टाकीचे घाव

एक शिल्पकार एकदा देशाटनाला निघाला.मजल-दरमजल करत तो पुढे पुढे जात होता.आजूबाजूचा निसर्ग पाहून त्याचं मन हरखून जात होतं. कुठे झुळझुळणारे झरे होते तर कुठे हिरवी-पोपटी वनराई!कुठे मखमाली फुलपाखरे भेटत होती तर कुठे मधुगान करणारे पक्षी!जसजसा तो पुढे जात राहीला तसं या निसर्गसौंदर्यानं त्याच मन अधिकच आल्हाद झालं. एवढी सुंदर सृष्टी निर्माण करणाऱ्या आणि त्या सृष्टीसौंदर्याचा उपभोग घेण्याची वृत्ती देणाऱ्या परमेशाचे तो मनापासून आभार मानीत होता.


असाच पुढे पुढे जात असताना एका ठिकाणी त्याला काही पाषाण दिसले.काळे-कभिन्न आणि भव्य! एवढे सुंदर पाषाण पाहून त्याच्यातला कलाकार जागा झाला‌. सृष्टीनिर्मात्या परमेश्वरास अभिवादन म्हणून त्यानं देवाच एक शिल्प साकारायच ठरवल. छिन्नी आणि हातोडा घेऊन एका पाषाणावर त्याने घाव घातला... छन्न..! एवढ्यात आवाज आला.."आह..आई गं.. नको,नको रे मारुस मला!" शिल्पकाराने चमकून पाहीलं तर तो पाषाणच विनवत होता, "तुझे हे घाव सहन होत नाहीत मला. नको मारुस,दया कर..!" शिल्पकार निमूटपणे पुढच्या पाषाणाकडे वळला. अहोरात्र मेहनत करुन एक रेखीव मूर्ती त्याने बनवली. परमेश्वराचे ते सुंदर शिल्प तयार झाल्यावर स्वतःच्याच त्या भव्य रचनेकडे त्याने डोळे भरुन पाहीले. मूर्तीच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित आणि विशाल नेत्र जगातील सर्व दुःखांचे हरण करणारे आहेत असं त्याला भासलं. त्या मूर्तीला नमन करुन तो पुढे निघाला.


          अशीच काही वर्षे लोटली. शिल्पकार आता परतीच्या मार्गावर होता. परतताना त्याला त्याने साकारलेल्या त्या मूर्तीची आठवण झाली. तो पुन्हा त्या जागेकडे निघाला. तिथे जाऊन पाहतो तर एक सुरेख मंदीर उभारलं गेलं होतं.भाविकांची बरीचशी वर्दळ दिसत होती.


आत जाऊन देवाच दर्शन घ्याव म्हणून मंदीराच्या पहील्या पायरीवर पाय ठेवला आणि आवाज आला, "काय, ओळखलं का?" शिल्पकाराने इकडं-तिकडं पाहीलं तर ती पायरीच त्याच्याशी बोलत होती. " काही वर्षांपूर्वी जेव्हा तु हे शिल्प साकारत होतास त्यावेळी पहीला घाव माझ्यावरच घातला होतास. त्यावेळेस मी तुला थांबवलं. तेव्हा ते घाव मी सहन केले असते तर आज लोक मंदीरात जाऊन माझ्यापुढे नतमस्तक झाले असते. अस लोकांच्या पायदळी तुडवलं जाण्याच भाग्य माझ्या वाट्याला आलं नसतं. तू इथून गेल्यावर काही दिवसात लोकांनी हे मंदीर उभारलं आणि मी ही पायरी झालो...!"


शिल्पकार हसून त्याला म्हणाला, " तुझी चूक तुला थोडी उशीरा कळली बंधो! पण परमेश्वर आणि त्याचा भाविक  यांच्यामधला दुवा बनण्याचं काम तू करतोयस हे ही नसे थोडके! शेवटी तुझ्या मार्गाने जाऊनच भक्ताला त्याचा देव भेटतो."


..... आणि एवढं बोलून तो पुढे निघाला.


( ही रुपककथा ई-मेल मधून इंग्रजीत आली होती तिचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे.)