती 'आपले' वाटत असावेत.

रामदास कामतांच्या गाण्यांपैकी 'चिरंजीव राहो जगी रामनामा' हे गाणे परत परत ऐकले. मग कळाले की ते 'धन्य ते गायनी कळा' या नाटकातले. गोपाळकृष्ण भोबे (अजून एक गोंवेकर कोंकणी!) लेखक.

नाट्यसंगीतामुळे अभिजात संगीत टिकून राहिले असा एक जोरदार मतप्रवाह आहे. पण बऱ्याचदा नाट्यसंगीतामध्ये 'भावप्रधान गायकी'चा कैफात शब्द म्हणजे 'केवळ आणि केवळ स्वरांसाठी वाहन' हा आवेश दिसतो. त्याबाबतीत अभिजात संगीतात जशी बऱ्याचदा चिजांचे शब्द कळले नाही तरी चालेल (कारण ते कळतच नाहीत) असे मान्य करून आस्वाद घेण्याची वेळ येते तशीच वेळ अनेक नाट्यपदांच्या बाबतीत येते.

उदाहरणार्थ बालगंधर्व आणि नंतर कुमारगंधर्व यांनी गायलेले 'तातकरीं दुहिताविनाश' हे पद. ऐकायला अत्यंत मोहक. शब्द खालीलप्रमाणे.

तातकरीं दुहिताविनाश । बल द्याया वेगें । माते धांव गे ।

अर्पुनि म्लान मुखीं । चुंबनधारा । घे हृदयीं फुलवीं जिवाला । तव माया वेगें । मात धांव गे ॥

सर्वसामान्य प्रेक्षकांना या शब्दांचे अर्थ कळतील ही आशावादाची परमावधी होती.

असो.

परत 'चिरंजीव राहो जगीं रामनामा' कडे. हे पद बरेचसे कळण्यासारखे आहे. आणी त्याच नाटकातली रामदास कामतांची इतर दोन पदेही. 'दान करी रे गुरुधन अतिपावन' आणि 'हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे'. तिन्ही मला फारच मोहक वाटली.

पण एक वेगळीच माहिती नंतर जाणिवेत उतरली. या नाटकाचे संगीत दिग्दर्शक होते भीमसेन जोशी!

'आठवणीतील गाणी' हा माहितीस्रोत मान्य केला तर भीमसेन जोशींनी या तीन गाण्यांखेरीज अजून फक्त एका गाण्यासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. 'कान्होबा तुझी घोंगडी' हा अभंग. त्यांच्या स्वतःच्या आवाजातला.

मग ('गंगाधररावांचे पानिपत'छाप) विचार आला, की या तिन्ही गाण्यांना त्यांचा स्वरही लाभला असता तर?

रामदास कामतांच्या आवाजाबद्दल प्रश्नच नाही. पण त्या गाण्यांतल्या ताना, हरकती, स्वरांदोलने ही खुद्द भीमसेन जोशींच्या आवाजात कशी वाटली असती?

गेले काही दिवस या मनोकल्पनेत विहरतो आहे!