पाऊस

चोहीकडे रणरणते ऊन. क्षौर केलेले डोंगर. आटलेली तळी. नगरपालिकेच्या नळावर चालणारा भांडणाचा परवचा. तेथेच नीरव दुपारी तहान शमवणारे पक्षी. केवळ एक पाऊस हे चित्र बदलतो. ऊन सौम्य होतं. डोंगरांना पालवी फुटते. तळी तृप्तीने फुगताता. भांडणाचे विषय बदलतात. पक्षी घरटी बांधु लागतात. जीव सुखावतो. गांवकरी वा शहरी, कुठल्याही व्यक्तीला तो प्रिय असतो. ऊन्हाळ्याचे धाकटे भावंड असल्याने त्याचे अधिक कोडकौतुक होते हे तर खरेच. पण, जर हिवाळ्यानंतर पावसाळा आला असता तर चातकाने तितकीच वाट पाहीली असती काय? सांगणे अवघड आहे. एखादा कुशल चित्रकार कागदावर केवळ रंग फेकुन सुंदर चित्र बनवतो तसा पाऊस सर्वत्र टवटवीतपणा भरतो.


एस्किमोंच्या भाषेत हिमवर्णनात्मक ३०० प्रकारचे शब्द आहेत. तसा मायमराठीत पाऊस खोलवर रूजलाय. लक्ष्मी प्रसन्न असणा-यांवर पैशाचा पाऊस पडतो. कधी-काळी सचिन धावांचा पाऊस पाडत असे; तो पावसाळा पुन्हा सुरू व्हावा अशी अनेक चाहते वाट पाहतात. गायक स्वरांचा तर दहावी-बारावीचे विद्यार्थी गुणांचा पाऊस पाडतात. नेमेची येणारा पावसाळा प्रतिवर्षी शहरात बहुविध तळी निर्माण करतो. नयनांतल्या अश्रुधारा ते सौदामिनीसवे धरित्रीवर उतरणा-या जलधारांवर कवींनी अनेक पावसांच्या थेंबाहुन अधिक शाई वाहीलेली आहे. हा आकाशाचा हुंकार तसेच रौद्ररूपही आहे.


भरदिवसा रात्रीचे दर्शन दुस-या कुठल्या ऋतुत होते? ऊन-पावसाच्या खेळात रंगांचा दंगा चालतो. जेथे अक्ष रमतात ते अक्षर असे एक वचन आहे. पाऊस म्हणजे अक्षांचा विसावा आहे. तशीच प्रेरणाही आहे. इंद्रधनुच्या या जनकाचे आणि वा-याचे विशेष अनुबंध आहेत. हे दोघे सूर्याचे किरण आपल्या ओंजळीत झाकुन तृर्षात डोळ्यांत आशेचे किरण जागवतांत. पण, कधी यांची क्रिडा तोंडचे पाणीही पळवते. कधी गारांनी भुई धोपटावी तर कधी नुसताच गडगडाट करावा. क्वचित अभिषेकाची धार धरावी. अशा लहरी दाखवतांत. विज्ञानाच्या सहाय्याने मनुष्य चंद्रावर पाऊल ठेवुन आला. तसा, ज्या दिवशी कुठल्याही प्रदेशात हुकमी पाऊस पाडेल त्या दिवशी ख-या अर्थाने निसर्गास जिंकेल.


पावसाचा उल्लेख केल्यावर मेघदूताचा विषय ओघानेच येतो. कालिदासाची उक्ती सर्वश्रुतच आहे -


तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।


चेरापूंजीला संतत पाऊस पडतो. तसा हा शब्दांचा पाऊस केव्हा थांबतो याची तुम्ही वाट पाहण्याआधीच लेखणी आवरतो.


ता.क. हा लेख वर्षभरापूर्वी लिहिला तेव्हा मेघदूतचा अनुवाद करण्याचा संकल्प क्षितिजावरही नव्हता. संग्रह चाळतांना सहज दिसला म्हणुन पुण्यात नुकतेच पडलेल्या पावसाचे औचित्य साधून येथे द्यायची इच्छा झाली.