दोराईस्वामी

       


 


          "अम्मा ss नारियल पक गया sssनिकालनेका मंगता?" साधारण साडेचार फूट उंचीचा,बऱ्यापैकी काळ्यासावळ्या रंगाचा,पस्तिशीचा दोराईस्वामी माझ्या आईला सोसायटीच्या आवारातील माडावरचे नारळ काढायचे आहेत का,असं विचारत होता. या दोराईस्वामीला प्रथम कधी पाहिलं ते काही आता आठवत नाही. हा माणूस माडावरून नारळ उतरविणे आणि झाडाच्या फांद्या तोडणे या कामांत एकदम विशेषज्ञ!! "पी. एच. डी." चं म्हणा ना !!! याच कामासाठी कधीतरी सोसायटीत आला असावा आणि कायमचा होवून गेला.या दोन मुख्य कामांवरच त्याची उपजीविका.फणसांच्या हंगामात झाडावरून फणस काढणे हा जोडधंदा.


          तपकिरी रंगाचा,उभ्या सळयांची नक्षी असलेला हाफ शर्ट आणि तशाच मळखाऊ रंगाची हाफ पँट.कमरेला एका दोरखंडाने बांधलेला तो विशिष्ट प्रकारचा नारळ तोडायचा विळा.याच अवतारात ही वामनमुर्ती असायची. जितकी शिसवी त्वचा तितकेच काळेभोर डोळे. तेलाने चापुन बसवलेले जरा जास्तच वाढलेले केस. दंड आणि पोटऱ्या अंगमेहनतीच्या कामामुळे  पीळदार आणि घट्टमुट्ट. पण हसला की त्याचे पांढरेशुभ्र,मोत्यासारखे दात मात्र फारच सुंदर दिसायचे. हास्यही असं की अगदी मनापासून,लहान मुलासारखं. त्या हास्यामुळेच त्याचा तो अतिशय सामान्य चेहरा लोभस,साजरा दिसायचा. लहानथोर सगळ्यांशीच विनयाने वागायची वृत्ती.बोलण्यात चांगलीच तमिळ हेल असलेली हिंदी भाषा. त्याच्या तोंडून तशी हिंदी ऐकायला खूप गंमत वाटायची.


          आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला बऱ्याच मोठ्या परिसरात सगळे बंगले.त्यामुळे मुंबईच्या उपनगरात राहूनसुद्धा झाडामाडांची संख्या पुष्कळ. दोराईस्वामी त्याच्या "अंडर" असलेल्या या परिसरात फिरून तयार होणाऱ्या नारळांवर लक्ष ठेवून असे.नारळ तयार होत आले की मालकाला गाठून नारळ काढायचे काम हाती घेत असे. उंच अशा माडांवर चढणे म्हणजे खरंच खूप सराव हवा,सांभाळून चढायला हवे. इथे हा माणूस चक्क वानरासारखा सरसर वर चढत असे.माडावर चढताना पुष्कळवेळा खोडाला आणि कमरेला संरक्षणासाठी एक दोरी बांधतात.पण हा तिच्याशिवायच. सरळसोट अशा माडावर त्याला असं कसं काय चढता येतं, हे माझ्यासाठी एक कोडच होतं. त्याची बिदागी ठरलेली. प्रत्येक माडाचे "क्ष" रुपये आणि प्रत्येकी दोन नारळ.


           माझी आई सोसायटीची सेक्रेटरी असताना एकदा याचा नारळ काढायचा कार्यक्रम होता.त्याचे पैसे देण्यासाठी सोसायटीचे चेअरमन श्री. अय्यर काका त्याला घेऊन आमच्याकडे आले. नियमानुसार पैसे दिल्यावर त्याची पावतीवर स्वाक्षरी घेणे आवश्यक होते. आई घरी नव्हती.त्यामुळे अय्यर काका मला म्हणाले याच्यासाठी शाईचे पॅड आण. याच्या अंगठ्याचा ठसा घ्यायला हवा. काका हे सगळं छान मराठीत बोलत होते. त्यामुळे दोराईस्वामीला आम्ही काय बोलत आहोत याचा पत्ता नव्हता. मी शाईचे पॅड पुढे केल्यावर लगेच तो त्याचे ते जाहिरातीतल्या सारखे असणारे हास्य झळकवत म्हणाला "अमको लिखना मंगता sss". मला तो साक्षर आहे हे बघून आनंद झाला. मी त्याला पेन दिले. आता तो त्याच्या लिपीत स्वतःच नाव कसं लिहितो ते मी आणि काका उत्सुकतेने पाहू लागलो. या पठ्ठ्याने जी स्वाक्षरी ठोकली ती पाहून मी आणि काका अवाक !! माडावरून काढलेले असोल नारळ एका बाजूला एक असे एका रांगेत मांडून ठेवले तर जसे दिसतील तश्या अक्षरात चक्क इंग्रजीत स्वाक्षरी !!! "तुमको इंग्लिश आता?" काकांनी न राहवून शेवटी विचारलंच. "हम दो साल स्कूल गया sss" असं दोराईस्वामीने (त्याचा उच्चार 'दोरायस्साम्मीsss') लाजत लाजत सांगितलं. खरंतर तेंव्हाच आम्हाला त्याचं नाव कळलं. तोपर्यंत आम्ही त्याला 'नारळ काढणारा' अशा नावानेच ओळखत होतो.


          याची चलती बऱ्याच मोठ्या परिसरात असल्याने हा कुठे ना कुठे काम करताना अधून-मधून दिसत राहायचा. एकदा माझ्या बाबांनी त्याला एका बंगल्याच्या आवारात झाडाचे फणस काढताना पाहिलं.त्यांनी त्याला सहजच 'ए दोराईस्वामी' अशी हाक मारली.दोराईस्वामीला आपल्याला कोणी माणूस असं नावानिशी ओळखतोय हे पाहून खूप आनंद झाला. जवळजवळ धावतच येऊन बाबांना विचारायला लागला "केस्से पेच्चान्नाsss?"जरी एकदा आमच्या घरी येऊन गेला असला तरी आम्हा सगळ्यांशी त्याचा परिचय नव्हता.मग मात्र या प्रसंगानंतर त्याची आमच्या घराशी ओळख झाली.


          त्याला बिदागीत मिळालेले नारळ,फणस घेऊन तो आमच्याकडे विकायला येऊ लागला. ते ठेवण्यासाठी त्याच्याकडे माडाच्या खोडाच्या एका भागापासून बनवलेली एक छोटीशी सुरेख टोपली होती. तिला दोरखंडाचे बंध होते. नारळविक्रीचे त्याचे एक तंत्र होते. आधी घरी येऊन "अम्माsss नारियल मंगता ?" असं विचारून, किती हवे आहेत ते लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी तितकेच नारळ घेऊन यायचा. नारळाचा दर दुकानातल्या दरापेक्षा कमी असला तरी नारळाचे आकार मात्र वेगवेगळे असायचे. मोठ्या नारळाची आणि अगदीच लहान नारळाची किंमत एकच. (लहान म्हणजे देवळांच्या बाहेर फूलवाल्यांकडून देवाला अर्पण करण्यासाठी मिळतात त्या 'मायक्रो' आकाराचे.) त्याला दर वाढव पण असे लहान नारळ नकोत असं कितीतरी वेळा जरी माझ्या आजीने सांगितलं असलं तरी दोराईस्वामी "न्येक्स्ट टायम बराबर लायेगा" सांगून पुढच्या वेळी पुन्हा हीच चूक न चुकता करीत असे.


          आमच्या सोसायटीत एकदा एक पेच निर्माण झाला होता.एक झाड अस्ताव्यस्त वाढले होते. पावसाळा अगदी तोंडावर आला होता. त्या झाडामुळे इमारतीला धोका निर्माण झाला होता. ते झाड तोडायचे ठरले. पण ज्यांना म्हणून बोलावले त्या सगळ्यांनी झाड तोडायला नकार दिला. कारण झाड तोडताना ते इमारतीवर तरी पडेल किंवा संरक्षक भिंतीवर (कंपाउण्ड वॉल) तरी पडेल आणि भिंत तुटेल. आता हा प्रश्न कसा सोडवायचा याच्या चिंतेत सोसायटीची कार्यकारी मंडळी पडली. इतक्यात कोणीतरी दोराईस्वामीला बोलवा असे सुचविले. दोराईस्वामी आले. झाडाची व्यवस्थित पाहणी केली आणि कामगिरी फत्ते करण्याची जवाबदारी अंगावर घेतली. ही कामगिरी पाहायला सोसायटीतली बरीच मंडळी उपस्थित होती. सोबतीला एक माणूस आणून दोराईस्वामीने कामाला सुरुवात केली. झाडाला दोन तीन दोरखंडानी वेगवेगळ्या दिशांना बांधले आणि एक दोरखंड झाडाला बांधून त्या माणसाच्या हाती देऊन त्याला झाड विशिष्ट प्रकारे खेचायला सांगितले. त्याने स्वतः त्या झाडावर एक ठराविक कोनातच अशा काही रितीने घाव घातले की झाड ना अलीकडे ना पलीकडे बरोबर मधल्या अंगणात पडले. दोराईस्वामीचा एक वेगळाच पैलू सर्वांसमोर आला. सगळ्यांनी त्याचे कौतुक केले. त्यामुळे दोराईस्वामीचे अक्षरशः लाजून पाणीच झाले.


         एका दुपारी पोस्टात काही कामासाठी गेले असताना हा मला मनिऑर्डरच्या रांगेत दिसला. हातातल्या नोटा पुन्हाःपुन्हा मोजण्यात मग्न झाला होता. त्याचं मूळ घर आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमेवरच्या कुठल्याश्या खेडेगावात. त्याचं पूर्ण कुटुंबच तिकडे असे. हा एकटाच मुंबईसारख्या दूर ठिकाणी, अपरिचित लोकांत, कुठल्यातरी झोपडपट्टीत राही. नारळ काढणे हाच एकमेव व्यवसाय. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर हा मुंबईसारख्या महागड्या शहरात राहून स्वतःचे आणि गावातल्या कुटुंबीयाचे पोट भरे. या व्यवसायात उंचावर चढणे आवश्यक म्हणजे धोका खूप. पण केवळ पोटासाठी म्हणून हा लीलया उंच उंच माडांवर चढीत असे. कडक उन्हातान्हात काबाडकष्ट करून अल्प उत्पन्नात संसाराचा गाडा ओढून दोराईस्वामी कधीच दुःखी,गांजलेला,पिचलेला दिसला नाही. चेहरा नेहमीच शांत ,अतिशय समाधानी. मुखावर सदा त्याचे ते विलक्षण सुंदर,डोळ्यांतून सांडणारे लोभस हास्य. आपल्या कामातील प्रामाणिकतेने ,नैपुण्याने त्याने हळूहळू सर्वांची मने जिंकली. आता नारळ काढायचं म्हटलं की त्याच्याशिवाय आमच्या परिसरातले पानही ( की झावळी?) हालतं नाही.


-संवादिनी