वाद-संवाद

१)
दोन पाने लिहायला वेळ नसतो
मायन्यातच आजकाल पत्र संपवतो
चॅट मात्र तास अन् तास करतो
भावना हळूवारपणे उलगडून दाखवण्यापेक्षा
यादीतील दोन-चार इमोटीकॉन्स् टाकतो
अर्थाच्या छटा, शब्दांचे न्यास...?
छोडो यार, सब बकवास!
रोज फोन, रोज चॅट, रोज इ-मेल
पुन्हा उभारू टॉवर ऑफ बॅबेल
२४/७ संपर्क, ०/३६५ संवाद....
२)
०/३६५ संवाद
फोरमवर मात्र नित्याचा वाद
दुराग्रहांचा बार भरावा
पिंक तयाची टाकून जावे
दहा तोंडाच्या रावणापरी
दहा आयडींनी लावा हजेरी
आग लावावी एका नावाने
दुज्या नावाने तेल ओतावे
कराव्या रुजवाती तिसऱ्या नावाने
बाकी नावांनी टपला माराव्या
नियम एक प्रतिसादासाठी
माझा तो बाळ्या, बाकीची कार्टी
मूळ मुद्द्याला द्यावी बगल
हल्ला करावा लेखकावरी
फाटे फोडावे दहा दिशांनी
ह्यात दिसावी माझी हुशारी
ह. घ्या. ची अंती जोडावी पुस्ती
 क. लो. आ. चे मीठ जखमेवरती
प्रतिहल्ल्याला जेव्हा चढेल रंग
घ्यावे काढून अलगद अंग
"माझ्यापुरता वाद संपला आहे"
असे लिहुनी व्हावे निःसंग
'स्किझोफ्रेनिक्स ऑफ द वर्ल्ड, युनाईट
वुई हॅव नथिंग टू लूज बट अवर मार्बल्स्'