अधुरी एक कहाणी (एक सत्यकथा ) भाग २

अधुरी एक कहाणी
(एक सत्यकथा भाग २)


"गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी अन् माझे कुंटूबिंय आमच्या कोकणातल्या गावी चिपळूणला निघालो होतो. यंदा एस्. टी ला पर्याय म्हणून आम्ही कोकण रेल्वेने जायचं ठरविले, आणि पहाटेपहाटे दिवा स्थानकात पोहचलो. गाडीचे सर्व डबे सामान्य असल्यामुळे आम्ही लवकर जागा पकडण्यासाठी गाडीत चढलो. मी ज्या जागेवर बसले त्याच्या समोरच्या जागेवर शाम बसला होता, माझ्यासारखीच त्याने ही अख्खं बाक अडवलं होतं. थोड्यावेळाने जागेवरुन त्याची व आमची जुंपली पण लगेचच परिस्थिती निवळली. गाडीच्या गतीसोबत आमची बोलणीही वाढत गेली. आणि बोलता बोलता त्याने मला आपला मोबाईल क्रमांक दिला, आणि मुंबईत परत आल्यावर फोन कर असे म्हणाला.
         आम्ही चिपळूणवरुन परतून पुन्हा मुंबईत आलो. मनात थोडी हुरहुर होती पण मन घट्ट करुन मी फोन केला. फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आमचे भेटायचे ठरले. तो मला घाटकोपर येथे भेटायला येणार होता. मी बऱ्यापैकी उत्सुकतेने भेटावयास निघाले. आणि या पहिल्याच भेटीत आम्ही दोंघ एकमेकांच्या प्रेमात पडलो.
        ती बोलायची थांबली. तेव्हा मी मिशीतल्या मिशीत हसत होतो. मला हसताना पाहून ती भानावर आली असावी. थोड्याश्या गोंधळलेल्या स्वरात म्हणाली "हसताय का?" मी म्हणालो "हसू नाहीतर काय करु? पहिली भेट-फोन नंबर देणे - दुसरी भेट - प्रेम जाहीर" ही कथा थोडीशी फिल्मी वाटतेय वात्सवाच्या जवळपास जाणारी नाही म्हणून हसतोय. थोडसं न राहून आश्चर्य वाटलं ना.
       तिथुन पुढे प्रत्येक दिवसाचं धावतंवर्णन ती मला ऐकवायची, "आज आम्ही इकडे फ़िरलो.... आज आम्ही हे खाल्लं" सारं सारं काही सांगायाची. कदाचित माझ्यावर विश्वास असावा म्हणून इतर सहकाऱ्यांपेक्षा ती मला मनातलं सारं काही सांगायची. एकदा तर माझी आणि शामची भेट ही करुन दिली. शाम देखिल  दिसायला बऱ्यापैकी सुंदर, स्वभावाने चांगला होता. आणि सीमाची निवड योग्य असल्याची मला खात्री झाली. तेव्हा मी त्या दोघांना होईल तेवढे सहकार्य करण्याचे ठरविले. अधिक चौकशीअंती कळले की, सीमा व शामच्या विवाहाच्या वेळी जातीचा प्रश्न उभा राहिल. कारण सीमा तिलोरी कुणबी आणि शाम गाबित. दोन्हीही हिंदुच्याच पोटजाती पण आपल्या समाजात जातीला महत्त्व फार. कारण आपले वडीलधारे पुरोगामी विचारांचे त्यामुळे या विवाहास त्यांची संमती मिळेल की नाही ही शंका. तसं मी तिला बोलूनही दाखवलं पण म्हणतात ना प्रेमाला वय, जात, धर्म, रंगरुप नसते असाच काहीसा इथं अनुभव येत होता. तसं पाहिलं तर हे प्रेमयुगल मात्र बिनधास्त होते कारण पहिलंच प्रेम आणि समाजातल्या रुढींचा, पद्धतींचा, विचारांचा अनुभव कमी त्यामुळे सारं काही आलबेल होईल हा गोड गैरसमज.
      


क्रमशः