अद्वैतची इतिहासाची अभ्यासपुस्तिका
पार्श्वभूमी
कु. अद्वैत हा पुण्यालगतच्या एका तालुक्याच्या गावी मराठी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकणारा मुलगा. घरी आई, बाबा आणि तो हे तिघेच. आजी आजोबा जाऊन येऊन असतात. आई-बाबा त्याच गावात नोकरी करतात. बाबा कॅनरा बॅंकेत नि आई पोस्टात.
घरी एकटाच असल्याने अद्वैतने बाहेर खेळगडी शोधले, पण त्यांच्या कॉलनीत त्याच्या जवळपासच्या वयाची मुले नाहीत. त्यामुळे अद्वैत कायम घरीच असतो. घरी टीव्ही नाही. आणि अद्वैतकडे स्वतःचा स्मार्टफोन नाही.
अद्वैत थोडासा 'स्वमग्न' आहे असे डॉक्टरांचे मत आहे. पण थोडा म्हणजे नेमके किती टक्के याबद्दल डॉक्टर मुग्ध आहेत. मेडिकलला जाण्यासाठी त्यांनी दहावीपासूनच गणिताशी काडीमोड घेतला होता. अद्वैतच्या आईचा ऍलोपॅथीवर विश्वास नाही. त्यामुळे तिचा यावर आक्षेप आहे.
'स्वमग्नता' असे काही नसते, वात-पित्त असमतोलामुळे असे होते आहे. शतावरी आणि बदाम यांचा खुराक चालू केला की सगळे यथास्थित होईल असे एका आयुर्वेदाचार्यांचे म्हणणे आहे. शिवाय ते आयुर्वेदाचार्य ईषत ज्योतिषीही आहेत. बुध-शनी एकमेकांना थोडे आडवे गेल्याने ही समस्या उद्भवली आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. यावर अद्वैतच्या बाबांचा आक्षेप आहे. त्यांचा आयुर्वेद आणि ज्योतिष दोन्हींवर विश्वास नाही.
थोडक्यात, मुलाचे नाव अद्वैत असले तरी मातापित्यांचे आनखशिखांत द्वैत आहे.
अद्वैतला वाचनाची आवड आहे. आणि आजोबांची बरीच पुस्तके अद्वैतच्या घरी आहेत. ती सगळी त्याच्या वाचनाच्या टप्प्यात येत नाहीत, पण तो जमेल तितके रेटतो.
अद्वैत शाळेत हुशार गणला जातो. पुस्तके वाचून त्याला बऱ्यापैकी समजते. आणि जे समजत नाही ते पाठ करायचे असते हेही त्याला कळाले आहे.
अद्वैतची शाळा सकाळची आहे. तो रोज घरी सुमारे पाच तास एकटा असतो. त्यात तीनेक तासांत त्याचे जेवण अभ्यास नि दुपारची झोप पूर्ण होते. उरलेल्या दोन तासांत त्याने रोज बसून काही लिखाण केले. विषयाच्या अनुषंगाने त्याला जे वाटले ते त्याने लिहून काढले.
ते म्हणजे खालील कृती. मुद्रितशोधन करण्यापलिकडे त्यात काही बदल केलेले नाहीत.
या प्रकटनाचा नीट बोध व्हायला हवा असेल तर मराठी सहावीचे इतिहासाचे पुस्तक हाती असलेले बरे. ते इथे उपलब्ध आहे.
इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी
* पहिल्या पानावरची 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पाठ करावीत.
शारिरीक शिक्षणाचे उतेकर सर उपकलम (घ) [आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी] केव्हांही विचारतात.
हेडमास्तरीण धोंगडे बाई सतत उपकलम (झ) [सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा] घोकून घेतात. विशेषतः वर्गात मारामारी झाली नि खिडक्यांच्या काचा फुटल्या की. त्यांना "शाळा ही सार्वजनिक मालमत्ता आहे का?" असे विचारू नये. त्या चिडतात नि पालकांना बोलावणे पाठवतात. मग घरी त्यावरून आईबाबांचे भांडण होते.
त्या भांडणात बाबा मावशीला नि आई आत्याला टोमणे मारतात ते ऐकायला मजा येते.
विज्ञानाचे घडशीसर उपकलम (ज) [वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी] कधीमधी विचारतात. पण समोर धोंगडे बाई असल्या तर तिथेही उपकलम (झ) म्हणून दाखवावे. घडशीसर रागावत नाहीत, फक्त धोंगडे बाईंकडे बघतात.
आई आणि बाबा शाळेत सोडायला यायचा कंटाळा करायला लागले आणि एकमेकांवर ते काम ढकलायला लागले तर उपकलम (ट) [६ ते १४ वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात] जोरजोरात म्हणावे. वैतागून का होईना त्यातला एकजण येतो.
* चौथ्या पानावर खूप लोकांची नावे आहेत. ती पाठ करण्यात अर्थ नाही. ती नावे परीक्षेत कधीच विचारत नाहीत. हे लोक फार महत्त्वाचे नसावेत.
* राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा पाठ असलेले चांगले. उतेकर सर कधीकधी शिक्षा म्हणून राष्ट्रगीत किंवा प्रतिज्ञा मोठ्याने म्हणायला लावतात. आणि त्यात चूक झाली तर "या पिढीकडून अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही" असे बडबडतात. ते होमगार्डमध्ये होते.
त्यांना तिथून काढून टाकले असे आमच्या वर्गातल्या अर्चितचा दादा म्हणतो. त्यांनी तिथून राजीनामा दिला असे आमच्या वर्गातल्या धृवची ताई म्हणते. ती त्यांच्याकडे धुणीभांडी करायला जाते.
* 'प्रस्तावना', 'शिक्षकांसाठी' आणि 'अध्ययन निष्पत्ती' ही पाने वाचणे टाळावे. त्यात खूप जोडाक्षरे असलेले कठिण शब्द आहेत. त्यांचा अर्थ विचारला की आई, बाबा नि शिक्षक सगळे खवळतात आणि "अभ्यास करा नीट" एवढेच उत्तर देतात.
परीक्षेत यातले काहीच विचारीत नाहीत.
* अनुक्रमणिकेत वाचण्यासारखे काही नाही. आणि ती पाठ केली तरी मार्क मिळत नाहीत.