षड्ज

कसे माझे जग । जाहले उदास
एक तुझा ध्यास । लागलासे


तूच व्यापलीस । व्यथांची पोकळी
वेदना मोकळी । सापडेना


चोहीकडे तुझ्या । आभासांचा गाव
जाणीवांची धाव । तुझ्यापाशी


(तुझ्या विरहाच्या । वेदनांची चव
अमृत आसव । जणू भासे)


वेदनांची नशा । सर्वांगा व्यापून
तुलाही लंघून । जाई आता


 आगीत थंडावा । भासतो अताशा
संकेतांची भाषा । कळू लागे


आता फक्त उरे । सावली सावळी
पाण्याने पातळी । ओलांडली


कुल्फीचा श्रीनाथा । निषाद लागला
न्या आता षड्जाला । आयुष्य हे


--कुल्फी
२. ३. २००६