कारण... (एक प्रत्युत्तर)

(प्रेरणा/मूळ संकल्पना/आधार: कविता)


आंघोळीला नाही नाही म्हणणाऱ्या लहान मुलाला आई
करू दे विनवण्या
दाखवूदे आमिषं
चिडवू दे घाणेरडा घाणेरडा म्हणून
किंवा पाहू दे मुलाकडे थंडपणे डोळ्यात पाणी आणून...
एवढं सगळं केल्यानंतर मूल जातंही बऱ्याचदा न्हाणीघरात
तर नाहीही जात कधीकधी

मला जेव्हा मुलाला आंघोळ घालायचीच असते
("बिघडतं काय नाही केली आंघोळ आज तर"
म्हणून देतोही सूट कधीकधी
फारच कंटाळलेला किंवा अर्धवट झोपेत असला तर
पण तो प्रसंग विरळा, आणि तो मुद्दाही वेगळा!)
उचलतो मी सरळ त्याला, असेल तसा
नेतो न्हाणीघरात
ओततो भसाभस चारपाच बादल्या
घासतो साबण खसाखस
अंगाला, आणि डोक्यावरही क्वचित
(त्याच्या आरड्याओरड्याला न जुमानता)
नि करतो मग 'हर गंगे भागीरथी'...

तो जोरदार निषेध नोंदवतो
मानवाला माहीत असलेले
प्रतिकाराचे सगळे प्रयत्नही करून बघतो
मी दाद देत नाही

पण एवढं सगळं होऊनसुद्धा
कामावरून जेव्हा मी घरी येतो
करत असलेलं सगळं सोडून आधी
स्वागताला येतो माझ्या तो धावत धावत...
मुलगा आहे शेवटी तो माझा
नि त्याचा मी बाप आहे!

शब्दांनीच का बरं आडमुठेपणा करावा असा मग
कागदावर उतरायला?
ते शब्द माझे नाहीत
का मीच शब्दांचा नाही?


- टग्या.

(डिस्क्लेमरे [नेहमीचीच]:
१. कवी शिकाऊ आहे.
२. रचना टाकाऊ आहे.
३. हे शिकाऊ कवीचे मनोगत मानावयास हरकत नसावी.
४. या कवितेत [किंवा हे जे काही आहे त्यात] छंदबद्धता नाही [आणि म्हणूनच गेयता नाही]. यात काव्य नाही, याचीही नम्र जाणीव आहे. [थोडक्यात, सर्व आरोप आगाऊ मान्य आहेत.] लेखी गद्य वाक्यांच्या शब्दक्रमामध्ये बदल करून, वाक्ये वाटेल तिथे तोडून उर्वरित भाग दुसऱ्या ओळीवर लिहून सर्व प्रकरण कविता म्हणून खपवून देण्याचा हा एक प्रामाणिक खटाटोप आहे.
५. मूळ कवितेवर ही टीका नाही, अथवा मूळ रचनेचे हे विडंबनही नाही. [असलेच, तर प्रत्युत्तर आहे.] केवळ मूळ रचनेतील काही संकल्पना/शब्द उचलून केलेली ही एक स्वतंत्र रचना [उपरचना म्हणा हवे तर!] आहे.)


(सवलतीची योजना:
ही कविता खपवून घेणाऱ्यास माझी पण गझल: एक रसग्रहण... मोफत!
[त्वरा करा! त्वरा करा!! त्वरा करा!!!])


(उत्तेजनार्थ चढाओढ:
या कवितेतील काव्यगुण शोधून दाखवणाऱ्यास पुढील रविवारी चौपाटीवरील वाळूत खणावयास येण्याचे जाहीर आमंत्रण आहे. गुप्तधन सापडण्याची दाट शक्यता आहे.
- या चढाओढीस आयोजकांची उपस्थिती असणार नाही. कृपया वाट पाहू नये.
- मुंबईबाहेरील स्पर्धकांनी [पुणेकरांनीसुद्धा] स्वखर्चाने मुंबईस यावे, अन्यथा आपापल्या ठिकाणी स्पर्धेसाठी पर्यायी स्थळे शोधून काढावीत. आयोजकांस कशासाठीही जबाबदार धरू नये.)