सन्जोप राव, तुमचा काय प्रॉब्लेम आहे?

'मनोगत' वर आपल्या प्रक्षोभक लेखनाने अल्पावधितच असंख्यांच्या शिव्याशापांचे धनी झालेले कुणी एक भडभुंजे लेखक सन्जोप राव यांच्या 'मनोगत' च्या प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीतील हे काही अंश.


वस्तुतः हे सन्जोप राव मुलाखतीला तयारच नव्हते. पण कोंबडी खायला घालतो म्हटल्यावर कुंभमेळ्यातल्या साधूप्रमाणे एका पायावर तयार झाले. आज चतुर्थी आहे म्हटल्यावर त्यांचा कोंबडी खाण्याचा उत्साह वाढल्यासारखे आमच्या प्रतिनिधीला वाटले. एका आडमार्गीच्या ढाब्यावर सन्जोप राव रश्श्यात चपाती बुड्वून हाणत असताना आमच्या प्रतिनिधीने साबूदाणा खिचडी खाताखाता त्यांना काही प्रश्न केलेः


प्रः सन्जोप राव, तुमचा काय प्रॉब्लेम आहे?


सं.राः रस्सा थंड आहे.


प्रः फालतू  विनोद करू नका. मी काय म्हणतोय ते तुम्हाला नक्की माहिती आहे. 'मनोगत' सारख्या शुद्ध, सोवळ्या ठिकाणी तुम्ही वारंवार तुमच्या वाद्ग्रस्त, घाणेरड्या विषयांचे फुगे का फोडत असता? तुम्ही स्वतःला फार शहाणे समजता काय?


सं.राः कुणापेक्षा?


प्रः अहो, माझ्या प्रश्नाला प्रतिप्रश्न नका हो विचारू. हे जे काही तुम्ही लोकांच्या श्रद्धास्थानांविषयी अचकटविचकट, धार्मिक भावना दुखावणारे लिहिलेत....


सं.राः अहो, थांबा, थांबा. मला एक सांगा, मी तुम्हाला कसा दिसतोय?


प्रः कसा म्हणजे? आपण काय स्वतःला मदनाचा पुतळा समजता काय? जसे आहात तसेच दिसता.


सं.राः पण म्हणजे नक्की कसा?


प्रः हेच..बेताची उंची, पोट सुटलेलं, अर्ध्याहून अधिक टक्कल, जाड चष्मा, पिचपिचे डोळे, चेहऱ्यावर वांगाचे डाग...


सं.राः सांभाळून हो प्रतिनिधी, तुम्ही भावना दुखावताय माझ्या..


प्रः अहो, पण मी मला जे दिसतंय तेच सांगतोय..वस्तुस्थिती..


सं.राः हां, वस्तुस्थिती सांगणे यालाच भावना दुखावणे म्हणतात काही लोक.लाल रंगाला लाल म्हटलं की औचित्यभंग, नागव्याला नागवा म्हटलं की जाळपोळ, व्यसनीला व्यसनी म्हटलं की हाणामारी....


प्रः अहो, पण कुठं काय बोलावं याचं काही तारतम्य...त्या आपल्या महाराजांच्या जपाला तुम्ही चक्क अर्थहीन बडबड म्हणालात. त्याचा सांकेतिक अर्थ तुम्हाला कितीतरी जाणकारांनी समजावून दिला तरी.


सं.राः अहो, पापी पामर आम्ही. आम्हाला कुठली अशी सांकेतिक भाषा कळायला.  पण माझा एक विचार आहे, बघा हं तुम्हाला पटतो का..


प्रः आता आणखी काय नवीन?


सं राः नाही, एक विचार आला डोक्यात. उद्या समजा मी, पण मी पापी कशाला, समजा आपले तात्याबा महाराज - त्यांना एखादी फाटकी लंगोटी दिली नेसायला, आठेक दिवस अंघोळ नका करू आणि जमल्यास दातही नका घासू म्हणून सांगितलं, आणि हातात दिली एखादी चिलीम भरून - तात्यांकडे असेलच म्हणा बहुतेक ती - आणि दिला एखादा सांकेतिक जप...


प्रः जसा की....


सं.राः जसा की ' पंख होते तो उड आती रे, रसिया ओ बालमा'


प्रः जळळं थोबाड तुमचं. हा कसला डोंबलाचा जप.


सं. राः हां महाराज, तीच तर ग्यानबाची मेख आहे. ऐऱ्यागैऱ्यांना नाही कळणार हा जप...


प्रः जप कसला, सिनेमातलं गाणं आहे ते...


सं. राः अहो, ते तुमच्याआमच्यासाठी. साधकांनी विचार केला तर यातला गूढार्थ ध्यानात येईल. पंख म्हणजे साधे उडण्याचे पंख नव्हेत, हे तर साधनेचे, श्रद्धेचे , कृपापंख, रसिया चा अर्थ आला का ध्यानात? रशियाचा अपभ्रंश आहे तो. तुझ्या कृपेचे पंख मिळाले तर हे ईश्वरा, मी रशियापर्यंतही उडत येईन. कुठपासून? तर तात्याबा महाराज म्हणतात 'बालमा' - बाल म्हणजे केस. मा हे छोटे रूप आहे 'माझे' चे. म्हणजे माझ्या केसापासून रशियापर्यंत पसरलेल्या हे जगन्नियंत्या, तुझ्या कृपेचे पंख दे तर मला, की मी आलोच तुझ्यापर्यंत उडत...


प्रः ( हैराण होत) अहो पण...


सं.राः आणखी एक गंमत  लक्षात आली का तुमच्या, तात्याबा महाराज पुरुष असून 'आती रे' असं म्हणतायत. अहो, भेदाभेदाच्या पलीकडे गेलेले हे योगी पुरुष. पुरुष- स्त्री हे किरकोळ फरक आपल्यासारख्या मर्त्य मानवांसाठी हो...पण काय हो, तात्याबा होतील का हो तयार? तुम्हाला काय वाटतं?


आमचे प्रतिनिधी सोडा पिण्यासाठी बाहेर निघून गेल्याने सदर मुलाखत अर्धवट राहिली. शेवटची बातमी हाती आले तेंव्हा सन्जोप राव रस्सा मागवत होते, असे कळते.