पत्रमित्र

    पत्रमित्र


                   कितीदाही विचार झटकून टाकायचा प्रयत्न केला तरी पत्रमैत्रीसाठी दिलेली जाहिरात तिच्या डोक्यातून जाता जाईना. जाहिरातदाराने दिलेली माहितीच अशी होती की तीच काय कित्येकांनी कुतुहलाने पत्र लिहावे.


पत्र मित्राचे वागणे संशयास्पद आहे ह्या वाक्याने तिचे लक्ष वेधले होते. आता असे म्हणणे योग्य आहे का? हा विनोद आहे की लक्ष वेधण्याची एक युक्ती आहे ? की ते वाक्य पत्र मित्राची बेफिकीर वृत्ती दाखवते?
चांगले खरमरीत उत्तर लिहावे याला. वागणे संशयास्पद आणि तरी मैत्रीची अपेक्षा?आपल्यासारखेच दुसऱ्याचे वागणे पण तुला संशयास्पद वाटते काय तुला? कोणत्याही खाजगी माहितीची देवाणघेवाण करणार नाही, प्रत्यक्ष भेटीची अपेक्षा करणार नाही अशा आणखी काही अटी मान्य करून तिने पत्र लिहावयाला सुरुवात केली. मायना तरी काय लिहायचा? प्रिय? आदरणीय?छे.


पत्रमित्रास,
तुझी जाहिरात वाचली. संशयास्पद वागणे ही ओळ खटकली. तेच सांगण्यासाठी हे पत्र. पुढील जाहिरातीत ही ओळ नसेल अशी आशा आहे. पत्रोत्तराची अपेक्षा नाही.
                        जाहिरातवाचक


                  पत्र पोस्टात टाकून बरेच दिवस झाले होते. त्यानंतर काही बदलाविना तीच जाहिरात ३-४ वेळा आली होती. आपला वेळ, पैसा, शाई कागद सगळेच व्यर्थ ! हू केअर्स? मनात आले म्हणून लिहीले. नकोच त्याचा पुन्हा विचार.


                काही दिवसांनंतर तीच जाहिरात तिला हवा तो बदल घेऊन आली होती. तिच्या ओठांवर स्मित झळकले. त्याला धन्यवादाचे पत्र लिहावे का? कशाला, काय गरज आहे ? असे म्हणत तिने तो विचार बाजूला सारला. चार दिवसांनी ती घरी आल्यावर पहाते ते तिच्यासाठी एक भले मोठे एनव्हलप आले होते. पत्ता पाहताच तिने पत्र कोणाचे ते ओळखले. तिने पत्र उघडले. टंकलिखीत केलेले पत्र वाचून आपण उगीच आपल्या हस्ताक्षरात लिहीले असा विचार तिच्या मनात आला. हस्ताक्षरावरून कोणी तर्क करु नये म्हणून केवढी खबरदारी. ती अधिरतेने पत्र वाचू लागली.


प्रिय पत्रमैत्रिणीस,
तुझ्या विनंतीस मान देऊन मी जाहिरातीत बदल केला आहे. मला शब्न्दांचा कीस पाडणाऱ्या व्यक्ती आवडत नाहीत. उगीच तार्किक विचारांनी आपले पांडित्य सिद्ध करण्याची हाव ज्यांना आहे त्यांच्या करता मी इतर वैचारीक खाद्य जरूर देतो.


हा मला टोमणा दिसतो तर.. ती पुढे वाचू लागली.


                 माणसाला त्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून देणारा निसर्ग मला नेहमीच भुरळ घालतो. माणसाची कित्येक वर्षांची वाटचाल मला नेहमीच आकर्षित करते. याच ओढीतून मी हिमालयापासून थेट कन्याकुमारी पर्यंत भटकलो आहे. पुढे त्याने त्याच्या हिमालयातील एक स्कीइंगच्या ट्रीपचे वर्णन केले होते.  चारही बाजूंना उंच उंच हिमाच्छादित शिखरे, बराकी, स्कीइंगचे उतार चढाव मन मोहीत करतात. वर निळ्या आकाशाचे पालथे घुमट, पाईन वृक्षाचा गंध आणि चांदीच्या रंगाचा पसरलेला प्रकाश!


हे सर्व सजीव करण्याची शक्ती त्याच्या लेखणीत होती.


तिने पत्राची पाने पाहिली. आता दहा बारा पाने भटकंतीचे वर्णन वाचण्यापेक्षा तिने शेवटाकडे वळायचे ठरवले. सगळे वाचण्याची चिकाटी तिच्यात नव्हती आणि शेवटी त्याने काय लिहीले आहे त्याची उत्सुकता अधिक होती.


                       तुझे असे अनुभव वाचायला आवडतील, पुढील पत्राचा विषय तिने सुचवला तरी चालेल. शहरी गोंगाटापासून निसर्गाच्या सानिध्यात मानवी वृत्ती काही वेगळी आढळली का?पत्रोत्तराच्या अपेक्षेत,
तुझा पत्रमित्र


 


           लिहावे असे खूप काही तिच्याजवळ होते. केरळच्या सहलीविषयी लिहीता आले असते. कोलोरॅडोच्या बर्फाच्छादित शिखरांविषयी भरभरून लिहीता आले असते. काहीच नाही तर तिच्यातल्या तार्कीकतेला टोमणे मारण्याऱ्याला खाद्य म्हणून तिच्या ग्राहकांच्या हक्कांच्या चळवळीबद्दल सांगता आले असते. पण तिने पत्राचे उत्तर द्यावेसे वाटले तरी थांबायचे ठरवले.


"तुम्हाला काय करायचे असते घरी जाऊन? तुम्ही थांबू शकता तेव्हा तुम्हीच याकडे लक्ष द्या"तिला कोणतीही सांसारीक जबाबदारी नाही याची जाणीव एका सहकाऱ्याने मुद्दाम चारचौघांदेखत करून दिली. कामकरता थांबण्यास तिची ना नव्हती पण सहकाऱ्यांचे, नातेवाईकांचे मित्रमैत्रिणींचे असे जाणूनबुजून केलेले तिच्या आयुष्याविषयीचे उल्लेख तिला खटकायचे, दूर्लक्ष करायचे ठरवले तरी बोचायचे.


               काम संपवून ती घरी आली. कोरे कागद आहेत ना याची खात्री करुन तिने टंकलेखनास सुरूवात केली. हिरवीगार वनराई, पर्वत, सुपीक जमीन, समुद्रकिनारा अशा नयनरम्य निसर्गसौदर्याने नटलेला केरळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहीला. हिरव्या रंगाच्या विविध छटांनी समोर येणारी भाताची शेती, चहाचे मळे, केळीच्या बागा याचे वर्णन ती करू लागली.


           निळे आकाश, हिरवीगार झाडी, संथ पाण्यात चालणाऱ्या बोटी याने येणारा शांततेचा सुखद अनुभव तिला नेहमीच मोहवत आला होता. चीन व इजिप्त या देशांचे ख्रिस्तपूर्व ३ शतकापासून केरळाशी व्यापारी संबंध आहेत अशा पुराव्यांचे वर्णनही तिने केले.तिला थकवा जाणवू लागला, तिने लेखन थांबवले. मध्यरात्रीचे अडीच वाजले होते. तिला आवडलेली स्मारके, राहणी, वेशभूषा, नृत्यकला व धर्म अशा विविध विषयावर तिने पत्रात लिहीले होते. चहाचे मळे, डुंबणारे हत्तींचे कळप आणि सूर्यास्ताचे मनोवेधक देखावे अशा कित्येक गोष्टींची माहिती तिने दिली होती.


     निसर्गाची रूपे जरी वेगळी असली, भाषा वेगळी असली तरी माणसे तशीच असतात.. तेच प्रश्न .. कुठे असता? काय करता? घरी कोण? असे का? तसेच का? अरेरे.... जणू आधीच्या मतांची पुनरावृत्तीच.


 तिने शेवटी लिहीले-
निसर्गाची भव्यता व त्याची रूपे मनाला भुरळ पाडतात पण माणसाची संकुचित वृत्ती मात्र आपल्याला क्षुद्रतेची वारंवार जाणीव करून देते. तेव्हा मनात विचार येतो की एकवेळ निसर्गाला समजवून घेता येईल पण माणसाच्या मनाचा थांबपत्ता लागणे महाकठीण काम आहे. याचे उत्तर तिला आजवर सापडलेले नाही.


                 जगभरातल्या भटकंतीचे आढावे, आवडत्या कविता, नाटके, चित्रपट , आवडलेली पुस्तके अशा अनेक विषयांवर त्या दोघांनी चर्चा केली होती. एक दिवस ती घरी आली. तिने गठ्ठ्यातून त्याचे पत्र घेतले.  तिने पाकिट उघडले, त्याचे हे सहावे पत्र. आपले उत्तर जाईल तोवर पत्र मैत्रीचा एका वर्षाचा कालावधी उलटलेला असेल. त्यान एकदाही स्वतःची माहिती दिली नव्हती वा तिची विचारली नव्हती. अशा स्वतःशी संबंध नसलेल्या गोष्टींवर वर्षानुवर्षे लिहिता येईल पण हेच हवे होते का तिला?पण मनातले सांगायचे तरी कोणाला?


    हा पत्रमित्र खरच पुरूष आहे की स्त्री? काय वय असावे? एका वर्षात एकदाच पत्ता बदलला आहे. अजुनही अधुनमधून पत्रमित्रासाठी जाहिरात देतच असतो.  आपणही इतरांप्रमाणे विचार करू लागलो याचे तिला हसू आले. आज काही वेगळे लिहूया अशा विचारात तिने कागद नीट ठेवले व टंकलेखनास सुरूवात केली.


                एकाच महाविद्यालयात शिकून पुढे एकाच कंपनीत राजस आणि रेवतीने नोकरीस सुरुवात केली होती.  आपल्या लग्नाचा निर्णय दोघांनी घरी व मित्रमंडळींना सांगितला तेव्हा त्यांना ते अपेक्षितच होते. लग्नानंतर दोन तीन महिन्यात दोघे एका प्रोजेक्ट्वर अमेरिकेत आले. पाच दिवस भरपूर काम आणि दोन दिवस मनसोक्त भटकंती. दोघेही कंपनीची ऑफर घेऊन तेथे नव्या जोमाने कामाला लागले.  कालांतराने रेवतीचे प्रोजेक्ट बदलले आणि तिचा बॉसही.


       नव्या कामावर रेवतीला कधी जास्त वेळ कार्यालयात थांबावे लागे. सहकाऱ्यांशी वागण्यात असलेला मोकळेपणा, उशीरा घरी येणे, पत्नीचे इतरांकडून होणारे कौतुक राजसला खिलाडूपणे घेता येईना. मग काय रोजचे वाद आणि भांडणे.


        लग्नाआधी आपले हे वागणे आवडंणारा हाच का राजस? खर ओळखू शकलो का आपंण याला ? का हाच बदलला आहे?रेवती नेहमीच्या वादाला कंटाळली होती. पण आपले करियर राजसच्या स्वभावखातर तिला अर्धवट सोडायचे नव्हते.


राजसने घटस्फोटाचा प्रस्ताव मांडला, रेवतीलाही तडजोडीची गरज भासली नाही. तिने दोघांचे मार्ग वेगळे असण्यात शेवटी त्यांचेच भले आहे असे मानून वाटचाल सुरु केली. राजसही याला अपवाद नव्हता.


तिने कथा पूर्ण केली, पत्रमित्रास चूक कोणाची ?असा प्रश्न शेवटी विचारला. पाकीट बंद करून पत्र पोस्टात टाकायचे ठरवले.


दोन दिवसानंतर ती घरी येते तर पत्रमित्राचे भले मोठे पत्र आले होते. एवढ्या लवकर? म्हणजे दोन्ही पत्रांची चुकामूक झाली होती तर...तिने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. त्याने एका जोडप्याची कथा लिहिली होती. 


            त्यालासुद्धा तिचे पत्र मिळाले. अनेक वर्षाचा त्याचा संयम सुटला होता. पण नेमका नको तेव्हा...............त्याने शांतपणे टंकलेखन केले, पुढील महिन्याची तारीख घातली आणि पत्र बंद केले. त्याला कल्पना होती तिचे आणि त्याचे कदाचित हे शेवटचे पत्र असेल.