अविस्मरणीय मफलर !

तिसरी-चौथीला असेन मी तेव्हाची गोष्ट.. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती.
"ए आई गं, मी करू तरी काय गं मग? खेळायला बाहेर जाऊ देत नाहीस ऊन आहे म्हणून आणि घरात बसून खेळायला कोणी नाही. सगळ्या पुस्तकांची पारायणं करून झाली माझी.सगळे झोपलेत जिकडेतिकडे ढाराढूर.. दुपारच्या वेळेस झोप कशी काय येते ना काही कळत नाही बाई.. अवघडच आहे सर्वांचं.."
"तू विणकाम शिकतेस का?"
"होऽऽऽ.. शिकव शिकव. मी तुला मागे टाकेन मग विणण्याच्या स्पीडमध्ये.."
आई हसायला लागली. मी लगेच धावत जाऊन दोन सुया बॅगेतून उपसून काढल्या आणि लोकरीचा एक गुंडा घेऊन आले आणि ते सर्व सामान आईच्या हातात देत,"हे बघ आणलं मी सामान. आता शिकव मला." हसतहसत आईने सुया हातात घेतल्या आणि एका सुईवर ती एका हाताने टाके घालायला लागली.
"तूच करते आहेस, मला सांग की कसं करायचं ते.." खट्टू होत माझा आईमागे लकडा..
"अगं आधी सोप्यासोप्या गोष्टी शीक म्हणजे तुला उत्साह वाटेल आणि हुरूप येईल.."
भुवया उंचावत आईच्या या पवित्र्याला माझा निषेध मी नोंदवला पण 'ठीक आहे. आई म्हणतेय तर तसं सही..' असा धोरणी विचार करून माझ्या हातात कधी सुया येतात याची वाट बघायला लागले. आईने एका सुईवर २० टाके घातले आणि दुसऱ्या सुईने विणायला सुरूवात केली. आता मात्र माझा धीर सुटला..
"आऽऽऽईऽऽऽ मला दे की.."
"थांब सांगितलं ना तुला.."
'माझिया मना.. जरा थांब नाऽऽ' ओळी मनातल्या मनात गुणगुणत मी इकडून तिकडे फेऱ्या मारायला सुरूवात केली.
"हं.ये इकडे. हे बघ ह्या अशा सुया पकडायच्या.." असं सांगून ती मला एका सुईवरच्या पहिल्या टाक्यात दुसरी सुई खुपसून दोरा असा फिरवायचा मग असं करून ती सुई बाहेर काढायची आणि मग असा एक टाका दुसऱ्या सुईवर येतो वगैरे सांगत होती.
"ओऽऽऽह... अस्सं असतं का.. खूपच सोप्पं आहे हे तर. आत्ता करून दाखवते.. आहे काय आणि नाही काय?" असं म्हणत तिच्या हातातून सुया घेतल्या.दोन मुठीत दोन सुया धरल्यावर नेमक्या त्या विवक्षित टाक्याला नेम बनवून त्यात दुसरी सुई खुपसायचा प्रयत्न केला. पण तो टाका इतका घट्ट वाटला की त्यातून काही केल्या सुई घुसेचना.
"आई, किती घट्ट विणला आहेस गं तू टाका.. छोटी बच्ची की जान लोगी क्या?"
हसत आई म्हणाली,"अगं तुझ्याकरता खास सैल विणलं आहे मी ! इतक्या सैल हाताने कुठला स्वेटर विणशील तर पोतं होईल !!!"
तिचं बोलणं ऐकून मी वरमले. ४-५ दा मनापासून प्रयत्न करूनही काही केल्या ती सुई त्या टाक्यात जायला राजी होईना. रागारागाने सुया आणि लोकर परत एका पिशवीत कोंबून ती खुंटीला लटकावून दिली आणि पलंगावर पालथी पडून 'सगळ्यांना जमतं.. मलाच कसं जमलं नाही?' असं म्हणून स्वतःवरच्याच रागाने जळफळत स्फुंदायला सुरूवात !
"अगं वेदल, हे बघ अशा सुया धरायच्या असतात, तू मुठीत धरशील तर कसं जमेल.. थोडा वेळ तर लागेलच ना राजा काही नविन शिकायचं म्हटलं की.."
रडवेल्या तोंडाने परत उठून बसत आईकडे जात,"खरंच जमेल का गं मला?" असं विचारलं.
"अगं हो जमेल की. न जमायला काय झालं? असा नाद सोडून नाही द्यायचा, जमेपर्यंत झगडायचं. कळलं का?"
पुन्हा हुरूप आला आणि दोन्ही हातांनी डोळे पुसून परत सुयांशी लढायला मी पुढे सरसावले. आई प्रत्येक पावलाला मला सूचना देत होती, कधीकधी 'इतक्या काय सूचना करतेय ही..' असं वाटत होतं पण त्या सुचनेकडे दुर्लक्ष करून पुढे जायचा प्रयत्न केला तर अडचणी येत होत्या.. शेवटी अशाप्रकारे अख्खी १० मिनिटं गेल्यावर कुठे माझा पहिला टाका दुसऱ्या सुईवर अवतरला ! इतक्का आनंद झाला सांगू.. शब्दात तो व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. अशी झिंगून गेले मी त्या आनंदात की बस्स.. दुसरा टाका करायला मला ५ मिनिटं लागली पण तरीही आता मला कंटाळा येत नव्हता.. उलट दर यशस्वीतेला हुरूप वाढत होता आणि आणिक विणायचा उत्साह ओसंडून जात होता. थोडावेळाने आई तिच्या कामाला निघून गेली आणि मी मात्र नवनिर्मितीच्या आनंदात रममाण झाले होते. पूर्ण दुपार,संध्याकाळ मी तेच विणत बसले होते !!! रात्री मी आईला विचारलं "आई, मला जमतंय गं आता थोडंथोडं विणायला.." माझी खरी पातळी मला कळत होती त्यामुळे आपोआपच उगीचची शेखी मिरवणे सोडून खरं तेच तोंडून बाहेर पडत होतं,"पण आता यातून काहीतरी बनवायला शिकव ना.. आऊकरता ( माझ्या आजीला 'आऊ' म्हणते मी. ) मफलर विणता येईल का गं यातून?"
"हो येईल की. हे बघ असं विणत जा." असं सांगून आईने मला सूचना दिल्या (ज्यांचा मला अजिबात राग आला नाही, उलट जिवाचे कान करून मी त्या ऐकल्या ! ) आणि मी त्याबरहुकूम विणायला सुरूवात करणार इतक्यात डोक्यात विचार आला की 'आऊला रंग कोणता आवडेल पण मफलरचा?' आणि ते विचारायला माझा मोर्चा आऊकडे रवाना झाला.
"आऊ, तुला कोणता रंग आवडतो गं?"
"का गं? एकदम रंग कशाला पाहिजे तुला?"
"अगं मी.." मी इतकं बोलतेय तोवर आईने मला बोलावलं, पण "आले गं दोन मिनिट..आऊशी बोलून येते." असं म्हणून मी आऊला म्हणाले," मी ना तुझ्यासाठी मफलर विणते आहे. कोणत्या रंगाची लोकर घेऊ म्हणजे तुला आवडेल ते विचारते आहे.."
"लोकरीचं विणकाम? बंडे, अजिबात करायचं नाहीस ते विणकाम कळलं का?"
इतक्या उत्साहात विचारायला गेलेली मी, तिच्या अशा बोलण्याने एकदम मलूल होऊन गेले,"का गं? का नाही विणायचं?"
"सांगितलं ना तुला एकदा नाही विणायचं म्हणून.."
नुसताच विरोध ऐकून की डोक्यात सणक गेली तरीही,"अगं पण का?" असं विचारलं मी तिला..
"भांडणं होतात लोकरीचं विणकाम केलं की !" तिच्या या बोलण्यावर हसावं की रडावं तेच कळेनासं झालं मला. अशा काही अर्थ नसलेल्या समजुतींना विरोध करण्याचं मनाने घेतलं आणि आऊचं हे बिनबुडाचं तत्वज्ञान ऐकून मी हसले आणि,"काय गं तू ही आऊ.. असं काही होत नसतं गं. आता बघ मी काल विणलं इतका वेळ कुठे झाली भांडणं? काढून टाक ते डोक्यातून.." या माझ्या वक्तव्यावर आऊ जाम भडकली.
"तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही करायचं म्हणजे नाही करायचं विणकाम.." आऊच्या ह्या वाक्याने माझा पारा चढला आणि तोंडून शब्द निघून गेले,"तुझे बुरसटलेले विचार तुझ्याचकडे राहू देत, मी विणणार म्हणजे विणणार.." आणि काही कळायच्या आतच एक सणसणीत थोबाडीत बसली माझ्या आणि कित्येक रपाटे पाठीवर.. आणि हे सर्व करणारी होती.. आई !!! खाल्लेल्या मारामुळे नाही तर विज्ञाननिष्ठ विचार करायला शिकवणाऱ्या माझ्या आईनेच मी सार्थ विरोध केलेला असताना मला शिक्षा करावी यामुळे अतीव दुःखं झालं आणि,"आऽऽईऽऽ गंऽऽ" असा रडवेला शब्द तोंडून निघाला. "आजीची माफी माग आधी. असं उर्मट पुन्हा कधी बोलणार नाही म्हण आणि पाया पडून माफी माग तिची."
आईचा हा अवतार मला नविन नव्हता, पण मला खूप अपमानकारक वातत होतं काहीही चूक नसताना आऊची माफी मागायचीच का मी?
"आई, पण.."
मला काही बोलूच न देता आई म्हणाली,"तुला जर आजीची माफी मागता येत नसेल तर माझ्याशी एकही शब्द बोलायची गरज नाही इथून पुढे. सगळं मिळेल तुला वेळच्यावेळी, त्याबद्दल काळजी करू नकोस पण माझ्याशी बोलायचं नाहीस. बस्स.." 
नक्की कुठल्या भावनावेगाने आठवत नाही पण मी आपादमस्तक थरथरत होते त्यावेळी. 'आईशिवाय स्वर्गही नको' असंही वाटत होतं आणि एकीकडे 'मी माफी का मागायची?' हा अनुत्तरीत प्रश्नही भेडसावत होता. आई दोन मिनिट तिथे थांबली आणि वळून जायला लागली.. आई जातेय बघून काळजात धस्स झालं माझ्या.
"ए आऽऽऽईऽऽऽ" असं एकदम करूण रडवेल्या आवाजात तिला बोलवूनही तिने माझ्याकडे वळूनदेखिल बघितलं नाही. "आऽऽईऽऽ थांब ना गं.. मी मा... ग...ते...य.. मा..फी... " एकेक शब्द खूप कष्टने बाहेर पडत होता तोंडातून.. माझ्या मनाविरुद्ध ! मी यंत्रवत् गुडघे टेकवले आऊपुढे आणि डोकं तिच्या पायावर ठेवत कसंबसं बोलले,"आ.........ऊ... मा... ला.... मा..फ..." त्यापुढे काहीच बोलायला जीभ रेटेना माझी.. डोळ्यातून टपकणारे अश्रू दुःखाचे होते की पश्चातापाचे की अपेक्षाभंगाचे की आणिक कशाचे हे ठरवण्याच्या एकदम पार पलिकडे गेले होते मी.. आई काहीच बोलली नाही मला फक्त डोक्यावरून हात फिरवून निघून गेली आणि आऊने छातीशी कवटाळलं..

दोघींचं मन मी राखलं होतं.. पण माझ्या स्वतःच्या मनाचं काय? गच्चीत जाऊन मनसोक्त रडले मी त्या दिवशी.. सगळेचजणं असे दुटप्पी का वागतात माझ्याशी कळेनासं झालं होतं मला. एका तासाने आई गच्चीत आली मला शोधत. मी दिसताच माझ्याजवळ येऊन बसली. मी चिडले होते आता तिच्यावर ! तिने काही बोलायच्या आतच माझा पट्टा सुरू झाला,"तू का दिलीस मला ती वैज्ञानिक पुस्तकं बक्षिस म्हणून? नुसतीच वाचण्यापुरती ठेवायची आहेत का ती? मी कोणाला पटवायचा प्रयत्न केला तर तू मलाच शिक्षा करणार.. हो ना? आऊ जे बोलत होती ते बरोबर होतं का? तू तिला का नाही बोललीस काही.. मलाच माफी मागायला लावलीस उलट तिची.. हा कसला न्याय आहे गं तुझ्या दरबारी? मज पामराची चूक तरी काय झाली सांगशील का?" रडल्याने सुजलेल्या तोंडून थरथरता एकेक शब्द बाहेर पडत होता.. काय बोलू किती बोलू आणि काय नको असं मला झालं होतं ! आई शांतपणे ऐकून घेत होती, आणि ते मला आणखीनच जास्त त्रासदायक वाटत होतं ! "आऽऽईऽऽऽ बोल ना गं काहितरी.." माझी टकळी बंद झाली म्हणता ती शांतपणे बोलली,"आऊशी जे बोलल्यावर मी तुला मारलं, ते बरोबर बोलली होतीस का तू? तिच्या वयाकडे, आजवरच्या तिच्या आयुष्याकडे बघून तिच्या मतांना हळुवार रितीने मुरड घालायचा प्रयत्न करायचास की असं बोलून एकदम वार करायचे तिच्यावर? तू सांगत होतीस ते जरी बरोबर असलं तरी ते कोणत्या शब्दात सांगायचं ह्याचं भान नको का तुला ठेवायला?" तिचा एक आणि एक शब्द नेहमीप्रमाणेच याहीवेळेस मला पटला ! भावनावेग ओसरत होता आणि एका वेगळ्याच दृष्टीने मी घडलेला प्रसंग बघायचा प्रयत्न करायला लागले. खूप अवघड होतं सगळंच पचवणं, पण...
आईच्या कुशीत शिरून खूप रडले मी अगदीच अकारण ! रडून झाल्यावर खूप मोकळं मोकळं वाटत होतं आणि एक नविनच आव्हान पेलायला मी सज्ज झाले होते. आई माझ्यासोबत आहे, याचा मला कोण अभिमान वाटला !

"आऊ, अगं चटई घे ना छोटी, पोतं का घेतेस बसायला?"
"चटई चालत नाही सोवळ्यात पुजा करायला, पोतं चालतं."
मनातल्या मनात मी डोक्याला हात लावला. "आऊ, मी पोत्यावर विणकाम करू का गं? आणखी उबदार तर होईलच आणि छानही दिसेल. पटापट करून टाकेन अगदी.. लपूनछपून करेन, म्हणजे कोणालाच कळणार नाही आणि मग भांडण सुद्धा होणार नाही. कोणाला सांगू नकोस बरं का मी करतेय ते. आपल्या दोघींमधलीच असू दे ही गंमत."
आऊचा चेहरा नापसंती दाखवत होता पण नातीला किती काळजी आहे आपली याचं समाधानही स्पष्ट दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर. तिच्या मौनाला 'हो'कार समजून मी लगेच कामाला लागले. तांदळाचं रिकामं पोतं घेऊन त्यावर क्रॉस्टीचच्या चित्रातलं एक चित्र बेतलं आणि आठ टोकांचे टाके घालून ते पोतं विणायला घेतलं. रात्रंदिवस तेच चालू असायचं माझं.. आऊशेजारी बसून तिच्याशी अखंड गप्पा मारत हाताने हाच उद्योग चालू असायचा. तहानभूक विसरून नवनिर्मितीच्या आनंदात रमले परत एकदा ! एकदातर विणताविणता तशीच झोपून गेले होते त्या पोत्यावरच तेव्हा आऊने ते सर्व आवरून ठेवून मला उचलून तिच्याजवळ झोपवलं होतं. माझा उत्साह पाहून तिचा विरोध मावळत होता. आणि एक दिवस,"आऽऽऊऽऽऽ.. हे बघ.. झालं तयार तुझं आसन.. ढँऽऽटाऽडँऽऽऽग.." असं बोलत मी तिला पोत्यावरून उठायला लावून मी विणकाम केलेल्या त्या आसनावर बसायला लावलं. आऊने प्रेमाने जवळ घेतलं मला आणि डोक्यावरून हात फिरवला मायेने.. बस्स.. सग्गळे कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटले.. मी आईला हे सांगायचं म्हणून वळले तर आई मागेच उभी होती मंदहास्य करत ! तिचे डोळेच उदंड बोलून गेले माझ्याशी त्यावेळी. खूप खूप छान वाटलं मला त्यावेळी.. आऊच्या अशा वागण्याने मला परवानाच मिळाला विणकाम करायला.. मग काय विणकामाचं काम जोरात सुरू झालं परत एकदा.. यावेळी आऊच्या मफलरचं विणकाम चालू होतं ! तेही दोन सुयांवर.. आणि अगदी आऊच्या पुढ्यात ! तिनेही प्रयत्न करून पाहिला विणायचा आणि यावेळी मी तिची शिक्षिका होते पण तिच्या चरचरीत बोटांमुळे लोकरीचे धागे अडकून तिला विणकाम करता येत नव्हतं आणि दिसायलाही त्रास होत होता.. त्यामुळे ती फक्त कौतुकमिश्रित नजरेनी मला विणकाम करताना बघायची. पुर्वी आई सर्वांसमोर विणकाम करायची नाही पण ह्या बदलानंतर तीचंही 'दृश्य' विणकाम सुरू झालं ! होताहोता मफलर विणून पूर्ण झाला आणि तो आऊला वापरताना बघून खूप खूप आनंद झाला.. त्यापुढे मी तिला २-३ तरी मफलर दिले विणून पण तिने आजही जीर्ण झालेला असूनही तोच मफलर जपून ठेवला आहे ! त्या मफलरनी मला खूप काही शिकवलं आणि मिळवूनही दिलं, जे मी कधीच विसरू शकणार नाही. खरंच छोट्याछोट्या वस्तूही आपलं आयुष्य बदलवून टाकायचं सामर्थ्य राखून असतात याचीच जणू प्रचिती देणारा ठरला तो अविस्मरणीय मफलर !