सगळे नऊ यार्ड्स (द होल नाईन यार्ड्स) - इंच न इंच प्रेक्षणीय

इंग्रजीत 'द होल नाईन यार्ड्स' असा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ 'सगळे काही', 'सर्व काही', 'संपूर्ण'. इंग्रजीतले त्या अर्थाचे इतर वाक्प्रचार म्हणजे 'लॉक, स्टॉक ऍंड बॅरल', 'द होल शॅबॅंग', 'इन एन्टायरिटी' आदि. मराठीत 'आनखशिखांत', 'आसेतु हिमाचल' आदि.

या नावाचा एक धमाल विनोदी चित्रपट २००० साली आला.

चांगल्या विनोदी चित्रपटांची एक मुख्य अडचण असते. ते दुर्मिळ असतात. असो.

माँट्रियाल, कॅनडा. निकोलस ऑसरेन्स्की (ऑझ) हा दलदलीत अडकावे तसा लग्नात अडकलेला एक दंतवैद्य. तो मूळचा शिकागोचा. त्याची बायको सोफी नि सासू मिळून त्याचे आयुष्य हराम करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवताहेत. आणि सहमतीने घटस्फोटासाठी बायको अर्थातच नकार देते आहे. 

त्याची सेक्रेटरी/सहायक जिल त्याला एकदा 'गंमतीत' विचारतेही, की सोफीला 'टपकावण्या'साठी तो किती पैसे द्यायला तयार होईल?

ऑझच्या शेजारी एक नवीन इसम रहायला येतो. शेजारधर्म म्हणून ऑझ 'हाय हॅलो' करायला जातो आणि ऑझची स्मरणशक्ती वर्तमानपत्रांतल्या वाचलेल्या बातम्या त्याच्या मनोपटलावर झळकावते. तो शेजारी आहे शिकागोचा कुख्यात काँट्रॅक्ट किलर जिमी ट्युडेस्की ऊर्फ 'ट्युलिप'. आणि अधोविश्वात ट्युलिपची खबर देणाऱ्यासाठी भलेमोठे इनाम जाहीर झालेले आहे.

'धोपटमार्गा सोडू नको' हा बाणा जपणारा भेदरट ऑझ उलटपावली आपल्या घरी पळतो. आणि गडबडलेल्या अवस्थेत आपल्या शेजारी असान असा इसम आला आहे नि तो खुनी आहे नि त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला घसघशीत इनाम आहे ही गोष्ट बायकोला सांगून बसतो.

दुसऱ्या दिवशी ऑझ नि ट्युलिपची अंगणात परत भेट होते. ट्युलिप "मला माँट्रियाल दाखव" म्हणून ऑझला गाडीत घालून घेऊन जातो. दोघांच्या चांगल्या गप्पा होतात. 'ट्युलिप तसा माणसांतला आहे, कराव्या लागतात पोटासाठी माणसाला कधी काही गोष्टी' असे विचार ऑझच्या मनात तरळू लागतात.

आणि घरी धूर्त नि लोभी सोफी ऑझला शिकागोला जाऊन तिथल्या अधोविश्वातील ट्युलिपच्या विरोधी पार्टीचा टोळीप्रमुख यान्नी गोगोलॅकला ट्युलिपची खबर द्यायला उद्युक्त करते. हे काम केले तर ती सहमतीने ऑझला घटस्फोट देईल असे मधाचे बोट लावून.

ट्युलिपशी घडू पाहणारी मैत्री आणि बायको-सासूचा जीवघेणा ताप या द्वंद्वात सैरभैर झालेला ऑझ शिकागोला पोहोचतो. आणी गोगोलॅकला कसे शोधायचे या विचारात असताना गोगोलॅकचा माणूस फ्रॅंकी फिग्ज येऊन त्याला उचलून गोगोलॅककडे नेतो. तिथे ट्युलिपची बायको सिंथियाही आहे.

ट्युलिप हा 'तत्वनिष्ठ' माणूस आहे. घटस्फोट देणे, बायकोशी प्रतारणा करणे, मित्राच्या बायकोशी संबंध ठेवणे हे त्याच्या 'तत्वां'त बसत नाही. पण खून करणे त्याच्या तत्वांत अगदी फिट बसते. तर ट्युलिप आपल्या बायकोला 'टपकावण्याच्या' मागे आहे. आत्मरक्षणासाठी सिंथिया गोगोलॅकला सामील झालेली आहे. पण फार मनापासून नव्हे.

पुढे काय होते? स्वतःच्या बायकोला टपकावण्याचा विचार ट्युलिपने करण्यामागचे कारण काय? ट्युलिपच्या मरण्याने कुणाला किती फायदा होणार आहे? त्या फायद्याचा आर्थिक भाग किती मोठा आहे? फ्रॅंकी फिग्ज ऑझपर्यंत थेट कसा पोहोचतो? या आणि अनेकानेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी चित्रपट पहावा लागेल.

या चित्रपटातील विनोद बहुरंगी आहे. शाब्दिक विनोद आहे, प्रासंगिक आहे, स्लॅपस्टिक विनोद आहे, स्थानिक सांस्कृतिक विनोद आहे. आणि मुख्य म्हणजे तो कधीच पातळी सोडीत नाही वा सरधोपट होत नाही.

शाब्दिक विनोद साध्या सोप्या भाषेतून मांडला आहे. प्रसंगांची मालगाडी वेळोवेळी रुळांवरुन घसरते, हंशे वसूल करते नि परत रुळावर येते. 

स्लॅपस्टिक विनोदाला आचरट अंगविक्षेपांकडे झुकण्याचा वैश्विक रोग आहे. त्यात अपवाद एखादा चॅप्लिन. या चित्रपटातील स्लॅपस्टिक विनोद चॅप्लिनची आठवण करून देतो. 

स्थानिक सांस्कृतिक विनोद कळण्यासाठी थोडे कष्ट पडू शकतील (अस्सल 'अमेरिकन' असलेल्या ट्युलिपला कॅनडात बर्गरमध्ये मेयॉनीज सॉस घालतात त्याबद्दल तीव्र चीड आहे) पण तोही फार दुर्गम नाही.

आणिक महत्वाचे म्हणजे विनोद म्हटला की त्याला कारुण्याची झालर असावी म्हणजे तो थोर अशी उगाचच एक समजूत बोकाळलेली आहे. हा चित्रपट त्या समजुतीला फाट्यावर मारतो. कारुण्याची झालरबिलर काही नाही.

कलाकार मंडळी म्हणजे चमचमते रत्नमंडळ आहे.

ऑझ म्हणजे मॅथ्यू पेरी. गेल्या वर्षी अकाली निवर्तलेल्या या नटाला प्रसिद्धी मिळाली 'फ्रेंड्स' या मालिकेमुळे. पण त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. 'कॅन्ड लाफ्टर' असलेला कुठलाही कार्यक्रम मी पचवू शकत नाही. त्यापायी मी एलेन डीजेनरेसच्या 'एलेन' या मालिकेवरही पाणी सोडले. मी मॅथ्यू पेरीला 'सेवन्टीन अगेन' या चित्रपटात आणि 'द गुड वाईफ / द गुड फाईट' या मालिकांमध्येच पाहिला होता. पण इथली त्याची भूमिका मी पाहिलेल्या त्याच्या आधीच्या त्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. मॅथ्यूला विनोदाचे अत्यंत उत्तम अंग आहे. विशेषतः स्लॅपस्टिक विनोद अभिरुचिहीन होणार नाही याची खात्री कशी करावी याचा त्याची भूमिका एक आदर्श आहे. संवादफेकीतली हुकुमत तर वाखाणण्याजोगी.

ट्युलिप म्हणजे ब्रूस विलिस. 'डाय हार्ड' या ऍक्शन चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेला. मग 'डाय हार्ड'चे पुढचे भागही येत राहिले. पण ऍक्शन हीरो हा शिक्का बसल्याने 'मर्क्युरी रायजिंग' आणी 'सिक्स्थ सेन्स' हे त्याच्या गंभीर भूमिका असलेले चित्रपट त्याच्या कारकीर्दीत फारसे उठून दिसले नाहीत. तसेच त्याचे विनोदाची जाण दर्शवणारे 'आर ई डी' आणि 'आर ई डी २' सारखे चित्रपट दुर्लक्षितच राहिले. या चित्रपटांतली ब्रूस विलिसची भूमिका त्याच्या विनोदी भूमिकांमधली 'सर्वोत्तम' या श्रेणीत जाईल.

ब्रूस अजून जिवंत असला तरी अफेजिया आणि फ्रंट टेम्पोरल डिमेन्शियाने ग्रासलेला आहे. त्याला जगाचे भान उरलेले नाही नि कुणाशी संवादही साधता येत नाही.

एकूण ऍक्शन हीरो जेव्हा तो साचा सोडून इतर भूमिका करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बहुतेक वेळेस तो प्रयत्न अनुल्लेखाने मारला जातो. 'रॉकी' सिल्व्हेस्टर स्टॅलनने 'ऑस्कर' हा उत्तम विनोदी चित्रपट केला. जो बहुतांश प्रेक्षकांच्या लक्षात राहणे सोडा, जाणिवेत उतरलाही नाही. त्यामानाने श्वार्त्झनेगरने आपल्या ऍक्शन भूमिकांनाच आपल्या लाकडी अभिनयाने विनोदी बनवले.

ऑझची सहायक जिल म्हणजे अमांदा पीट. तिच्या एरवीच्या भूमिका बऱ्याचशा रोमॅंटिक नि काही प्रमाणात ऍक्शन/थ्रिलर चित्रपटांत. या चित्रपटात तिच्या तारुण्यसुलभ उत्साहाला जिल या व्यक्तिरेखेत नीटसपणे कोंदणात बसवलेले आहे. फार वाव नसलेली ही भूमिकाही नीट लक्षात राहते.

सिंथिया आहे नताशा हेनस्ट्रिज. 'स्पेशीज' या सायन्स फिक्शन हॉरर चित्रपटमालिकांत दिसलेली. त्याखेरीजचे तिचे चित्रपट फारसे लक्षणीय नव्हते. इथल्या तिच्या भूमिकेला पटकथेतच बऱ्याच मर्यादा आहेत. पण त्या आखून ठेवलेल्या कुंपणात नताशाने नीटस काम केले आहे.

ऑझची लोभी बायको सोफी म्हणजे रोजन्ना अर्केट. 'पल्प फिक्शन' या चित्रपटातल्या अनेकांपैकी एक एवढेच तिच्याबद्दल आधी माहीत होते. पण इथे फ्रेंच वळणाचे इंग्रजी बोलणारी (कथानक कॅनडात घडते) आणि नवऱ्याला पायपुसण्यासारखी वागवणारी बायको, तिची निर्लज्ज लालसा रोजन्नाने अत्यंत नेमकेपणे मांडली आहे. पटकथेने कोंडून ठेवलेल्या भूमिकेला तिने उत्तम न्याय दिला आहे.

फ्रॅंकी फिग्ज आहे मायकेल क्लार्क डंकन. खाद्यपदार्थामध्ये जसे मीठ (वा उत्तर भारतीय खाद्यपदार्थांवर जसा चाट मसाला) तसे हॉलिवूडच्या चित्रपटांत दुय्यम/तिय्यम व्यक्तिरेखा साकारणारे कृष्णवर्णीय कलाकार. मीठमसाला श्रेणीतून मुख्य घटक या पायरीला पोहोचणारे  एडी मर्फी, मॉर्गन फ्रीमन, सॅम्युअल जॅक्सन वा डेन्झेल वॉशिंग्टन हे विरळाच. मायकेल क्लार्क डंकन हा 'द ग्रीन माईल'मध्ये टॉम हॅंक्सला थेट भिडलेला नट म्हणून माहीत होता. पण त्याच्या पुढच्या बहुतेक भूमिका दुर्दैवाने मीठ-मसाला श्रेणीतल्याच होत्या. या चित्रपटात त्याची भूमिका पटकथेत बरीच जागा व्यापून आहे. आणि त्या भूमिकेत मायकेलने स्वतःला व्यवस्थित बसवले आहे.

मायकेलची लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याचा आवाज. असा खर्ज शतकातून एकाद्याला लाभतो. आपल्याला खर्जातली संवादफेक म्हणजे अमरीश पुरी, ओम पुरी, अमिताभ बच्चन इत्यादि. यातील अमिताभ बच्चनचा खर्ज 'सिलेक्टिव्ह' आहे. "कल और एक कूली पैसा देनेसे इन्कार करेगा"मध्ये आहे. आणि नेहमीच्या संवादफेकीत अगदी नावापुरता. ओम पुरीचा खर्ज हा खर्ज आणि नाकात बोलणे यांचे मिश्रण आहे. अमरीश पुरीचा खर्ज हा ठरवून आणलेला खर्ज आहे. त्यामुळे आवाज चढवला की तो फाटतो. मायकेलचा खर्ज म्हणजे अवघड आहे. मानवी कानाला २० हर्ट्झ ते २०,००० हर्ट्झ या फ्रीक्वेन्सीतील आवाज ऐकू येतात असे भौतिकशास्त्रात शिकवतात. प्रत्यक्षात आपल्याला १०० हर्ट्झ वा वरचे आवाज ऐकू येतात. मायकेलचा आवाज १०० हर्ट्झच्या खालीच असावा. 

मायकेल वयाच्या चौपन्नाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने २०१२ साली निवर्तला. 

आणि हे सगळे रत्नमंडळ आखीवरेखीव पद्धतीने मांडले आहे दिग्दर्शक जोनाथन लिन याने. त्याची थोडक्यात नि नेमकी माहिती द्यायची झाली तर त्याचा या चित्रपटाच्या आधीचा चित्रपट 'माय कझिन विनी'. आणि तो सहनिर्माता नि सहलेखक असलेली मालिका म्हणजे 'येस मिनिस्टर'. 

टीप: अशा नितांतसुंदर चित्रपटाचा इस्कोट इस्कोट करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टी अर्थातच सरसावली. आणि अत्यंत दर्जाहीन आणी टुकार चित्रपट दोन वर्षांतच निर्माण झाला. 'आवारा पागल दीवाना'. 

पण दर्जाहीन आणि टुकार प्रतिकृती करण्यात मराठी चित्रपटसृष्टीही अजिबात मागे नाही. 'माय कझिन विनी'ची प्रतिकृती भीषण आहे. 'काय द्याचं बोला'. आणि 'ऑस्कर'ची नक्कल करण्याचा प्रयत्न म्हणजे 'एक डाव धोबीपछाड'.