५२. कवितेस - बालकवी

५२. कवितेस


मत्काव्यदेवते येई          दे भेट तुझ्या दासाला;
तळमळतो गे तुजसाठी    आत्मा हा व्याकुळ झाला.
तू सरिता प्रेमळ माझी      का त्यजिसी मज मीनाला?
तुजविषयी ध्यास जिवाचा,
त्वद् रूपी रमली वाचा,
ये,पुरवी छंद मनाचा,
जग नको तुझ्याविण त्याला - दे भेट तुझ्या दासाला

धुंडिले विश्वभर तूंते      लागेना ठाव कुठेही;
रानीवनि भटकत फिरलो    लाभलीस परि तू नाही;
अश्रूंसह हृदय गळाले    चिंतेने चित्त मिळाले;
दुःखांनी कावुनि गेलो,     तुजसाठी वेडा झालो;
कोठे न परी तू काही,
तगमगही थांबत नाही;
दुःखा मन मोजित नाही;
उद्युक्त तुला बघण्याला - दे भेट तुझ्या दासाला

परि आता गिरिशिखरे ही     पसरली सभोती घोर
हे उदधी उग्रकराल    भिवविति मज वारंवार;
आडवे पथी हे आले    तम माझ्या हाय अपार,
हे सर्प विषारी त्यांत     मजवरी करिति फूत्कार,
अवघडले आता येणे,
आशांची झाली स्वप्ने,
नैराश्य मानसी बाणे,
सांगू हे दुःख कुणाला - दे भेट तुझ्या दासाला

या उदास जगती साऱ्या      तुजवाचुनि मजला कोण?
'प्रेम तू' उडोनि जाता     मग काय इथे राहून?
तू सांग मला 'मी येथे      आलोच पहा' धावून
हा काळ संपला जेथे,
क्षण वास न औदस्याते,
प्रेमाविण पाश न जेथे,
तू असशिल त्या स्थानाला -  दे भेट तुझ्या दासाला