हसणार कळ्या फुलणार फुले येणार ऋतू जाणार ऋतू
सजणार इथे मधुमास, जरी असणार न मी, असणार न तू
उठणार सख्या वाळूवरती हलकेच पुन्हा पाऊलखुणा
संकेतस्थळी अपुल्या फिरुनी लाजून कुणी भेटेल कुणा
ती तीच पुन्हा स्वप्ने सारी रमणार नव्या डोळ्यांत जुनी
त्या तश्याच विव्हल सुरांसवे शोधीत कुणा फिरणार कुणी
ती वचने, त्या आणाभाका, ते हसणे, रुसणे, सावरणे
ते मंतरलेले क्षण सारे.. ते बावरणे.. ते मोहरणे..
ते तसेच सारे पुन्हा पुन्हा घडणार आपुल्या माघारी
हे शाश्वत अपुले प्रेम सख्या या अशाश्वताच्या संसारी ...