अद्वैतची इतिहासाची अभ्यासपुस्तिका
धडा ८: मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये
* पुन्हा एकदा वेगळी नावे भरलेला तोच नकाशा. हे असे नकाशे आणि नको त्या लोकांची नावे पाठ करायला लागणे हे सोडले तर इतिहासात मजा आहे. आता शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ हे कशाला माहीत हवे. त्याचे नाव रणबीर सिंग वा दिलजीत दोसांझ असते तरी त्याचा खूनच झाला असता ना?
* इंडो ग्रीक राजे हा एक अजून गोंधळात टाकणारा प्रकार. यांच्यातला मिनॅंडर म्हणजेच मिलिंद हे तर अती झाले. मग पीटर म्हणजे पुरुषोत्तम आणि चार्ल्स म्हणजे चंद्रकांत का? उगाच नाही ही सगळी राज्ये लयाला गेली.
* सोन्याची नाणि ही कल्पना छान आहे. सोन्याचे नाणे उगाळून ते पाणी कपाळाला लावले तर भुते त्रास देत नाहीत असे वर्गातला आरुष जैन सांगतो. त्याचे वडील सोनार आहेत.
* कनिष्काच्या दरबारात चरक नावाचा माणूस होता हे गोंधळात टाकणारे आहे. उसाचा चरक तो हाच असेल का?
* गुप्त साम्राज्याच्या राजांचे कितीही कौतुक केले तरी अशा नावाचे साम्राज्य फार काळ टिकणार नाही हे त्यांना कळत नसेल का?
* 'वर्धन' याचा अर्थ 'वाढ होणे' असे आजोबा सांगतात. मग हे साम्राज्य लयाला का गेले कळत नाही.
* आजी नेहमी ऐकते त्या गाण्यात 'नामरूप' असा शब्द आहे. हा कामरूप राज्याशी संबंधित असेल का?
* प्राग्जोतिषपूर म्हणजे गुवाहाटी हे कसे झाले कळत नाही. कदाचित सांगलीचे मूळ नाव पीटर्सबर्ग असेल.
* स्वाध्याय मध्ये दिलेले शब्दकोडे हा चांगला प्रकार आहे. आपण दिलेले उत्तर खरे आहे की नाही हे लगेच कळते, सरांची गरज लागत नाही. कारण एकही उत्तर चुकले तर शब्दकोडे गंडते.
धडा ९: दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये
* महाराष्ट्र दक्षिण भारतात आहे तर. पण मग मराठी लोक 'दक्षिण भारतीय' ज्यांना म्हणतात ते मराठी लोकांना काय म्हणत असतील?
* इथे 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' या पुस्तकात केरळच्या बंदराचे नाव मुझिरीस असे दिले आहे. पण आजचे नाव काय हे दिले नाही. विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याखेरीज इतिहासकारांना दुसरे काम नसावे.
* सातवाहन ठीक आहे. श्रीमंत लोकांकडे सातच काय सत्तर वाहने असतील. पण सातकर्णी राजा म्हणजे फार होते. सात कान? इअरबड्सचाच खर्च कितीच्या किती येईल.
* तीन समुद्र एकत्र येतात कन्याकुमारीला. सातवाहनांचे राज्य होते तुंगभद्रा नदीपर्यंत. आणि सातकर्णी राजाच्या घोड्यांनी म्हणे तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते. मुळात घोडे समुद्राचे पाणी पीत नाहीत. खारट असते. आणि जरी प्यायले, तरी कन्याकुमारीहून पाणी तुंगभद्रेच्या तीरापर्यंत कसे मागवले, ऍमॅझॉन की फ्लिपकार्ट हेही सांगायला हवे होते.
* पण सातवाहन राजे चांगले होते. त्यांच्या राज्यात ओळखीची ठिकाणे (कोल्हापूर, नाशिक इ) सापडतात. अर्थात कोल्हापूरचे नाव कुंतल होते असे घोळ आहेतच.
* चालुक्य राजघराण्याच्या राजधानीचे नाव बदामी. त्यांना बदाम एवढे आवडत असतील? बदामी हलवा त्यांच्याच काळात शोधून काढला असेल.
* पट्टदकल इथल्या मंदिराचे चित्र छान आहे. फक्त कळसाचे टोक कुणी उडवले कळत नाही. शत्रूने उडवले असेल तर फक्त कळसाचे टोक उडवून थांबलेला शत्रू कोण असेल?
* पल्लव राजघराणे चांगले असावे. त्यांची राजधानी कांचीपुरम. म्हणजे कांचीपुरम इडलीचा शोध पल्लव राजांनी लावला तर. पुण्यात 'शिवसागर'मध्ये कांचीपुरम इडली छान मिळते.
* 'उपक्रम' म्हणून काहीही सांगतात. 'पाठात आलेल्या चित्रांचा संग्रह करून त्यांची माहिती मिळवा व शाळेच्या प्रदर्शनात मांडणी करा'. वर्गात मुले पन्नास. नाण्याच्या चित्रासकट पाठात चित्रे सात. मग प्रत्येक चित्र काय सात वेळेस मांडायचे? आणि तसे केले तरी पन्नासाव्या मुलाने कुठले चित्र मांडायचे?
धडा १०: प्राचीन भारत : सांस्कृतिक
* तमिळ भाषा जुनी असेल. पण पुस्तकांची नावे सोपी ठेवली असती तर बरे झाले असते. 'सिलप्पधिकरम' नि 'मणीमेखलाई' ही काय नावे झाली? नावे सोपी असावीत. इसापनीती, शामची आई अशी.
* धार्मिक साहित्य यात दिलेली बहुतेक नावे तमिळ नावांपेक्षा विचित्र आहेत. या सगळ्या भाषा नाहीशा झाल्या हे चांगले झाले.
* पैशाची भाषा आजही वापरली जातेच की. फक्त ती पैशाची नसून रुपयाची असते.
* 'सुत्तपिटक' म्हणजे गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने असे असेल तर सरळ 'उपदेशांची वचने लेखक गौतम बुद्ध' असे का लिहीत नाहीत?
* फळाची आशा न धरता कर्म करावे हे चांगले आहे. मीही तेच करतो. मला फळे आवडत नाहीत. भजी आवडतात.
* मराठी भाषेचे व्याकरण पाणिनीने केले होते तर. तो खूप दुष्ट माणूस असावा. त्याला म्हणे वाघाने खाल्ले. बिचाऱ्या वाघाचे पोट बिघडले असेल.
* अर्थशास्त्र लिहिताना त्यात शिक्षेचे प्रकार लिहिण्याची काय गरज होती? ते पुस्तक आईच्या हाती लागले तर?
* रामायण आणि महाभारत ठीक आहे, पण 'छोटा भीम' कुठल्या ऋषींनी रचले हे द्यायला हवे होते.
* शिशुपालवध हे कळत नाही. शिशु म्हणजे लहान मूल. पालीला मारून टाकतात माहीत होते. लहान मुलाला का मारून टाकायचे?
* नाटकांची नावे विचित्रच आहेत. 'जादूचा महाल आणि राजकन्या' या नाटकाचे नाव त्यात का नाही कळत नाही.
* इतिहासातले असले तरी पंचतंत्र छान आहे. सोप्या गोष्टी आहेत.
* प्राचीन भारतात लोक मांस (चिकन की मटन की दोन्ही?) आणि मासे खात. मग आताच का बंदी?
* कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. मग त्याआधी काय फक्त रेडिमेड कपडेच होते?
* आयुर्वेदाला प्राचीन परंपरा आहे हे माहीत नव्हते. मला वाटले आयुर्वेद रामदेवबाबांनी सुरू केला. रामदेवबाबांच्या फॅक्टरीतली बिस्किटे चांगली नसतात. बेचव असतात.
* शून्याचा वापर भारतातल्या गणितज्ञांनी पहिल्यांदा केला म्हणे. नक्की कुठल्यातरी बिचाऱ्या विद्यार्थ्याला शून्य मार्क देऊन सुरुवात केली असेल.
* पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे म्हणे आर्यभटाने सांगितले. यात काय विशेष? हे तर मलाही माहीत आहे. आर्यभट माहीत होण्याच्या अगोदरपासून.
* ब्रह्मगुप्त हा गुप्त साम्राज्यातला राजा होता का? असेल तर गुप्त घराणे नामशेष झाल्यावरही तो कसा उरला? आणि तेही गणितज्ञ म्हणून? त्यापेक्षा कांचीपुरम इडलीसारखा त्याने गुप्त गुलाबजामचा शोध लावला असता तर चांगले झाले असते.
* तक्षशिला हे म्हणे प्राचीन भारतात होते. मग ते आता पाकिस्तानात कसे?
* वाराणसी हिंदूंचे ना? मग तिथे जैन नि बौद्ध तत्वज्ञानांचे शिक्षण कशासाठी? विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी इतिहासात असल्या विचित्र गोष्टी करणे चुकीचे आहे.
* गुजरातमध्ये सौराष्ट्रात वलभी नावाचे शहर होते म्हणे. मग ते आता कुठे आहे? पाकिस्तानात की बांगलादेशात?
* पुण्यात नालंदा नावाचे हॉटेल आहे. तिथे चिकन टिक्का चांगला मिळतो असे मामा म्हणतो. मामा तिथे दारू प्यायला जातो असे बाबा म्हणतात. स्वतः दारू पिणाऱ्याने इतरांना नावे ठेवू नयेत असे आई म्हणते.
* विक्रमशीला शब्द काय आहे? विक्रम शीला (हे बहीण-भाऊ की नवरा बायको?) की विक्रमशी ला?
* कांची आणि कांचीपुरम एकच आहेत का? असल्यास कांचीपुरम इडलीला सरळ कांची इडली का म्हणत नाहीत? शब्द छोटा असल्याने ऑर्डर पट्कन देता येईल आणि इडली लौकर मिळेल.
* स्वाध्याय सोडवताना आयुर्वेदिक उपचाराबद्दल माहिती मिळवण्यासाठी आईला विचारले. पण आई आयुर्वेदाबद्दल बोलायला लागली आणि नेहमीप्रमाणे बाबा मधे पडले. आयुर्वेद हे थोतांड आहे असे बाबा म्हणतात. मग नेहमीप्रमाणे त्या दोघांचे भांडण सुरू झाले. माझ्या स्वाध्यायाची चिंता कुणालाच नाही. आणि मार्क कमी पडले तर दोघेही एक होऊन हल्ला करतात. हे चुकीचे आहे.
* 'आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे' याचे उत्तर पुस्तकातून लिहिले. पण खरे तर त्यांनी 'कोणत्या गोष्टींचा विचार केला नाही' असा प्रश्न विचारायला हवा होता. आयुर्वेदिक औषधांची चव थोडीफार तरी बरी असावी, मळमळू नये म्हणून घेतलेल्या काढ्याने मळमळायला लागते त्यावर काय करायचे, काढा करताना आटवत बसावे लागते त्यापेक्षा आटवलेला काढाच विकत द्यावा अशा गोष्टींचा विचार केलेला नाही.
* पाठ्यपुस्तकातल्या सांची स्तूपाचे निरिक्षण हा काय स्वाध्याय असू शकतो? काडेपेटीच्या आकाराच्या त्या फोटोचे काय निरीक्षण करणार? त्यापेक्षा सांची स्तूपाला भेट द्या असे स्पष्ट लिहिले असते तर चांगले झाले असते. सांची कुठे आहे माहीत नाही. पण मला पुणे आणि सांगली सोडून इतर कुठले ठिकाणच माहीत नाही. त्यामुळे सांचीला जायला मजा आली असती.
धडा ११: प्राचीन भारत आणि जग
* चीनला लागून असल्याने भारताला 'प्राचीन' भारत म्हणत असतील का?
* ग्रीक मूर्तीकलेच्या प्रभावातून कुशाण काळात गांधार कलेचा उदय झाला. आणि गांधार शैलीत घडवले काय, तर बुद्धांच्या मूर्ती. इतिहास झाला तरी अशी चार वेगवेगळी नावे देणे हा अन्याय आहे. ग्रीक मूर्तीकलेचा वापर करून बुद्धांच्या मूर्ती घडवल्या असे सरळ लिहिले असते तर सहज कळले असते, पाठ करीत बसावे लागले नसते.
* कोल्हापूरला रोमन काळातल्या वस्तू सापडल्या. मग सांगलीला का नाही? सांगली कोल्हापूरपेक्षा चांगली आहे.
* चीनमधून त्या काळी रेशीम येत असे म्हणे. पण मग चायनीज पदार्थ कधीपासून आले हे दिले असते तर बरे झाले असते. सहज लक्षात राहिले असते.
* स्वाध्यायामध्ये 'निरीक्षण करून वर्णन करा' असे प्रश्न देण्याआधी ज्याचे निरीक्षण करायचे ते चित्र पानभर द्यावे. काडेपेटीच्या आकाराच्या चित्राचे काय निरीक्षण करणार? मला तर त्या चित्रात एकजण फुटबॉल खेळताना आणि एक छोटा मुलगा आईच्या पर्समध्ये हात घालताना दिसतो. पण जंगमसर ते मान्य करीत नाहीत. आणि ते काय आहे ते सांगतही नाहीत. खरे तर चित्रे देण्यापेक्षा फोटो दिले असते तर बरे झाले असते.
* 'तुम्हांला आवडलेल्या एका कलेविषयी माहिती मिळवा व तिचे वर्गात सादरीकरण करा' यासाठी मी थोडी शोधाशोध केली. आजोबा म्हणतात की वाचन ही एक कला आहे. आणि मी बरीच पुस्तके वाचली आहेत. पण वर्गात सादर करायला सर परवानगी देत नाहीत. मग उगाच असले स्वाध्याय देऊ नयेत.