धरतीचा साज

धरतीचा साज


घन हे आले गरजत बरसत
गंध मनाचा खुलवित फुलवित


धरती आतुर, प्रणयी थरथर
मीलनास त्या साक्षी परिसर
अवखळ वारा छेडित जातो
सूर आगळे लहरत विहरत
घन हे आले...............


मैफ़िलीत पाचूच्या हिरव्या
पदन्यास हा सौदामिनीचा
लयीत सरींच्या संगे रिमझिम
पर्जन्याचा नाद अनाहत
घन हे आले.............


पखरण चैतन्याची अनिमिष
आसमंत मग रंगीत गंधीत
वेदीवरती धरा ऊभी ही
नवा लेऊनी साज सलज्जीत
घन हे आले...........


हया माझ्या कवितेला संगीतबद्ध केलंय विवेक काजरेकरांनी आणि गायलंय सुरेश वाडकरांनी.  अल्बमचं नाव आहे"स्पर्श चांदण्याचे".