गणेशोत्सवी कट्टा !

गणेशोत्सवानिमित्त बरेच जणं जमले म्हणून काल आम्हा दोस्तांचा इकडे एक चुटुकला कट्टा झाला. कितीक दिवसानंतरच्या भेटी त्यामुळे झालेल्या तूफान गप्पा, चेष्टामस्करी हे तर होतंच पण बरेच वादाचे विषयसुद्धा निघाले. त्यात अगदी मूळ अशा 'लग्न करू नये की करावं?' 'बाळं म्हणजे करीअरमध्ये धोंडा.. होऊ द्यायलाच हवं का बाळ?' या विषयापासून सुरूवात होऊन 'नवऱ्यासाठी बायकोनी काही बलिदान केलं/त्याग केला तर तो तिच्या पातिव्रत्याचा भाग असतो/कौतुकाचा विषय असतो पण तेच जर बायकोसाठी नवऱ्यानी असं काही केलं की तो बायल्या/स्त्रैण म्हटलं जाणार/चेष्टेचा विषय बनणार. असं वागवण्यत फरक जाणवतो तो का? आणि कशासाठी?' , 'लग्न करायलाच हवं का? लहान बाळं खूप आवडतात तर अनाथश्रमातून एखाददुसरं बाळ दत्तक घेऊन स्वतःचं आणि त्या बाळाचं असं दुहेरी आयुष्य फुलवलं तर काय हरकत आहे?' पर्यंत ! मध्येमध्ये नविनच साखरपुडा झालेल्या आणि गायनकलेची नव्यानी ओळख पटलेल्या एका दोस्ताकडून कवितांचीही बरसात होत होती.. त्यातली एक

वाऱ्यावरती भुरभुरणारे केस असे की बस्स शब्द थिटे !
केसांमधुनी दरवळणारे गंध असे की बस्स शब्द थिटे !

समीप येता फुल उमलते, भोवतालचे ऋतु बदलती
अंगामधुनी घमघमणारे गंध असे की बस्स शब्द थिटे !

रस्त्यामधुनी चाले ऐसी, सळसळणारी नागिण जैसी
शब्दांमधुनी कडकडणारे डंख असे की बस्स शब्द थिटे !

सायंप्रहरी कधी एकांती, नजरेमधुनी नजर गुंतता
डोळ्यांमधुनी भिरभिरणारे रंग असे की बस्स शब्द थिटे !

सखी पाहुनी लोभसवाणी, दुनिया झाली पुरी दिवाणी
तुझ्याभोवती घुटमळण्याचे वेड असे की बस्स शब्द थिटे !

- अनामिक.

खूपच सुंदर झाला कालचा कट्टा. बरेच विषय चर्चाळले गेले. सर्व विषयांचे माहित असूनही पूर्णपणे न उलगडलेले काही मुद्दे उलगडले तर काही पूर्णतया नविन कंगोरे लक्षात झाले. गणेशोत्सवानिमित्त फुलणारे असे कट्टे कायमच दोस्तांना भेटवणारे, जुन्या आठवणींना उजाळा देणारे आणि खूप काही शिकवणारे असे सिद्ध होतातच, तसे ते यंदाही होत आहेत याचा आनंद आहे.

हा मनोगतींचा कट्टा नव्हता. मग अशा कट्ट्यांबद्दल असं लिहिलं तर चालेल का?