माझे मधुमेहाचे अनुभव - १

माझे मधुमेहाचे अनुभव - १

गेली २२ वर्षे मी मधुमेहाचा रुग्ण आहे. अनेक खटपटी-लटपटी करून आतापर्यंत तरी आटोक्यात ठेवला आहे. त्यानिमित्ताने माझ्या वाटचालीत आलेले अनुभव इथे मांडायचा विचार आहे, जेणेकरून इतर लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि उलट लोकांनी त्यांचे अनुभव लिहिल्यास त्यातून मलाही शिकता येईल. लेखांची लांबी कमी ठेवतो आहे. साधारणपणे ३-४ भाग होतील असा अंदाज आहे. तांत्रिक माहिती आवश्यक तितकीच, सोप्या भाषेत आणि लेखनाच्या ओघात येईल तशी सांगेन.

मधुमेह म्हणजे काय हे बहुतेकांना माहिती असले तरी थोडक्यात सांगतो.  एखाद्या व्यक्तीची सकाळी उपाशीपोटी रक्तातील साखर ज्यावेळी १२६ च्या वर आणि जेवल्यावर २ तासांनी १४० च्या वर जाते त्यावेळी त्या व्यक्तीला  मधुमेह झाला असे समजतात. आणखी एक पद्धत म्हणजे एच बी ए १सी- अशी चाचणी असते त्यात गेल्या तीन महिन्यातली सरासरी साखर समजते. तो आकडा जर ६.५ च्या वर असेल तर मधुमेह आणि ५.५-६.५ असेल तर मधुमेहपूर्व स्थिती असे समजतात. मधुमेह नसलेल्या व्यक्तीमध्ये हा आकडा ४- ५.५ असतो. मधुमेही लोकांनी हा आकडा ७ पेक्षा कमी ठेवावा असे डॉक्टर सांगतात.

एच बी ए १सी चाचणीचा एक फायदा म्हणजे यात रुग्णाला फसणूक करायला जागा नसते. उदा. सकाळी उपाशीपोटी साखर मोजायची असेल तर काही रुग्ण आदल्या रात्री जेवतच नाहीत आणि जेवल्यावर २ तासांनी सुद्धा मुद्दाम रोजच्यापेक्षा कमी जेवतात, जेणेकरून दोन्ही आकडे एक दिवसाकरता सामान्य येऊन डॉक्टरची आणि रुग्णाची दिशाभूल होऊ शकते. एच बी ए १सी मध्ये तसे काही करता येत नाही.

मधुमेहाची सुरूवात

मधुमेहाची माझी अप्रत्यक्ष ओळख मी लहान असताना झाली. माझे दोन जवळचे नातेवाईक, सख्खी काकू आणि आत्याचे यजमान यांचे  वयाच्या ५०-५५ व्या वर्षी निधन झाले. निधन जरी हृदयविकाराने झाले तरी ते दोघे मधुमेहाचे रुग्ण होते. माझी प्रत्यक्ष ओळख २००४ मध्ये, माझ्या ४५ व्या वर्षी झाली. पायाच्या अंगठ्याला ठेच लागली ती जखम बरेच दिवस भरून येत नव्हती. अमेरिकेत डॉक्टरांकडे गेलो असता त्यांनी कसले तरी मलम दिले. काही दिवस बरे वाटले तरी जखम पूर्ण बरी झाली नाहीच. शेवटी २००४ डिसेंबरमध्ये भारतात आलो तेव्हा डॉक्टरांनी सकाळी उपाशीपोटी आणि जेवल्यावर २ तासांनी रक्ताची तपासणी केल्यावर मधुमेहाच्या निदानावर शिक्कामोर्तब झाले. उपाशीपोटीची साखर १४० (म्हणजे १२६ पेक्षा थोडीच जास्त  होती) पण जेवल्यावर २ तासांची ३५० होती (जी १४० पेक्षा बरीच जास्त होती). लघवीतूनही साखर जात असल्याचे निदान झाले. खरे तर काही लक्षणे आधीच दिसायला लागली होती. एक जखम बरी न होणे हे आधीच सांगितले आहे, दुसरे वारंवार लघवीला जावे लागणे आणि तिसरे म्हणजे थोड्या श्रमांनीसुद्धा धाप लागणे.

आमच्या डॉ. फाटकांनी मला साखर मोजण्याचे यंत्र विकत घेऊन त्यावर स्वत:च घरच्या घरी तपासणी करायचा सल्ला दिला. खरे तर मी हे आधीच केले होते आणि त्यात माझी उपाशीपोटीची साखर २२० आणि जेवल्यावर दोन तासांनी २५० आली होती. त्यावरून हे यंत्र  बरोबर नाही, त्यात काहीतरी गडबड आहे असा मी डॉ. फाटकांशी वाद घातला (आजकाल भाजप जिंकल्यावर विरोधी पक्ष ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा दावा करतात तसेच). त्यावर त्यांचे उत्तर मला पटले. ते म्हणाले " यंत्र अगदी अचूक आकडा नसेलही दाखवत. पण २२० म्हणजे १२० (जी सामान्य आहे) नाही किंवा ३२० ही नाही (जी अगदीच जास्त आहे). खरी साखर १९८-२४२ (१०% कमी किंवा जास्त) इतकी आहे असे समज, तरीही ही जास्तच आहे असा त्याचा अर्थ."

 भारतातून एक वर्ष पुरेल इतकी औषधे (ग्लिपिझाईडआणि मेट्फॉर्मिन) घेऊन परत आलो. पैकी ग्लिपिझाईड हे औषध सल्फोनिल युरिया या प्रकारातले आहे आणि ते स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन तयार करायला भाग पाडते, त्यामुळे रक्तातली साखर कमी होते. दुसरे मेट्फॉर्मिन हे औषध यकृतावर काम करून त्यातून रक्तात सोडली जाणारी साखर कमी करायचे काम करते.

पुढे अमेरिकेत परतल्यावर २००५ चे सबंध वर्ष याच  औषधांच्या पुंजीवर काढले. स्वत: घरी तपासणी केली नाही,  किंवा डॉक्टरांकडेही गेलो नाही. मात्र २००६ च्या मार्चमध्ये डॉक्टरांकडे गेलो आणी तेथपासून व्यवस्थित उपचारांना आरंभ झाला असे समजता येईल. त्यापुढची गोष्ट पुढच्या भागात.