शापित स्त्री
हळूहळू आम्ही तिला विसरायला लागलो होतो. तो रात्रीचा दिसायचा. आता त्याच्या चेहऱ्यावर मला प्रेतकळा आल्ये असं वाटू लागलं. मग एक-दोन दिवसांनंतर तोही गायब झाला. आता तिच्या खोलीला कुलूप लागलं. मला सुटल्यासारखं वाटू लागलं.
अचानक एका आठवड्यानंतर तिथे कोणीतरी राहत आहे असं वाटू लागलं. बहुतेक नवीन भाडेकरू आला असावा. अचानक एका रात्री नेहमीसारखी खिडकी उघडी दिसली. आज टीव्हीचा आवाज येत होता. सहज पाहिलं तर दोघेही एकमेकांजवळ बसले होते. तिची मान त्याच्या खांद्यावर होती. आणि तो तिचा चेहरा कुरवाळीत होता. आश्चर्याचा धक्का बसून मी अवाक् झालो. एरवी हिडीसफिडिस करणारा तो तिला कुरवाळत होता.
मी तसाच माझ्या खोलीत शिरलो. विशाखा झोपली होती. तिला न उठवता मी जेवून घेतलं. मला हे झालं कसं ते समजेना. फार उशिरा झोप लागली. पुढे काहीतरी खळबळजनक घडेल अशी अपेक्षा असलेल्या माझी निराशाच झाली. मी रोजच ठराविक वेळी उघड्या खिडकीतून पाहत असे. पण सध्यातरी त्यांच्यात दिलजमाई झालेली दिसत होती.....
आणि अचानक एक दिवस एक उंचेपुरे, गोरे आणि हॅट घातलेले गृहस्थ आले. त्यांच्याबरोबर मागे आलेले आजोबाही होते. आजोबांना मी ओळखलं. ते तिचे वडील होते. हे कोण नवीन गिऱ्हाईक? की आणखीन कोणी? मला कळेना. पण ज्याअर्थी आजोबा बरोबर आहेत, त्याअर्थी गिऱ्हाईक नक्कीच नव्हतं.
आत काय चाललंय इकडे लक्ष ठेवायला मी विशाखाला सांगितलं. पण नंतर विचार केला, आज दांडीच मारावी. काहीतरी नवीन सापडेल. मग सुपरवायझरला फोन केला आणि तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं.
दरवाज्याची कडी वाजली. लवकरच दरवाजा उघडला.
"अरे, बाबा तुम्ही?" ती बाजूला होत म्हणाली.
दरवाजा लागला. मी पटकन दरवाज्याशी कान लावून उभा राहिलो. संवाद अर्धवट समजत होते. तिचे बाबा म्हणाले, "यांना ओळखलंस का?"
यापुढचं मला काहीच ऐकू आलं नाही. ते आतल्या खोलीत गेले असावेत. किंवा अतिशय हळू आवाजात बोलत असावेत. म्हणून मी खाली वाकून उघड्या खिडकीच्या पलीकडे भिंतीला चिकटून उभा राहिलो. आता बोलणं स्पष्ट समजत होतं. पण दिवस असल्याने आत पाहता येत नव्हतं. तिचे बाबा आणि तो माणूस हॅट काढून मला पाठमोरे बसले होते. ती मात्र समोर उभी होती. तिचे डोळे डबडबले असावेत.
ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "तीन-चार वर्ष झाली सर. कितीतरी पत्र आणि फोन केले, पण उत्तरच दिलं नाहीत."
ती 'सर' का म्हणत होती, मला कळेना.
आता तो सर का कोण होता, तो म्हणाला, "मी तुला घेऊन जायला आलोय. एकत्र आल्यावर सगळं बोलता येईल."
असं म्हणून त्याने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला.
पण ती बाजूला होत म्हणाली, "आई-बाबांना किती त्रास झाला, कल्पना नाही तुम्हाला".......
मग ती पदराने डोळे पुसीत राहिली. त्या माणसाला काणकोणल्यासारखं झालं असावं. काही वेळ रडण्यात गेला.
ती म्हणाली, "किती त्रासाने आणि लपून अर्चनाला जन्म दिला...."
मग तिचे बाबा मधेच म्हणाले, "अंग हो, पण ते अर्चूला घेऊन गेले तर काय हरकत आहे?"
त्यावर उत्तेजित होत ती म्हणाली, "अजिबात नाही. वाढवीन मी तिला. आणि माझं लग्नही झालंय आता."
परत बाबा म्हणाले, "म्हणूनच तर अर्चूला घेऊन जाऊ दे. म्हणजे तुलाही नीट संसार करता येईल."
मग तो म्हणाला, "मला तर दोघीही हव्येत."
आता मात्र ती निक्षून म्हणाली, "नाही नाही, मी असलं काही करणार नाही. मी माझ्या नवऱ्याला समजावीन......"
तिला आणखीनही काही बोलायचं असावं, पण ती आतल्या खोलीत निघून गेली.
मग तो माणूस वडिलांना म्हणाला, "समजावा तिला. मी अजून पंधरा-वीस दिवस इथेच आहे. मी दोघींना घेऊन जाईन. शेवटी दोघीही माझी जबाबदारीच आहेत. का ही एवढा आटापिटा करतेय?"
..... बाबा काहीच बोलले नाहीत.... ते आत गेले. पण ती ऐकायला तयार नव्हती.
मग तो माणूस म्हणाला, "मला खूप आशा होती. तिच्यावर झालेल्या अन्याय मला नाहीसा करायचाय. मी सुद्धा तिच्यासाठी थांबलोय."......
आता त्याचा गळा भरून आला होता.
..........
असाच काही वेळ घालवून तो म्हणाला, "आपण निघायचं का?... समजावा हो तिला. मी पुन्हा येईन."
...
मग बाहेर येत ती म्हणाली, "निघा तुम्ही. बाबा थांबतील थोडा वेळ."
असं म्हटल्यावर तो उठला. आणि दरवाजा उघडून डोळे पुसत बाहेर पडला.
त्याने मागे वळून पाहिलं नाही. आणि पाहिलं असतं तरी मी दिसलो नसतो. मी भिंतीला घोरपडीसारखा चिकटून उभा होतो. आता कथा संपली होती.
विशाखाशी चर्चा करण्यात इतपत मला माहिती मिळाली होती. दरवाजा अर्धवट उघडा होता. मी पुन्हा खाली वाकून माझ्या घरी गेलो.
बाबांनी दरवाजा बंद केला.
मग ते मालतीच्या जवळ येऊन तिला जवळ घेत म्हणाले, "मला अजूनही वाटतं तू प्रोफेसर साहेबांच्या म्हणण्याचा विचार करावास. भावनेच्या भरात एकदम नाही म्हणू नकोस. तुझं लग्न लावलं, ही त्या वेळची गरज होती. प्रोफेसर साहेब मधेच येतील असं कधी वाटलं नाही."
तिचं समाधान झालेलं दिसलं नाही. थोडावेळ इकडे-तिकडे करून बाबा म्हणाले, "चल, मी निघतो. काळजी घे."
......
त्यावर ती काळजीने म्हणाली, "आज अगदी काही न घेताच निघालात."
......
बाबा उठले. कपडे नीट करीत म्हणाले, "तुझं सगळं नीट झालं की मग जेवायलाच येईन."
असं म्हणून तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून त्यांनी हात फिरवला. त्यांनी दार उघडलं. ते बाहेर पडले. मी त्यांना जाताना पाहिलं. दुपारचे चार वाजले होते. उगाचंच दांडी मारली असं वाटायला लागलं.
आता मात्र मी शेजारणीकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. विशाखाला सांगितल्यावर ती म्हणाली, "तुमचा निश्चय, पाहू किती टिकतोय ते."
बायकांना नवऱ्याची रेवडी उडवण्याची सवय असते की काय कोण जाणे. मी माझं बोलणं गांभीर्याने घेतलं.
मी रात्री फ्रेश होऊन येताना उघड्या खिडकीतून पाहीनासा झालो. दोन-चार दिवस निग्रहाने गेले. विशाखा मला ओठांच्या कोपऱ्यातून हासल्यासारखी वाटल्याने मी तिला सुनावलं.
.....
सात-आठ दिवस मी लक्ष दिलंच नाही. ज्याअर्थी शेजारणीचं नवऱ्याशी जमत होतं, त्याअर्थी आता त्यात रस घेणं सोडलेलं बरं असं वाटू लागलं.
मग एक दिवस मध्यरात्रीनंतर दोघेही बाहेर जाताना दिसले. मला आश्चर्य वाटलं. पण ती त्यांची खाजगी गोष्ट आहे असं समजून मी दुर्लक्ष केलं. मला झोप लागायला आणि पुन्हा ते दोघेही घरी यायला एकच गांठ पडली. तरीही मी पडून राहिलो. हळूहळू माझी झोप चाळवत-चाळवत नाहीशी झाली.
त्या दोघांबरोबर तिसराही आवाज आला. तो पुरुषी आवाज होता. मग दोन-चार फाटफाट मारल्यासारखे आवाज आले. मी उठून बसलो. घड्याळात चार वाजत होते. विशाखाचा घोरण्याचा आवाज येत होता. मधेच दबक्या आवाजात हुंदक्यांचा आवाज येऊ लागला.
मी दरवाजा किलकिला केला. नवरा मोठमोठ्याने शिव्या देत होता.
"साली, आहेस रांड! आणि पतिव्रतेचा आव आणतेस. त्याच्याजवळ झोपायला काय प्रॉब्लेम आहे?"
.....
त्यावर ती ठामपणे म्हणाली, "मी नाही झोपणार त्याच्याजवळ. मागच्याच आठवड्यात आपण एक झालो आहोत असं म्हणालात ना?, मग हे काय?"
....
त्यावर तो करवादून म्हणाला, "थोडी सहानुभूती काय दाखवली, लगेच भाळलीस? बायका मूर्ख असतात हेच खरं. मुकाट्याने कपडे काढून आतल्या खोलीत जा. तो वाट पाहतोय. चार पैसे तरी मिळतील. कंपनी बंद पडत्ये सांगितलं होतं ना?"
असं म्हणून त्याने तिला आतल्या खोलीत ढकलली. आणि दरवाजा बाहेरून बंद केला.
......
काही वेळ तो आतले आवाज ऐकत उभा राहिला.
.........
ती अर्धनग्न अवस्थेत त्यातल्या त्यात हाताने शरीर झाकून उभी होती. तो हळूहळू जवळ आला. तो स्पर्श करणार तेवढ्यात तिने घाबरून डोळे मिटून घेतले.
मग तिच्या खांद्यावर हात ठेवीत तो थंडपणे म्हणाला, "घाबरू नकोस. मी तसलं काही करणार नाही. कारण, मी पुरुष नाही. मला मूल नाही. त्यामुळे बायको दुसऱ्याबरोबर निघून गेली."
त्याचा आवाज कातर झाला. तो पुन्हा आतल्या खुर्चीवर खाली मान घालून बसला.
तिने त्याच्या समोरच पुन्हा कपडे परिधान केले. तिला त्याची दया आली.
मग तो तिला म्हणाला, "साहेबांनी मला, 'चल घरी. मजा येईल,' म्हणून सांगितलं. त्यांना माझ्याबद्दल माहिती नव्हती. खरोखरी मनापासून धंदा करीत असतात तरी पोलिसांकरवी सुटका केली असती. पण नवराच असं करायला सांगतोय म्हटल्यावर काय बोलणार? तरीही प्रयत्न करीन."
....
मग त्याने खिशातून हजार रुपये काढून तिच्यासमोर धरले. म्हणाला, "हे घ्या. नाही घेतलेत तर त्याला संशय येईल. नाही म्हणू नका."
तिने पैसे घेतले. तो उठला आणि दरवाजा वाजवू लागला.
दरवाजा उघडला. तो बाहेर गेला.
नवऱ्याने त्याला विचारलं, "झालं?"
त्याने मानेनेच होकार दिला. पुढचा दरवाजा उघडून तो पुन्हा मागे न बघता भराभर निघून पण गेला. जणू त्याला परत कोणी बोलवील की काय.
नवऱ्याने मागे वळून तिच्याकडे संशयाने पाहिलं. त्याची नजर तिच्या चेहऱ्याचा वेध घेत होती. हिने काही तरी लबाडी केली असावी.
तो पुढे काही बोलण्याआधीच तिने पाचशेच्या दोन नोटा त्याच्या हातात दिल्या. ती खाली मान घालून बिछान्याकडे वळली.
आता त्याने न राहवून विचारलं, "फार लवकर झालं वाटतं?"
त्यावर त्याच्याकडे पाठ करीत ती म्हणाली, "त्याला फक्त पाहायचं होतं....."
ती थबकली. अचानक आपल्याला सुचलेल्या उत्तराचं तिला आश्चर्य वाटलं. त्याच्या डोळ्यांकडे न पाहता तिने पांघरूण अंगभर ओढून घेतले.
लाईट मालवून तोही लवंडला. पण मनात संशय ठेवूनच...............
मीही गाढ झोपेत असल्याने मला काही समजण्याचा प्रश्नच नव्हता.
सकाळचे नऊ वाजले. मला विशाखाने हालवून उठवलं. माझा चहा होईपर्यंत तिने काहीच विचारलं नाही.
मग मात्र म्हणाली, "निश्चय संपला वाटतं!"
मी मुद्दामच उत्तर दिलं नाही. मला वाद नको होता.
मी काहीच बोलत नाही असं पाहून ती माघार घेत म्हणाली, "भाजी घेऊन या. डबा देता येईल."
मी जास्त चर्चा नको म्हणून कपडे घालून बाहेर निघालो. मग रचना मागे लागली म्हणून तिला घेऊन बाहेर पडलो. बाजार उरकून मी घरी आलो.
गेटवरच पोलिस हवालदाराने अडवलं.
"तुम्ही याच चाळीत राहता ना?"
मी होकारार्थी मान हलवली.
त्यावर त्यांनी मला विचारलं, "कोणती खोली तुमची?"
मी हातानेच आमची खोली दाखवली.
ते पाहून त्यांनी विचारलं, "तुमच्या शेजारच्याच खोलीत धंदा चालतो, माहिती असेलच तुम्हाला?"
"मी नाही."
त्यावर ते म्हणाले, "काय राव, काय बोलता? शेजारच्या खोलीत धंदा चालतो आणि तुम्हाला माहिती नाही? कोण विश्वास ठेवील?"
....
मी वैतागून विचारलं, "मला कसं माहीत असणार? मला रोज रात्रपाळी असते. तुम्ही थेट त्यांनाच विचारा की."
.....
त्यावर त्यांच्याकडे जाणारच आहे असं ते म्हणाले. ते माझ्याकडे टक लावून पाहत होते.
मग मी खोलीकडे निघालो. तेही माझ्या मागोमाग आले. मला वाटलं ते घरी येऊन विशाखाला विचारतील. पण तसं न करता त्यांनी शेजारणीच्या दाराची कडी जोरात वाजवली.
विशाखाने दार उघडल्यावर घाईगर्दीने आत शिरून मी दरवाजा लावून घेतला.
विशाखाने काय झालंय ते विचारलं.
मी पोलिस चौकशी करतायत असं सांगितलं.
"...होय. पण आपला काय संबंध?"
"तेच तर मी सांगितलं त्यांना. पण आपल्याला माहीत नाही, यावर ते विश्वासच ठेवत नाहीत."
शेजारणीच्या नवऱ्याने जांभया देत दरवाजा उघडला. दरवाज्यात हवालदाराला पाहून त्याची झोप उडाली.
"क... क... काय पाहिजे?" त्याने चाचरत विचारलं.
आतमध्ये नजर फिरवीत आणि स्त्रीचे काढलेले कपडे पाहून हवालदार म्हणाले, "पवार इथंच राहतात का?"
"इथे पवार राहत नाहीत."
आणखी चपळाईने नवऱ्याने दरवाजा लावून घेतला. हवालदार काहीतरी मनाशी ठरवीत निघून गेले.
माझ्या मनात आलं, मला उगाचच उलटेसुलटे प्रश्न विचारले.
पुन्हा दोन-चार दिवस गेले. काहीच घडत नव्हतं. मला स्फोटाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात साधा फटाकाही फुटत नव्हता......
अचानक एक दिवस दुपारी अडीच-तीनच्या सुमारास, माझी कामाला जाण्याची वेळ असताना, एक जाडजूड, उंच, धिप्पाड, रुंद चेहऱ्याचा, मोठाले डोळे आणि मोठे नाक असलेला, जाडसर मिशी ठेवलेला माणूस पान चघळीत शेजारणीकडे आला.
बेल वाजवली.
दरवाजा उघडून तिने विचारलं, "कोण पाहिजे?"
त्याच्या दारूच्या भपक्याने तिने तोंडावर हात ठेवला होता.
त्याबरोबर काही न बोलता तिला हाताने ओढून त्याने उचलले व तो भराभर पावले टाकत गेटजवळ उभ्या असलेल्या मारुती व्हॅनमध्ये तिच्यासहित आत बसला.
हे सगळं विजेच्या वेगाने झाल्याने पाहणाऱ्या मला आणि विशाखाला पाहत राहण्याशिवाय काहीच करता आलं नाही.
मी रात्रपाळीकरिता निघत होतो. पोलिसात तक्रार करण्याचं धैर्य मला झालं नाही. तिच्या नवऱ्याला सांगितल्याशिवाय तसं करणं बरं नव्हतं म्हणा, किंवा मी तरी त्यावेळेला तशी सबब शोधून स्वस्थ राहिलो.
आता मात्र मी भानगड नको म्हणून इमानदारीने कामावर गेलो. माझ्या डोक्यातून तो प्रसंग गेला नाही.
रात्री मी घरी आल्यावर उशिरा का होईना तिच्या नवऱ्याला भेटण्याचं ठरवलं. विशाखाला लक्ष ठेवायला सांगून मी कामावर जायला निघालो.
शेजारणीचा पुढचा दरवाजा सताड उघडा होता.
दारात उभ्या असलेल्या विशाखाला मी, आपण तिचा दरवाजा लावून घ्यायचा का, असं विचारलं.
त्यावर तिने नापसंती दर्शवली.
मी तिला पटवण्याच्या भानगडीत पडलो नाही. मी गेल्यावर ती आत गेली.
माझ्या मनात आलं, रात्री नवरा घरी आल्यावर त्याला बायको घरात नाही हे पाहून काय वाटेल?
असा विचार करून मी मागे वळलो.
नशीब विशाखाने आमच्या खोलीचा दरवाजा लावला होता. मी हळूच जाऊन शेजारणीचा दरवाजा बाहेरून कडी न लावताच लोटून घेतला. आणि मी कामावर गेलो.
कामात असताना माझ्या मनात, आपण हा आगाऊपणा का केला, असं वाटत राहिलं. संडासला जाणाऱ्या प्रत्येकाने आत डोकावून पाहिलंच असतं.............
...
..
मारुती व्हॅन जोरात चालली होती. मालतीने सुटकेसाठी जोरदार प्रयत्न केला. पण त्याची पकड जबरदस्त होती.
आता त्याने तिच्या दोन कानफटात मारल्या.
ती दरवाज्याकडे वळली. पळवलं जाण्यापेक्षा दार उघडून जीव गेला तरी चालेल, या कल्पनेने तिने प्रयत्न चालवला. पण दरवाजा लॉक होता.
चपळाईने त्याने तिच्या गळ्याभोवती पकड मिळवली. ती सुटकेसाठी तडफडू लागली.
दुसऱ्या हाताने त्याने कुरत्यातली क्लोरोफॉर्मची बाटली काढली. रुमालावर ओतणार तेवढ्यात तिने इतक्या जोरात धक्का दिला की, बाटली त्यांच्या हातातून उडून खिडकीवर आपटली आणि सगळा क्लोरोफॉर्म गाडीत सांडला.
त्याचा वास वाढून सगळ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून, "रेहमान गाडी साईडमे ले.... साली रंडी मानती नहीं."
त्याने ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली.
पण रेहमान म्हणाला, "गाडी बाजूने लेना आसान नहीं है भाईजान..."
त्यावर तो म्हणाला, "भोसडीके, रोक दे गाडी. नहीं तो पहले तुझे उडा दूंगा."
खिशातलं पिस्तूल काढीत जावेद ओरडला.
आता मात्र रेहमानने गाडीचा वेग कमी करीत आडरस्त्याला नेऊन उभी केली.
ते होतं, गोरेगावचं "जंगल".
आता दुपारचे चार वाजत होते. हळूहळू पावसाला सुरुवात झाली.
जावेदने तिला दरवाज्याबाहेर ढकलली. ती वेडीवाकडी पडली. परंतु स्वतःला सावरीत ती वाट फुटेल तिकडे पळत सुटली.
पावसामुळे दिसण्यात अडथळे येत होते. तोंडावरचं पाणी झटकून रस्ता पाहावा लागत होता. तिलाही आणि त्या दोघांनाही.
....
जावेद आणि रेहमान गाडी तशीच टाकून तिच्यामागे पळत सुटले.
पावसाला उधाण आलं होतं. तिला ओल्या साडीने आणि अंगाला घट्ट बसलेल्या अंतर्वस्त्रांमुळे नीटपणे धावता येईना. ती ठेचकाळत धावत होती. ते दोघेही दैत्यांसारखे तिच्या मागे धावत होते.
आता जंगल दाट होत चाललं होतं. ती वेगवेगळे ओढे ओलांडीत धावत होती.
अचानक तिच्यासमोर एकमेकांना चिकटलेले दोन वृक्ष आले. त्यांच्या खोडात ढोलीसारखा एक माणूस सामावून घेईल असा भाग होता.
ती त्यात लपली. धडधडत्या उरावर तिने हात ठेवला. जणू काही उराचं धडधडणं थांबलं असतं.
ते दोघेही तिच्या अचानक नाहीसे होण्यामुळे निराश झाले. त्यांचे कपडे चिखलाने माखले होते. इकडे-तिकडे फिरून तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती न सापडल्याने जावेद रेहमानला म्हणाला, "अब मौसीको कैसे पेश आऊं..."
समोरच्या ओढ्यात हातपाय धुऊन ते कुठे शोधणार याचा विचार करीत राहिले. शोधण्यात त्यांचा अर्धा-पाऊण तास गेला.
आता थोडी मालती स्वस्थ झाली. वेगवेगळ्या प्रकारे तिचे आंबलेलं अंग ठणकू लागलं. मग तिच्या पायाच्या अंगठ्याला लागलेल्या ठेचेमुळे येणारं रक्त थांबून गोठलं होतं.
अभावितपणे तिच्या तोंडून "आई ग!..." असे शब्द निघाले......
निराशेने थांबलेल्या त्याच्या कानावर शब्द पडल्यावर त्याने आवाजाच्या दिशेने मान वळवली. आणि आश्चर्यचकित होऊन त्याला तिचा पाय दिसला.
तो स्वतःशीच म्हणाला, "या अल्ला... रेहमान मिल गयी देख."
झपाट्याने पुढे होऊन त्याने तिला ढोलीतून ओढून काढली.
त्याबरोबर तिने त्याच्या हाताला चावलं. तो वेदनेने कळवळला, पण तिला न सोडता तिच्या कानफटात मारून तिला खाली पाडलं.
मग तो म्हणाला, "साली, तू ऐसी नहीं मानेगी."
असं म्हणून त्याने तिची साडी ओढून काढली.
आता त्याने तिची इतर वस्त्रंही ओढून काढली. आणि तिचे हात पकडून स्वतःचे कपडे अर्धवट काढून तिच्यावर स्वार झाला.
त्याचे पावसाने भिजलेले आणि दारूचा भपका येणारे तोंड त्याने तिच्या तोंडात घुसवले.......
त्या घाणीने आणि थकव्याने तिची शुद्ध हरपली.
थोड्याच वेळात आपली वासना त्याने पूर्ण केली. तिच्या शरीराचे लचके तोडण्याचेच बाकी होतं.
तो उठला. आणि स्वतःचे कपडे ठाकठीक करीत त्याने तोंड फिरवून उभ्या असलेल्या रेहमानला सांगितले, "तू भी मजा कर ले."
पण रेहमान म्हणाला, "नहीं भाईजान, मुझे गाडी चलानी है."
रेहमानला हे आवडलं नाही. पण भाईजानपुढे तो कसं बोलणार? नाही म्हटलं तरी भाईजान मौसीच्या मर्जीतला माणूस होता.
मग ती हालत नाही असं पाहून ती मेली तर नाही या शंकेने जावेदने तिला उचलली. तिचा श्वास चालू असल्याचे त्याला जाणवून तो स्वस्थ झाला. मग ते तिला घेऊन गाडीकडे निघाले.
पाच वाजून गेले होते. ग्रांटरोडला पोहोचेपर्यंत आठ सहज वाजतील असं त्याच्या मनात आलं. उन्हं उतरली होती. पावसाची आता रिपरिप सुरू होती.
तेवढ्यात त्यांना गाडी दिसली. गाडीचे दरवाजे उघडे पाहून तो रेहमानवर भडकला.
"क्यूं बे, तेरी अकल घास खाने गयी क्या? गाडी खूली छोड दी तूने? तेरेको बादमे देखता हूं."
तरुण रेहमान घाबरून म्हणाला, "गलती हो गयी भाईजान. फिर ऐसा नहीं होगा. माफ कीजिये......"
गाडीत शिरल्या शिरल्या त्याने मालतीचे हातपाय बांधले. तिच्या तोंडावर पाणी मारले. ती शुद्धीवर आली.
तिच्या तोंडात पाणी घालीत तो म्हणाला, "अब भाग जितना भागना है."
त्यावर ती काही न बोलता रडत राहिली.
गाडी भरधाव चालू लागली. रात्र चढत होती. तिला दिवसभरच्या श्रमांनी आणि उपाशी पोटाने ग्लानी आली.
उगाच पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून गाडी शक्यतोवर आडमार्गाने काढीत होते. तरीही गाडी आठच्या सुमारास ग्रांटरोडजवळ आल्यावर नेमकी पोलिसांनी थांबवली. कोणीतरी गुन्हेगार पळाल्याची खबर लागल्याने तपासणी चालू होती.
पो. इन्स्पे. आणि दोन कॉन्स्टेबल्स यांनी गाडीभोवती फिरून डिकीसहित तपासली. तिचे बांधलेले हात जावेदने तिच्या पदराने चपळाईने झाकले.
जवळील टॉर्चच्या प्रकाशात पोलिसांनी आत झोपलेल्या मालतीबद्दल विचारलं, "या बाई का झोपल्येत?"
रेहमानला मराठी येत असल्याने तो म्हणाला, "अवो सायेब, दिवसभर प्रवासात असल्यानी त्यांना झोप आली, त्याला काय करणार?"
.....
"ठीक आहे, निघा."
...
असं म्हटल्यावर गाडी पुढे निघाली. लवकरच ते जमना मौसीच्या अड्ड्यावर दाखल झाले.........
(क्र म श:)