गदिमाः काही खास 'जागा' (२)

गेल्या लेखात 'गदिमां'च्या काव्यातील काही खास 'जागां'चा शोध घेतला होता व तो 'मनोगतीं'ना आवडला आणि या विषयावर आणखी लिखाणासाठी बराच आग्रह झाला.सर्वश्री नंदन,नरेन्द्र,संजोप,कुमार यांनी त्यांना भावलेल्या 'जाग़ा'बद्दल लिहीले.माझ्याही हाती आणखी काही 'धन' लागले आहे ते इथे देत आहे.

१.गदिमांच्या 'अंगणी गुलमोहर फुलला' ह्या गीतातील पहिल्याच २ ओळी पहा.

  'अंगणी गुलमोहर फुलला' 
   लाल फुलांच्या लिपीतला हा लेख मला कळला.."

  दुसऱ्या ओळीतली कल्पनारम्यता केवळ विलक्षण आहे. एकतर 'लाल फुलांची 
  लीपी' ही कल्पनाच थक्क करणारी आहे वर 'गदिमा' फुलांनी लडबडलेल्या 
  गुलमोहराच्या झाडाला 'या' लीपीतील 'कविता' म्हणत नाहीत,'लेख' म्हणतात.
  कारण कवितेत शब्दांची संख्या तुलनेने कमी असते आणि इथे तर इतकी 
  फुले फुलली आहेत की अण्णांच्या लेखी  हा 'लेख' तयार झाला आहे!
  या दोन ओळीतील काव्यबहराबरोबरच 'ल' च्या अनुप्रासाने 'गदिमा'च्या ह्या 
  काव्यपंक्ती 'सालंकृत' झाल्या आहेत.

२.'रामा रघुनंदना' ह्या शबरीचा श्रीरामाबद्दलचा भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या    
   गीतातही एक सहजसुंदर 'जागा' आहे.शबरी ही साधी आदिवासी स्त्री! या 
   गीतात ती स्वतःला 'दीन रानटी वेडी शबरी' असे म्हणते.या संदर्भात शेवटचे 
   कडवे पाहा.

   ' पतितपावना श्री रघुनाथा'
     एकदाच ये जाता जाता
     पाहीन, पूजिन,टेकीन माथा
     तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
     पुरेपणा जीवना ॥

'गदिमा' नी हा 'पुरेपणा' शब्द सकारण वापरला आहे.ते 'पूर्णत्व, सार्थकता किंवा मोक्ष' यापैकी काहीही लिहू शकले असते. पण शबरीसमान साध्या आदिवासी स्त्रीच्या तोंडी  या काहीश्या जड शब्दांपेक्षा 'पुरेपणा' सारखा साधा तरी सुद्धा नेमकी भावना व्यक्त करणारा शब्द माडगूळकर घालतात.साध्या शबरीसाठी ते तेवढीच सोपी भाषा किंवा सोपे शब्द  (योजनापूर्वक पण सहज वाटणारे) लिहितात.
आशा भोसले ह्यानी हे गीत फार हळुवारपणे,स्निग्ध स्वरात व एक वेगळ्याच आवाजात सादर करून शबरीचा साधा भोळा भक्तिभाव सुंदर प्रकट केला आहे.

पु. ल कुमारगंधर्वाबद्दल लिहिताना म्हणाले आहेत की 'त्यांच्या पुढ्यात स्वर हात जोडून 'हमारे लायक कुछ सेवा' म्हणत उभे असायचे'! 'गदिमां'च्या बाबतीत हेच वाक्य 'स्वर' ऐवजी 'शब्द' एवढा बदल करून तंतोतंत लागू पडते.
हा महाकवी 'मराठी' होता हे आपल्या सर्वांचेच भाग्य!


(जयन्ता५२)