पदरव

फ़ार पूर्वी वाचलेल्या एका कथेचा स्वैर अनुवाद -


गर्द वनराईमधून डोंगरांच्या वळणावळणाने जाणारी ती रेल्वेलाईन होती. छोटी पिंकी आईबरोबर रेल्वेरूळावरून चालली होती. काखोटीला तिची लाडकी चिंध्यांची बाहुली होती. मामाच्या घरून निघताना त्याने  दिलेले वचन आठवून ती मनोमन खूष होत होती. त्याच्या मांजरीला लवकरच पिल्ले होणार होती आणि तिला त्यातले पाहिजे ते निवडता येणार होते. शिवाय मामीला चिमुकले बाळसुद्धा होणार होते.


"पिंकी, भराभर चल. तो बघ सूर्य बुडाला सुद्धा ! नेमका आपल्या नेहमीच्या रस्त्याला पावसामुळे चिखल झाला आहे म्हणून इकडून जावं लागतंय."


पिंकी भराभर पाय उचलू लागली. खरं तर मामा कित्ती आग्रह करत होता की इतक्या उशीरा परत जाऊ नका, आजची रात्र रहा म्हणून ! पण मग घरी बाबा आणि दादा त्यांची वाट पहात राहिले असते म्हणून आई म्हणाली की उशीर झाला तरी गेले पाहिजे.


"अरे भाऊ, पायाखालचा तर रस्ता आहे. माहित आहे आज अमावास्या आहे आणि चांदणे नसणार आहे. पण माझ्याकडे कंदील आहे ना तू दिलेला!"


"तुझा हट्ट्च असेल तर ठीक आहे ताई, पण काळजीपूर्वक जा."


अजून पहिले वळणसुद्धा यायचे होते आणि पिंकीला आत्ताच दमल्यासारखे वाटत होते. आईच्या ते लक्षात आले.


"शहाणी माझी सोनू ती. वळणावरच्या कठड्यावर थोडा वेळ बसू या. थोडंच राहिलं आता !"


बसल्यावर पिंकीची कळी खुलली . घरी गेल्यावर दादाला सांगायच्या गंमतीजंमतींची उजळणी करून झाली. आता संधिप्रकाशसुद्धा नाहीसा झाला होता आणि काळोखाचं साम्राज्य होतं. मधूनच एखादी कोल्हेकुई नाहीतर घुबडाचं ओरडणं ऐकू येत होतं, तेवढीच काय ती जाग !


"आई, इथे कोणी नाहीये तरी देव आहे ना गं?" पिंकीने निरागसपणे विचारले.


"होय बेटा, देव सगळीकडे असतो आणि आपलं रक्षण करत असतो."


पिंकीचे समाधान झाले आणि ती तिची आवडती कविता गुणगुणू लागली.


इतक्यात लांबून कोणाच्यातरी पावलांचा आवाज येऊ लागला. कोणीतरी येत होतं. ठक ठक ठक जाडजूड बूट वाजवत. पिंकीने आईकडे पाहिलं. आई तिच्याच विचारांमधे गर्क होती. ती सहजपणाने म्हणाली , "हं, झाली का विश्रांती बाईसाहेब? निघू या का?"


"आई, पाठीमागून कोण येतंय गं?"


"कुठे कोण आहे? आपण दोघीच तर आहोत !"असे म्हणून आईने हातातला कंदील मागे फ़िरवला.


"पाहिलंस? कोणी नाहीये ना? भित्री भागूबाई कुठली !"


पिंकीचं पूर्ण समाधान झालं नाही पण ती आईबरोबर पुढे चालू लागली. हळूहळू पावलांचा आवाज जवळ येऊ लागला. पिंकीने आईकडे पाहिलं, तो आवाज आईला ऐकू येत नाहीये?


"आई गं, खरंच कोणीतरी येतंय गं !"


"कमाल आहे पिंकी तुझी ! अगं कुठल्यातरी गोष्टी वाचत बसतेस आणि घाबरतेस ! हे बघ कोणी नाहीये मागे. " आईने पुन्हा कंदील मागे फ़िरवला.


आता त्यांची पावलं झपझप पडत होती. घरी पोचायची ओढ आणि चालून झालेली दमणूक यामुळे पिंकी गप्प होती. पावलांचा आवाज आणखी जवळ आला होता.


आता शेवटचं वळण आणि मग लगेच त्यांच्या घराकडे जाणारी पायवाट !


पिंकीला पुन्हा उत्साह वाटू लागला. आता मोत्याच्या भुंकण्याचा आवाजसुद्धा येऊ लागला.  पायवाट आता अगदी टप्प्यात आली आणि पाठीमागचा आवाजही जास्त ठळक झाला.


"आई आता आवाज जास्त जोरात येतोय गं..."


"अगं बघ आता घर सुद्धा आलंय आणि मागे कोणी नाहीये हे बघ !"


आईने कंदील मागे फ़िरवला आणि मोत्याला जोरात हाक मारली.


"मोत्या ! मोत्या ! ये लवकर !"


मोत्या उड्या मारत आला आणि त्याच्याबरोबर धावतच दोघीजणी पायवाट उतरल्या.


घरी जाऊन पिंकी जेव्हा बिछान्यात आडवी झाली तेव्हा ती खूप खूप थकलेली होती. पण आता ती तिच्या घरात सुरक्षित होती.


घराच्या मागच्या बाजूला स्वयंपाकघरात आवरा-आवरीचा आणि आई-बाबांच्या बोलण्याचा आवाज येत होता. अलगद झोप लागता लागता तिला आईचं बोलणं ऐकू आलं...


"अरे पावलांचा आवाज तर मीसुद्धा ऐकला होता पण मीच चलबिचल दाखवली असती तर पिंकीची घाबरगुंडी उडाली असती ! पण तुला सांगते,  आम्ही रूळांवरून पायवाटेवर उतरताना मी शेवटचा कंदील मागे फ़िरवला आणि मला आमचा पाठलाग कोण करत होतं ते दिसलं. तो एक माणूस होता. किंवा माणसाचं शरीर होतं म्हण, डोकं नसलेलं !"