अधुरी एक कहाणी (एक सत्यकथा)

अधुरी एक कहाणी
(एक सत्यकथा)


ही एक सत्यकथा आहे. ही कथा वाचल्यानंतर या कथेतील प्रेमयुगूलाला कृपया योग्य मार्गदर्शन करावे.


   गणेशोत्सव संपून आम्हाला आता नवरात्रौत्सवाचे वेध लागले होते. याच दिवसांत आमच्या ऑफ़ीसात एक नवीन महिला कर्मचारी कॅम्प्युटर ऑपरेटर या पदावर कामासाठी रुजू झाली. नाव सीमा (बदललेलं) वय वर्षे बावीस. दिसायला बऱ्यापैकी सुंदर, पण बोलण्यातल्या एका वेगळ्या खासीयतेमुळे लवकरच तिने सर्व सहकारी कर्मचाऱ्यांची मने जिंकली. तिचे डोळे मला बाजारात विक्रीस असलेल्या दुर्गेच्या मुखवट्यासारखे (दाक्षिणात्य नर्तकी ) वाटायचे म्हणून मी तिला 'दुर्गा' या टोपणनावाने  हाक मारायचो. पुढे 'पछाडलेला' या मराठी चित्रपटातील "एऽऽ डोळे बघ ... डोळे बघ..." या संवादामुळे आम्ही तिला दुर्गामावशी हे विशेषण चिकटवले. सीमा आम्हालाही वेगवेगळ्या नावाने संबोधायची. मला तर चक्क 'बटूवामन' म्हणायची. (माझी उंची कमी असल्यामुळे). अवघ्या महिन्याभरात ती आमच्यातली होवून गेली.
       थट्टामस्करीत दिवस उडून जात होते. आणि एके दिवशी गप्पा मारता मारता फोन खणखणला.
"सीमा आहे का ?" पलीकडून आवाज.
"आपण कोण?" माझा प्रश्न.
"मी तिचा मित्र बोलतोय." माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या सीमाकडे मी फोन सरकवला. आणि त्यानंतर ती बराच वेळ बोलत होती. तिचं बोलणं संपल्यावर मी सहजच विचारले. "हा शाम कोण?"
"माझा मित्र" ती चाचपडत म्हणाली.
"मित्र की त्यापेक्षा काही वेगळं ?" मी अंधारात खडा मारला अन् काय आश्चर्य खडा अगदी निशाणावरच लागला. थोडेसे आढेवेढे घेत अखेर ती आपली प्रेमकहाणी सांगू लागली...................!!!


क्रमशः