शापित स्त्री (भाग ३)

शापित स्त्री (भाग ३)
एक विवाहित स्त्री रहस्यमयरीत्या गायब होते...
त्याच रात्री बेशुद्ध तरुणीला लाखोंच्या सौद्यासाठी काळ्या अड्ड्यावर आणलं जातं...
या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का?
की अजून एखादं भयंकर रहस्य उघड व्हायचं बाकी आहे?

शेजारणीवर विशाखाचं लक्ष माझ्या पेक्षा जास्त प्रमाणात होतं. मी रात्री कामावरून आल्यावर ती म्हणाली, "अहो सात वाजता तिचा नवरा आला. दरवाजा उघडा पाहून त्याने आत जाऊन पाहिलं. ती त्याला सापडली नाही. मग थोड्याच वेळात आपल्या दाराची कडी वाजली. दार उघडलं तर तिचा नवरा दारात."

... मी तिला उत्सुकतेने विचारलं, "काय म्हणाला तो?"

त्यावर वैतागून ती म्हणाली, "मी बोलू ना? ...."

असं विचारणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. पण मी काहीच बोललो नाही.

ती पुढे सांगू लागली, "......मला त्यानी विचारलं. त्याची बायको कुठे बाहेर गेली आहे का? आणि केव्हा गेली? मी मला माहित नाही म्हणून सांगितलं. त्यावर तो स्वतःशी पोलिस असं काहीतरी पुटपुटत गेला. उगाच मी कशाला अडकू, नाही का?"

आपण आपल्या बुद्धीचा अगदी हुशारीने वापर केला अशा थाटात ती बोलली.

मग थोडं तिला चढवीत म्हणालो, "बाकी तू हे फार चांगलं केलंस हं!"

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. मी हातपाय धुण्यासाठी गेलो. शेजारचं दार बंद होतं. दोन्ही खिडक्या बंद होत्या. मला जाता येता काहीच दिसलं नाही. आत तो असणारच.

मी घरात शिरलो. विशाखाला म्हंटलं, "आता पोलीस येतील. सावध राहा. आपण काही पाहिलंय, हे बोलूच नकोस. कारण आपण पाहिलंय, हे कोणी पाहिलेलं नाही. नसेल ना? काय गं?"

....तिने मान डोलावली.

आता एकच करायला हवं. सकाळी उठल्यावर त्याला पाहायला हवं. विचारायचं काहीच नाही. कारण आपल्याला काही माहिती नाही, यालाच चिकटून राहायला हवं.....

झोप चाळवतच लागली. नेहमीप्रमाणे उठायला उशीर झाला. तिचा नवरा केव्हाच निघून गेला होता. विशाखालाही तो दिसला नाही. असे लोक स्वयंकेंद्रीत असतात. बहुतेक इलाज नाही म्हणून जगात राहतात की काय कोण जाणे! आणि माझ्या सारख्या सीध्या (?) माणसाची पंचाईत करतात..... मी सीधा, बरं का!

अजून तरी पोलिस आलेले नव्हते. त्याच्या दाराला कुलूप होतं.

:*************************** ******************************

जमना मौसीचा अड्डा, म्हणजे, एक तीसचाळीस वर्षांपूर्वीचं जुनं घर. खरंतर ते घर तिला जमनशेठने बक्षिसपत्राद्वारे तिच्या नावाने करून दिलं होतं. ऐन जवानीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. गिर्रेबाज जमना जमनच्या डोळ्यात भरली होती. जमनशेठने स्वतःच्या लग्नाच्या बायकोला मौसीच्या पायी घराबाहेर काढलं होतं. तिची जी काही प्रॉपर्टी होती, ती त्याने फसवाफसवी करून स्वतःच्या नावे करून घेतली होती. तशी त्याने त्याच्या ताब्यातील गहाणवटीतील लोकांची प्रॉपर्टी खोटेनाटे धंदे करून हुशारीने बळकावली होतीच..... जे नडले त्यांचा, पोलीस खात्यातील ओळखीच्या बळावर काटा काढून काम साधले होते.

अशा रितीने तो आता प्रॉपर्टीवाला माणूस होता. त्याला आजूबाजूचे चार लोक आता ओळखत होते आणि मान देत होते. नाहीतरी प्रसिद्धीला येण्यासाठी पुरुषाला दुसरं काय लागतं. शिवाय राजकारणी लोकांबरोबर त्याचं उठणंबसणं होतंच.........

काहीही असो, तो जमनाशी मात्र एकनिष्ठ राहिला, हे नक्की. तिच्या धंद्याला त्याने चांगलीच बरकत आणून दिली होती. काही प्रमाणात तो राजकारणी लोकांना पण मदत करीत असे. त्याचं असं "हाय क्वलिफिकेशन" पाहून त्याला राजकारणात येण्याचा खूप आग्रह झाला, पण तो कधी राजकारणात शिरला नाही. त्याचं म्हणणं एकच होतं, "राजनीती बोले तो कीचड है, और कीचडमे मै हात डालनेवाला नहीं."

जणूकाही तो धुतल्या तांदुळासारखा स्वच्छ होता. फार काय, त्याने या बाबतीत जमनाचंही ऐकलं नाही. तशी त्याची मंत्रीसंत्री, फार कशाला, मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर बरोबरही चांगलीच ओळख होती...... मात्र ते लोक त्याला कितपत महत्त्व देत होते, कुणास ठाऊक?........

असो. जमना मौसीच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी खुलाच असायचा. जमनाच्या तसा तो ठेवण्यात कडक सूचना होत्या. एकतर लक्ष्मी केव्हा दारात येईल सांगता येत नाही आणि रस्त्यावर काय चालू आहे याचा ट्रॅकही तिला राहत असे. ती चांगलीच चाणाक्ष आणि हुषार होती. तिच्या मुख्य दरवाज्यावर लिहिलेलं होतं, "आवजो बेन, घर तो आपणुच छे!" तिला गुजरातीचा फार अभिमान होता.

जमनाचा एकच उसूल होता. "धंदा कितना भी गंदा हो, इमानदारीसे करना चाहिए."

म्हणूनच ती या धंद्यात टिकून होती. ती आलेल्या पोरींचा क्वचितच छळ करीत असे. शक्यतोवर ती समजावून सांगत असे.........

रात्रीचे नऊ वाजत होते. अचानक लागलेल्या गाडीच्या ब्रेकच्या आवाजाने ती धावतच खाली आली. गाडीतून उतरणाऱ्या जावेदमीयाला पाहून ती समजली. नवीन माल आलेला आहे.

रहेमान आणि जावेद दोघांनी मिळून मालतीला बाहेर काढली. आता ती शुद्धीवर आली होती. थोडं चक्करल्यासारखं झाल्याने तिचा तोल जाऊ लागला. पण त्या दोघांनी मिळून तिला आतल्या ओटीवजा भागात ठेवली. अंगात अजिबातच एनर्जी नसल्याने ती वेडीवाकडी पडली. तिची शुद्ध पुन्हा हरपली.

तिच्या अंगाला येणाऱ्या घाणीकडे दुर्लक्ष करीत, पण नाकावर चुन्नी धरीत मौसीने जावेदला विचारले, "कौन है ये? और इतनी गंदी कैसे हो गयी? लगता है तुम्हे इसके साथ कुछ किया है."

"पिछले आठदस दिनसे जिसपर निगाह रखी थी, वही धंदेवाली है."

तिच्याकडे अभिमानाने बघत तो म्हणाला, "पचास हजार का माल है. बेचोगी तो कमसे कम दो ढाई लाख तो मिलही जायेंगे. लेकीन जावेद पैसे का भूखा नहीं है."

असं म्हणून त्याने मौसीकडे पाहिलं.

आपली बेरकी नजर तिच्यावरून फिरवीत मौसी म्हणाली, "पचास? इसका तो मैं पंचीस दूंगी."

.....थोडावेळ विचार करून तो म्हणाला, "ठीक है, फिर मैं जाता हूँ गोहरबाईके पास....."

असं म्हणून तो थांबला. मौसी पैसा जरूर बढाएगी असं त्याला वाटलं.

मग दोघेही मालतीला उचलून दरवाजाकडे वळले. तेव्हा मौसी म्हणाली, "उसके पर उठाकर तो तूने देखेही होगे. ज्यादा शरीफ बननेकी कोशीश मत करना."

तरीही तो निघालेला पाहून मौसी बोली, "चल तीसमे सौदा कर डाल, इससे ज्यादा गोहरबाईभी नहीं देगी."

आता मात्र तो मागे वळून तिला खाली ठेवून म्हणाला, "चल बत्तीसमे फायनल कर. निकाल पैसा तुरंत."

ते ऐकून ती म्हणाली, "पैसा क्या पेडपर उगता है क्या? पैसा कल सुबे ले जाना. मै भी तो देखूँ उसे कितनी तकलीफ दी है तूने?"

"ठीक है लेकीन मुकरना नहीं!" जावेदने इशारा दिला.

"जमना कभी मुकरी है क्या आजतक? अब वट ले, चल चल."

असं म्हणून तिने त्याला घालवला आणि रंजीबाईला हाक दिली.

"अरे इसे ले जाकर साफ करा दे. अच्छे कपडे पहना दे. खाना वगैरे खिलाकर आराम करने दे. फिर सोचूँगी इसका क्या करना है!"

.........रंजीबाई तिला घेऊन आत गेली.

जमना आपल्या बैठकीवर बसल्या बसल्या विचार करू लागली. ही बाई धंदेवाली तर वाटत नाही. ही तर घरगृहस्थीवाली वाटते. असल्या बायका तिला आवडत नसत. हिच्यावर जवळच्याच कोणी तरी, नाही तर जावेदने जबरदस्ती केलेली दिसते.

उद्या दुबईहून वासीमखान येईल. सौदा तर पाच लाखांचा ठरवलेला आहे. फारतर लाख सव्वालाख कमी मिळेल. पण उद्याच्या उद्या हिला कशी तयार करायची? वासीमला दोन दिवस तरी थांबावं लागेल. तोपर्यंत हिचंही लक्षण समजेल. नाहीच थांबला तर दुसऱ्या पोरी दाखवू. एकदोन तामीळ आहेत. एक पंजाबी आहे. या पंजाब्यांवर म्हारो विश्वास नथी. त्याला गोरीच हवी असेल तर नेपाळीही दाखवता येईल. पण गोहरकडून उधार आणावी लागेल. म्हणजे तिचा हिस्सा आलाच.

मनातल्या मनात तिने नाक मुरडलं. तिला धंद्यात भागीदारी आवडत नसे. ही आलेली बाई दिसायला बरी आहे. पण हिला विकलेलीच बरी.

......अचानक नारायण आला. तो तिच्या मर्जीतला नोकर. जमन त्याला घेऊन आला होता. दुबोटी केशरी गंध लावलेला नारायण नेहमी सिल्कचा कुर्ता वापरायचा. उंच आणि त्याच्या लोखंडाच्या कांबीसारख्या शरीरयष्टीने तिला केव्हाच मोहात पाडलं होतं. त्याच्याकडे पैसा असता तर ती जमनला सोडून केव्हाच त्याच्याबरोबर पळून गेली असती.

तशी तिने त्याची इच्छा नसली तरी त्याच्या बरोबर एकदोनदा मजाही केली होती. त्याला कोणत्याही कामासाठी ब्लॅकमेल करण्याची गरजच नव्हती. त्याचे संबंध मात्र गल्फमध्ये चांगले होते. कसे, ते तिला माहीत नव्हतं. वासीमला त्यानेच आणला होता. घरचाच असल्याने त्याला कमिशन देण्याची गरजच नव्हती. तो एकटाच असा होता की ज्याला कस्टमर असतानाही कोणाच्याही रुममध्ये जाण्याची त्याला मुभा होती.

.......आता ती सावकाश पान लावीत बसली. रात्री दोन वाजता गिऱ्हाईकी संपल्यावर ती झोपायची. आता जेमतेम साडेअकरा वाजता होते. नाहीतरी रंडीखान्यात वेळेचा हिशोब नसतोच. केव्हाही काहीही करायचं, हाच तिथला शिरस्ता असल्याने त्याला कुंटणखाना, कोठा, चकला अशी नावं पडली होती.

जमनाला झोप जेमतेमच लागली. पाच लाखांचं गिऱ्हाईक तिच्या डोक्यात घुमत होतं. सकाळ फार लवकर झाली असं तिला वाटलं. अजूनतरी तिला दारू न पिता झोप लागत होती. धंद्यातले ताणतणाव तिने नुसते स्वीकारले नाही, तर ते निभवण्यात ती तरबेज झाली होती.

नाही म्हंटलं तरी पोलीस, दलाल, बाऊन्सर्स, सिक्युरिटी गार्ड, डॉक्टर, जेवण बनवणारे कारागीर, रोगी पोरींची वासलात लावणं, शिवाय पोरींचे कधीमधी येणारे नातेवाईक, सर्व प्रकारचे कर आणि राजकारणी, इत्यादी लोकांना तोंड देणं तिचं रुटीन होतं. जमन असताना त्यातल्या बऱ्याच गोष्टी तो सांभाळीत असे.

तरीही तिची तब्येत पन्नास-बावन्नाव्या वर्षीही चांगली होती. आकर्षक बांधा, लाल गोरेपण आणि गुटगुटीत तेजस्वी शरीरयष्टी याने तिच्या कोठीवर येणारं गिऱ्हाईक प्रथम तिच्याकडेच आकर्षित होत असे. त्यात तिचा अहंकार सुखावला जात असे. ती सुद्धा खास गिऱ्हाईकं घेत असे. पण फार कमी. अधुनमधून नारायण होताच, हक्काचा.

......तिने तोंडावर पाण्याचे हबके मारले. आरशात पाहून तिने जुजबी मेकअप केला आणि रंजीबाईला हाक मारली. कालच्या बाईबद्दल विचारलं.

"अरे, मौसी वो तो खूबसुरत और अच्छे घरकी लगती है. उंचे जातवाली होगी, हॉं."

जमनाला उंची जात म्हंटलं की राग यायचा. ऐसे उंचे जातवालेनेही ती चौदा पंधरा साल की थी जभी पहिली बार यहॉं लाकर उसका सौदा किया था. वो उस टाइम कुछ बोली नह थी.....

मग तिने रंजीबाईला दुपारी चार वाजता तिला तिच्या रुममध्ये घेऊन येण्यास सांगितलं.

आता तिने कोठीवरच्या वेगवेगळ्या पोरींच्या कमाईचा हिशोब घेतला. त्यांचा वाटा त्यांना दिला. त्यामुळे पोरी खूष होत्या.

************** *******************************************

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेजारणीचा नवरा मि. राजमाने पो. स्टेशनमध्ये गेले. तेव्हा सात वाजले होते. इन्स्पेक्टर सुराडकर एक चाळीशी ओलांडलेला जवान माणूस होता. नियमित व्यायामाने झालेले मजबूत पिळदार शरीर, तांबट चेहऱ्याचा योग्य तेवढा प्रभाव पाडीत होता. कसल्याशा जाडजूड फायलीत त्यांनी बराच वेळापासून डोकं खुपसलं होतं......

राजमानेंनी तक्रार नोंदवायची आहे असं तीनचार वेळा सांगितल्यावर ते भानावर आले. फायलीतून डोकं बाहेर काढीत म्हणाले, "बसा, आणि आता सांगा कोणाबद्दल तक्रार नोंदवायची आहे?"

मग राजमानेंनी सगळीच हकीकत सांगितली. अर्थातच तिचं कोणीतरी अपहरण केलंय की काय, हे माहीत नसल्याने ते मात्र सांगता आलं नाही. मग शेवटी एक शंका म्हणून त्यांचं अपहरण तर झालं नसेल ना, असा संशय व्यक्त करण्यात आला. पण तसं होण्याचं काहीच कारण नसावं, असं राजमाने म्हणाले.

तरीही सुराडकर म्हणाले, "चला तुमच्या घरी जाऊ, म्हणजे काही माग मिळाला तर मिळेल."

.....त्यावर राजमाने नाराजीने म्हणाले, "माझ्या घरी येण्यापेक्षा शोधायला सुरुवात केलीत तर जास्त बरं नाही का?..."

आता मात्र कडक आवाजात ते म्हणाले, "आमचं काम आम्हाला शिकवू नका, काय समजलात!"

....काही न बोलता राजमाने तयार झाले. मग इन्स्पेक्टर साहेबांनी गाडी काढली. गाडी निघणार एवढ्यात आमच्या चाळीत आलेले कॉन्स्टेबल तिथे आले आणि साहेब कुठे जातायत हे कळल्यावर त्यांनी त्यांचा संशय दबक्या आवाजात त्यांना सांगितला. मग त्यांनाही बरोबर घेऊन इन्स्पेक्टर साहेब निघाले.

(क्रमशः)