एक (अ) प्रकट मुलाखत (भूत कथा )

(या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत. ती खरी असल्याचा दावा केल्यास ते सिद्ध करण्याची जवाबदारी दावा करणाऱ्याची असेल, लेखकाची नाही. )


महान लोकांचा सहवास कुणाचा उद्धार करीत नाही ? कमळाच्या पानावरील थेंबही मोत्याप्रमाणे भासतो (अर्थातच एक संस्कृत सुभाषित, नाही तर माझ्या मनात कुठले यायला एव्हढे महान विचार !) माणसांच्या लहान-सहान वर्तनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. सूर्यकिरणांची एक तिरीपही सूर्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन देते.महान लोकांच्या चरित्राचा, त्यांच्या जडण-घडणीचा अभ्यास करताना माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या वाचकाला दरवेळी काही तरी नवे गवसतेच. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी एका ठिकाणी म्हंटल्या प्रमाणे शेणाचा गोळा उचलताना तो थोडी तरी माती घेऊनच निघतो. असो, आजपर्यंत आपण अनेक थोर 'माणसांचे' विचार ऐकले असतील आज जरा 'इतरांचेही' विचार ऐकू या.


..................................................


 एक (अ) प्रकट मुलाखत (भूत कथा )


विनंती : कमकुवत याच्या वाचकांनी आवर्जून सहभागी व्हावे ही नम्र विनंती.


मुलाखतकार : नमस्कार मंडळी, आज पौर्णिमा!


आम्ही परत एकदा हजर झालोय 'संचार' घेऊन. या कार्यक्रमात आम्ही आपल्याला अनेक थोर, कर्तृत्वान व विविध क्षेत्रांत संचार करणाऱ्या लोकांचा परिचय करून देत असतो. आज आम्ही आपली ओळख करुन देणार आहोत एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी. एक अशी व्यक्ती, जीने आपल्या आयुष्याची ३५० वर्षे संशोधन, समाजकारण, पाककला, हस्तकला तसेच लेखन या सारख्या अनेक क्षेत्रांत समर्थपणे घालविली. त्यांचा अनेक क्षेत्रांतील, अनेक ठिकाणी असलेला वावर लक्षणीय आहे. तर आपल्याला कल्पना आली असेलच, ही व्यक्ती म्हणजे समस्त भूतयोनीला ललामभूत ठरलेल्या डॉ. भानामती भुतकर! भानामतीताई आपले स्वागत ! नुकत्याच आपल्याला मिळालेल्या 'पिंपळभूषण' पुरस्काराबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.


भानामतीताई : ( खळाळून हसतात(ख. ह.)) नमsस्कार  व धन्यवाद!


मुलाखतकार : तर, प्रथम मी आपल्याला हे विचारु इच्छिते की आपण इतक्या विविध क्षेत्रांत, इतक्या सहजपणे कशा वावरता ?


भानामतीताई : (परत ख. ह.) याला कारणीभूत आहे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी. मी माहेरची भानामती मुंजे, मूळ गाव पिंपळगाव. माझ्या वडीलांनी खुप कष्टांत दिवस काढले. बारा पिंपळांवरती वार लावून, शिकून त्यांनी नाव कमावले. पुढे त्यांच्याबरोबर फिरताना खुप अनुभव घेता आले. जीवनाचे जवळून दर्शन झाले. त्यांच्याबरोबर केलेल्या देशाटनामुळे चातुर्य आले खरे.


मुलाखतकार : निश्चितच, डॉ. वेतोबा मुंजे यांचे बालकुपोषणावरील कार्य समाज कधीही विसरणार नाही.  पण मग आपण संशोधनाकडे कशा वळलात ?


भानामतीताई : बाबांची फार इच्छा होती की मी पी.एच.डी.  करावी म्हणून. मग मीही मनावर घेतले आणि 'पोषणशास्त्रात' पी.एच.डी. केली.


मुलाखतकार : पण पोषणशास्त्रातच का ?


भानामतीताई : याला कारण बाबांच्या बालकुपोषणावरील कार्याची पार्श्वभूमी. लहान मुलांना पोषक असा 'विचित्रान्न' हा पदार्थ मी  शोधला व त्याचे पेटंटही मिळवले. माझ्या पी.एच.डी.चा विषयच मुळी ' पिंपळवाडीतील मुंजांचे कुपोषण : कारणे व उपाय' असा होता. शेवटी जैसी करणी वैसी भरणी. कष्टामुळे मला पेटंटही मिळाले.


मुलाखतकार : हो, हो ! आणि बरं का मंडळी या कार्यक्रमात आपण 'विचित्रान्नाचे' प्रात्यक्षिकही बघणार आहोत आणि ते देखील स्वत: भानामतीताईंकडून.


भानामतीताई : (विनाकारणच ख. ह.)


मुलाखतकार : आपण हस्तकलेतही संशोधन केले आहे. त्याविषयी  जरा सांगता का?


भानामतीताई : हो ना ! त्याचीही गंमतच आहे. मुंजेवाडीतील लहान मुलांसाठी मी खेळणी शोधत होते. सुया टोचलेली काटेरी लिंबे, काळ्या बाहुल्या ही नेहमीचीच खेळणी होती. मी एक आकर्षक झुंबर शोधले. हे झुंबर आपण घराचे दरवाजे, दुकाने, नव्या मोटारी अशा ठिकाणी वापरू शकता.


मुलाखतकार : जरा विस्ताराने सांगाल का ?


भानामतीताई : हो, हो का नाही ? तर हे झुंबर बनविताना आपल्याला हवी आहे एक तार किंवा काळा दोरा, एक मध्यम  आकाराचे लिंबू, चार-पाच हिरव्या मिरच्या , एक बिब्बा किंवा कोळशाचा छोटा तुकडा. आता हे सर्व बिब्बा किंवा कोळशाचा तुकडा, लिंबू व मिरच्या अशा क्रमाने ओवून घ्या. झाले आकर्षक झुंबर तयार ! यामुळे तर अनेकांना रोजगारही मिळाला. तर असे हे समाजाभिमुख संशोधन.


मुलाखतकार : पण हे झुंबर शनिवारीच का बांधतात ? ही अंधश्रध्दा का ?


भानामतीताई : अहो अंधश्रध्दाच आहे ती. तर याचे पेटंटही मी याचमुळे मिळवले होते. आता बघा, बिब्बा, कोळसा या गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वेळखाऊ काम आहे. लिबं-मिरच्या मिळतात! वर कोळशाने हात काळे होतात, हात धुताना वेळ जातो. बिब्बा उतला तर फोड येऊ शकतात. त्यांमुळे वीक-एंडला, निवांत शनिवारी करावे असा प्रोटोकॉल सुचवून मी हे पेटंट घेतले. संशोधनात सर्वंकष विचार महत्वाचा ठरतो.


मुलाखतकार :  अगदी खरंय ! तर काय बच्चेकंपनी, या उन्हाळ्याच्या सुटीत शिबिरांमध्ये शिकणार ना हे झुंबर तयार करायला ? आता आम्हाला आपल्या अंधश्रद्धानिर्मुलनाविषयीच्या कार्याबद्दल सांगता का ?


भानामतीताई : मुळात माझा मनुष्ययोनीवर विश्वास नाही. मी तर असेही ऐकले आहे की, मनुष्य विश्वास ठेवायच्या लायकीचा प्राणीच नाही. अहो पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा विश्वास काय करणार? काही जणांच्या अंगात म्हणे माणूस येतो. हे माणुसकीचे अनुभव वैगरे सारे झूठ आहे.काही जण मला येऊन सांगतात की आम्हाला  अमावस्येला माणूस दिसला. तिकाटण्यावर 'विचित्रान्न' ठेवून गेला वैगरे. मनाने कमकुवत असणाऱ्या लोकांनाच असे माणसांचे भास होतात. अहो माझ्या विचित्रान्नाचे पेटंट चोरून  विक्री करणारे लोकच यामागे आहेत असा माझा आरोप आहे.


मुलाखतकार :  तर भानामतीताई आपण आता प्रेक्षकांना विचित्रान्नाचे प्रात्यक्षिक दाखवू या का ?


भानामतीताई : जरुर ! तर मंडळी, आपल्या ऐपतीप्रमाणे-


मुलाखतकार : ( चटकन) त्यापेक्षा 'गरजेप्रमाणे' म्हणू या का ?


भानामतीताई : हो, हो ! तेच म्हणायचे होते मला. खरे तर समाजकारणात असणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना शब्द फार जपून वापरावे लागतात.तर मंडळी, आपल्या गरजेप्रमाणे पाव ते अर्धा किलो भात शिजवून तो पत्रावळीवर गोलाकार मोकळा पसरवावा. त्यावर दोन- तीन उभी चिरलेली लिंबे टाकावीत. नंतर थोडे उडीद टाकावेत. उडीद तब्येतीला चांगले, कडधान्ये खाण्यात असावीत. लिंबांमुळे विटॅमिन 'सी' मिळते ते वेगळेच. आता थोडीशी सजावट! आता या भातावर थोडा गुलाल व बुक्का टाकावा. झाला विचित्रान्न पदार्थ तयार ! हा पदार्थ आपण कुठेही खाऊ शकता.


मुलाखतकार : पण काळे- पांढरे, पिवळे-लाल या कॉन्ट्रास्ट रंगामुळे विचित्र नाही का दिसणार ?


भानामतीताई : अहो म्हणून तर मी समर्पक नाव दिलेय ना 'विचित्रान्न !'


मुलाखतकार : अरे व्वा ! खरेच की. तर काय मंडळी करुन बघणार ना, ही नवी डीश ? भानामतीताई, धन्यवाद! आता आपण आपल्या समाजकार्याविषयी थोडेसे बोलू या-


भानामतीताई : आयुष्याची ३५० वर्षे जाऊनही आपल्या समाजातील न सुटणारे प्रश्न कधी-कधी मला अगदी निराश करतात. काही लोकांनी तर काल्पनिक मनुष्ययोनीतील स्त्रियांना हिणवताना हडळ, चेटकीण अशा संज्ञा सांगितल्या आहेत. मी तर तो समस्त भूत-स्त्रियांचा अपमानच समजते. ब्रम्हसंमंध, आग्यावेताळ यासारख्या मूठभर लोकांच्या हातात  सत्ता एकवटली गेली आहे. 'बारा पिंपळावरचे' म्हणून मुंजा समाजाची संभावना करताना त्यांच्या भटक्या जीवनाकडे लोक गांभीर्याने पहात नाहीत. याविषयी कार्य करायचे आहे. अमावस्या, पौर्णिमेला होणारे मनुष्यभास, माणुसकी, मारुती-राम यांविषयीची लोकांच्या मनातील भीती असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहेत. बघू या कसे जमते ते !


मुलाखतकार : भानामतीताई एक सर्जनशील लेखिका, कवयित्री व कादंबरीकार म्हणुनही आपला लौकीक आहे. बालपणी,शाळेत असताना 'काल-भारतीच्या' पाठ्यपुस्तकात आम्हाला आपली संदेशपर 'जागा होई ' ही कविता होती. आजही त्या कवितेच्या ओळी आमच्या पिढीतील लोकांच्या ओठांवर आहेत,


'जागा होई भूता आता


जाण जगाची ही करणी


भुलू नको रे या दुनियेला


प्रेम दावी जी वरकरणी'


विविध क्षेत्रांतील अनुभवांच्या, कार्याच्या अनुषंगाने आपण विपुल लेखन केले आहे.


आपल्या लेखनप्रवासाविषयी थोडे सांगा ना ! 


भानामतीताई ( नको तेव्हढे ख. ह.)  : मला लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. लेखन करताना एखादा नवा विचार मांडावा किंवा निखळ आनंदाची निर्मिती करावी हीच माझी भूमिका होती. सध्या 'भूतचेष्टा' प्रकाशनातर्फे माझी ' चिंचबन' ही कादंबरी व 'या पिंपळावर' हा काव्यसंग्रह प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. चिंचेवरील भूतांच्या  समस्यांचा मागोवा घेणारी सामाजिक आशयाची कादंबरी म्हणजे 'चिंचबन'. तर कवितांमध्ये स्त्री-जीवनाविषयीचे मुक्त चिंतन .


मुलाखतकार : एखादी कविता म्हणाना आमच्या प्रेक्षकांसाठी-


भानामतीताई ( आता फारच ख. ह.): अम ss......हं ! शीर्षक कविताच म्हणते. या ठिकाणी मी 'पिंपळ' हे स्त्रीच्या हक्काचे मुक्त प्रांगण, व्यासपीठ मानले आहे. तर सादर आहे कविता 'या पिं..प ..ळा..व.. र' !  


'सखे स्वत:ला सावर गं


इथे तिथे तू वावर गं


मुक्त साऱ्या भटकू या


या पिंपळावर लटकू या



दिवस सरले दास्याचे


दिवस आले हास्याचे


या रुढींतून सटकू या


या पिंपळावर लटकू या


चला सख्यांनो भेटू या


न्यायास्तव मग पेटू या


अन्यायाला हटकू या


या पिंपळावर लटकू या


धन्यवाद !


 मुलाखतकार : वाsवाs वा ! भानामतीताई स्त्रीजीवनाविषयीच्या चिंतनाचे प्रत्यकारी दर्शन घडवणारी ही कविता ऐकवल्याबद्दल अनेक आभार! भानामतीताई, आमच्या समस्त स्त्री-प्रेक्षकांतर्फे मी आपल्याला खात्री देते की, आधुनिक काळातील प्रत्येक मुक्त स्त्री या पिंपळाला लटकल्याशिवाय रहाणार नाही ! आज आपण वेळात वेळ काढून आमच्या या पडक्या विहिरीवर आलात, आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या याबद्दल मी अति-दूरदर्शनच्या युगानुयुगे वाहिनीतर्फे तसेच संचारच्या टिमतर्फे आपले आभार मानते धन्यवाद !!


भानामतीताई:  आपलेही आभार, धन्यवाद !


मुलाखतकार : तर मंडळी आमचा पत्ता आपल्याकडे आहेच. या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरुर कळवा. तर भेटू या पुढच्या पौर्णिमेला नवा 'संचार' घेऊन तो पर्यंत नमsस्कार !