शब्दांचे लोभसवाणे डाव कुणाला कळले
नजरेच्या फटकाऱ्याचे घाव कुणाला कळले
जखमांच्या धनराशींवर लोळत पडलो होतो
पण कृपावंत दात्यांचे नाव कुणाला कळले
मागाया जाऊ कोठे दोन शब्द प्रेमाचे
संतांच्या वाणीमधले भाव कुणाला कळले
हास्याच्या कारंज्याची आतिषबाजी दिसली
ह्रदयातिल हलाहलाचे ठाव कुणाला कळले
ह्या सोप्या कविता माझ्या सहज समजले सारे
जे भरले अश्रुंनी ते ताव कुणाला कळले