जगातल्या सर्व धर्म ग्रंथांनी आणि एकूण एक सिद्धांनी एकच फंडामेंटल चूक केली आहे, आपला जन्म झालेला आहे या धारणेने त्यांनी सर्व आध्यात्मिक विवेचन केलं आहे. त्यामुळे ते सर्वच्या सर्व एकजात हुकलेले आहेत.
आवागमनातून मुक्ती, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म या कल्पना किंवा सर्वच्या सर्व आध्यात्मिक साधना, आपला जन्म झालाय या एकाच चुकीच्या धारणेवर बेतलेल्या आहेत. सत्याचा जन्म होऊ शकत नाही त्यामुळे आपला जन्म झालेला नाही. जन्म देहाचा होतो, आपला जन्म होऊ शकत नाही. पण एकही सिद्ध आणि कोणताही धर्मग्रंथ ही गोष्ट सांगत नाही.
आपण सुद्धा आपला जन्म झालेला आहे हे गृहीत धरून जगतो, ज्यांना उलगडाच झालेला नाही अशांनी लिहिलेले ग्रंथ प्रमाण मानतो आणि अज्ञानी सिद्धांनी सांगितलेल्या साधना करत आयुष्य वाया घालवतो. याचा अर्थ धर्मग्रंथ किंवा सिद्ध काही अंशी योग्य आहेत आणि काही अंशी चुकलेले आहेत असा नाही तर ते सर्वथा हुकलेले आहेत.
आपला जन्मच झालेला नाही, आपण निरवयव आणि निरिंद्रीय आहोत तर आपण काय कर्म करणार आणि आपल्याला कसला कर्मलेप लागणार ?
आपला जन्मच झालेला नाही तर कुणाचं आवागमन आणि कसली आवागमनातून मुक्ती ? जन्म आणि मृत्यू देहाला आहेत, ज्यात देह जन्म घेतो, वावरतो आणि विलीन होतो ती अपरिवर्तनीय स्थिती आपण आहोत.
आपण निरवयव आणि निरिंद्रीय आहोत, आपण काय साधना करणार ? श्वासावर आधारित सर्व साधना, आपण श्वासोत्छ्वास करतो या मूलभूत अज्ञानावर आधारित आहेत.
सर्व मंत्र हे आपण उच्चारण करू शकतो या घनघोर अज्ञानावर आधारित आहेत.
परिक्रमा, अष्टांग योग, तंत्र या सर्व दैहिक साधना, आपण अचल आहोत हे न समजलेल्या अज्ञानी सिद्धांच्या अनाकलानाची उघड उदाहरणं आहेत आणि भक्तीमार्ग हा कोणत्याही देहात कुणीही नाही, ही साधी गोष्ट न समजलेल्या संतांनी मांडलेला व्यर्थ पसारा आहे.
आपला जन्म झालेला नाही किंबहुना आपला जन्म होऊच शकत नाही हे तुम्हाला फक्त मान्य होण्याचा अवकाश की, आपण सत्य आहोत आणि सुरुवातीपासून सत्यच होतो हा उलगडा व्हायला वेळ लागत नाही.
आपला जन्म झालेला नाही हे कळता क्षणी तुम्ही नात्यांच्या चक्रव्यूहातून मुक्त होता, कारण सर्व नाती ही देहसापेक्ष आणि आपला जन्म झाला आहे या अज्ञानावर आधारित आहेत. ज्याचा जन्मच झालेला नाही त्याला आई-वडील, पती-पत्नी, भाऊ-बहिण कशी असतील ? ज्याला अपत्य होऊच शकत नाही त्याला कसला संसार आणि कसला संसारताप ?
आपला जन्म झालेला नाही त्यामुळे आपल्याला मृत्यू नाही मग मृत्यूचं कसलं भय ? जर कुणीच जन्म घेत नाही तर कुणाच्या देहात कोण असणार ? मग मृत्यूचा कसला शोक आणि आवागमनाची काय भीती ?
आपला जन्म झालेला नाही त्यामुळे आपण निरवयव आणि निरिंद्रीय आहोत. अवयव आणि इंद्रीये देहाला आहेत. निरवयव आणि निरिंद्रीय असल्यानी आपण उच्चारण शून्य आहोत त्यामुळे कोणताही मंत्र, जप किंवा ग्रंथवाचन आपल्याला आपण अजन्मा आहोत ही प्रचिती देऊ शकत नाही.
आपण जन्म घेत नाही त्यामुळे आपण काहीही धारण करू शकत नाही, तस्मात आपण देह धारण केला आहे हा केवळ भास आहे. देह आहे, तो आपल्यात वावरतोय आणि आपल्याला ते समजतय इतकंच. आपण धारणशून्य आहोत कारण आपण काहीही धारण करत नाही. आपण देह वस्त्रासमान धारण केला आहे आणि 'वासांसि जीर्णानि यथा विहाय’, म्हणजे आपण जुना देह त्यागतो आणि नवा देह धारण करतो, ही स्वतःला दिलासा देणारी बालीश कल्पना आहे.
आपला जन्म झालेला नाही त्यामुळे आपल्याला अवयव नाहीत, ते देहाला आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व साधना या दैहिक क्रिया आहेत आणि अशा सर्व साधना निव्वळ कालापव्यय आहेत, त्यातून आपला जन्म झालेला नाही हा उलगडा होण्याची शक्यता शून्य ! या सर्व साधना आपण देहाच्या आत आहोत हा भ्रम प्रस्थापित करण्यापलिकडे आणि आपली साधना एकनाएक दिवस आपल्याला सत्याप्रत नेईल या व्यर्थ आशेशिवाय काहीही साधू शकत नाही.
आपण धारणशून्य म्हणजे देह (किंवा तत्सम) काहीही न धारण करू शकणारे आणि धारणाशून्य म्हणजे मनानी सुद्धा काहीही न धारण करू शकणारे आहोत. सर्व स्मृती आणि गैरसमज (जसे की आपला जन्म झाला आहे) हे मेंदूनी धारण केले आहेत.
थोडक्यात, आपण काहीही धारण केलेलं नाही (धारणशून्य) हा उलगडा तुम्हाला देहमुक्त करतो आणि आपण मनानी सुद्धा काहीही धारण करू शकत नाही (धारणाशून्य) हा उलगडा तुम्हाला, सर्व मानसिक चिंता, स्मृती आणि चुकीच्या धारणांपासून मुक्त करतो.