माझे मधुमेहाचे अनुभव - २

माझे मधुमेहाचे अनुभव - २

मागील भागात मी एक वर्षभर पुरेल इतकी औषधे घेऊन भारतातून अमेरिकेत आलो. त्यावेळी डॉ. फाटकांनी अमेरिकेत गेल्यावर दुसरा डॉक्टर बघ आणि वरचेवर तपासण्या करून घे म्हणजे त्यांना औषधाचे योग्य प्रमाण ठरवता येईल असे सांगितले होते. तरीही मी ऐकले नाही कारण आमच्या विद्यापीठाच्या नोकरीत जो आरोग्य विमा दिला होता त्याचा स्वीकार करून उपचार करणारे डॉक्टर फारसे नव्हते. बहुतेक "आम्ही नवीन रुग्ण घेत नाही" असे सांगत. त्यातून एक-दोन जे होते ते थातुर- मातुर उपचार करणारेच होते. 

२००५  हे वर्ष भारतातून आणलेल्या औषधावर काढले.  २००६ च्या मार्च मध्ये एका डॉक्टरला तब्येत दाखवली. त्याने एच बी ए-१सी ही तपासणी केल्यावर आकडा १०.९ निघाला, जो ७ पेक्षा कमी असायला हवा. त्याने याच दोन औषधांची मात्रा वाढवली. पुढे एक वर्षात ते आकडे ८ -९ यामध्ये राहिले.  त्यामुळे २००७ मध्ये डॉक्टरने मला तिसरे औषध सुरू केले. त्याचे नाव जानुविया , जे आदल्याच वर्षी मर्क कंपनीने बाजारात आणले होते. त्याचा परिणाम तत्काळ दिसला आणि एच बी ए-१सी ७.५ आला जो ७ च्या बराच जवळ होता.  या काळात फक्त एकच त्रास होता तो म्हणजे रक्तातली साखर एका विशिष्ट वेळेला (संध्याकाळी ५ च्या सुमारास) अतिशय कमी व्हायची. रक्तातली साखर ७० पेक्षा कमी होणे हा गंभीर प्रकार आहे. यामध्ये अस्वस्थ वाटणे, हातापायांना कंप सुटणे, घाम येणे, अशी लक्षणे दिसतात आणि वेळीच साखर न खाल्ल्यास आणि रक्तातली साखर अतिशय कमी होऊन रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. त्यामुळे कार्यालयातच संत्र्याचा रस आणि साखर ठेवले होते. 

जानुविया हे औषध ग्लिपिझाईड सारखेच स्वादुपिंडाला इन्सुलिन तयार करायला मदत करते. फक्त दोघांमध्ये थोडा फरक आहे ̱ग्लिपिझाईड आणी तत्सम औषधांचा परिणाम रक्तातली साखर कमी झाल्यावरही सुरू राहतो. परिणामी रक्तातली साखर कमी व्हायचा धोका असतो. जानुविया आणि तत्सम औषधांचा परिणाम रक्तातली साखर १४० झाली की थांबतो. मी दोन्ही घेत असल्यामुळे रक्तातली साखर कमी होण्याचा अनुभव वारंवार येत होता. 

ग्लिपिझाईड, मेट्फॉर्मिन आणी जानुविया या तीन औषधांमुळे पुढची साधारण १० वर्षे म्हणजे २०१७ पर्यंत बी ए-१ सी ७.५ राहिला. या काळात औषधे आणि आहार यामध्ये कोणतेही महत्वाचे बदल केले नाहीत. फक्त एकदा डॉक्टरांनी ग्लिपिझाईड बदलून त्या ऐवजी त्याच प्रकारचे ग्लिमेपिराईड हे औषध सुरू केले. 

मधुमेह हा आजार जीवनशैलीचा आजार आहे असे म्हटले जाते. त्यात तुम्ही काय जेवता, काम बैठे आहे की उभे राहून करता, व्यायाम करता की नाही, हे सर्व महत्चाचे असते. माझे काम हे रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत असल्याने उभ्याने करायचे काम होते, त्यात कसलाही बदल नव्हता. १९७५ पासून सूर्यनमस्कार-दंड- बैठका हा व्यायाम आठवड्यातून ३-४ वेळा करत होतो. त्याशिवाय रोज २०-२५ मिनिटे चालतही होतो. त्यात काही फरक नव्हता. तुम्ही मद्यपान करता किंवा नाही असाही एक मुद्दा असतो. मद्यातल्या इथेनॉल चे साखरेत रुपांतर होत असल्याने तसेच मद्याच्या नशेत साखर कमी झाल्याची लक्षणे रुग्णाला जाणवत नाहीत असे दिसून  आल्याने मधुमेही रुग्णाने मद्यपान करू नये असे तज्ञ सांगतात. मी मद्यपान कधीच केले नसल्याने तोही प्रश्न नव्हता. आहारात थोडा बदल केला. २००५ मध्ये सकाळी- १ कप चहा. नंतर १ कप दूध, दुपारी जेवणात ४ पोळ्या (गव्हाच्या), भाजी, मधल्या वेळी - पोहे, उपमा वगैरे आणि रात्री फक्त आमटी-भात. मधुमेह झाल्याचे समजताच भात सोडला, कारण भात खाल्ल्याने रक्तातली साखर वाढते असा एक समज त्याकाळी होता. तो संपूर्ण चुकीचा होता हे नंतर समजले. एकाच वेळी ४ पोळ्या खाण्या ऐवजी दुपारी रात्री प्रत्येकी २ पोळ्या असा बदल केला.

काही बदल प्रयोग म्हणून करून बघितले, चालत नाहीत असे दिसल्यावर बंद केले. त्यात एक म्हणजे इथे प्रत्येक तज्ञ सकाळी भरपूर नाष्टा केला पाहिजे असे सांगतो म्हणून काही दिवस बाजारात मिळणाऱ्या सीरीयल्स (कॉर्न फ्लेक्स वगैरे) दुधाबरोबर खाऊन बघितले, २ तासांनी साखर ४०० पार गेल्यावर तो नाद सोडला. एकदा संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी केली होती, ती खाल्ल्यावर  साखर ४०० पार गेल्याने तो प्रकार वर्ज्य केला. मधुमेहामध्ये कर्बोदके कमी खावीत असाही एक सल्ला मिळतो. त्यानुसार भात, पोळी वर्ज्य करून त्या ऐवजी फक्त डाळींचे धिरडे खायचा प्रयोग केला होता.  त्यामुळे  एकदा संध्याकाळी चारचाकी चालवीत असताना साखर एकदम कमी खाल्याने गाडी रस्ता-दुभाजकाला धडकून अपघात झाला. रोहिणीने बरीच खरड काढल्याने हा प्रकार बंद केला. पण हा प्रयोग यशस्वी झाला होता, एच बी ए-१सी पहिल्याने ६.८ म्हणजे ७ पेक्षा कमी आला होता. 

२००७ ते २०१७ या दहा वर्षांमध्ये तीन प्रकारची औषधे घेऊन मधुमेह जरी आटोक्यात राहिला असला तरी साखरेत होणारे चढ-उतार (दुपारी जेवल्यावर वाढ, त्यानंतर ३-४ तासांनी एकदम कमी होणे, रात्री जेवल्यावर परत वाढणे) या प्रकारामुळे थकायला व्हायचे. त्या ऐवजी भात पोळी ऐवजी डाळींची धिरडी खाणे आणि त्याचबरोबर ग्लिमेपिराईड (ज्यामुळे साखर एकदम कमी होऊन अपघात झाला होता) हे औषध बंद करणे असा एक विचार सुरू करून तो २०१७ मध्ये अंमलात आणला, त्याबद्दल पुढच्या भागात.