फुटबॉल विश्वचषक ०६- भाग ३

                    ब्राझील क्रोएशिआ सामना -- एक प्रश्नचिन्ह
        कालच्या ब्राझील विरुध्द क्रोएशिआ सामन्यात ब्राझीलचा क्रोएशिआवर १-० असा विजय. पण सु (दु)र्दैवाने हा विजय म्हणावासा दणदणीत झाला नाही. उलट ब्राझील आणि अर्थातच रोनाल्डोच्या खेळाबद्दल या सामन्याने अनेक प्रश्न निर्माण केले. त्यामुळे या सामन्याबद्दल फुटबॉल प्रेमींच्या मनात मिश्र भावना आहेत. म्हणजे क्रोएशिआच्या खेळाचे कौतुक करावे की ब्राझीलचे स्थान डळमळीत होईल की काय याची काळजी करावी अशी स्थिती.
     
     या खेळात स्टार रोनाल्डो किंवा रोनाल्डीन्हो या दोघांकडून एकही गोल झाला नाही. अर्थातच त्यांचे काम 'कक्का'ने केले आणि मध्यंतराच्या थोडे आधी म्हणजे ४३ व्या मिनीटाला लांबून शॉट मारला तो क्रोएशिआच्या जाळ्यात थडकला आणि जगभरातल्या ब्राझील 'भक्तां'च्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
         


                 क्रोएशिआने उत्तम खेळ करत ब्राझील चे आक्रमण परतवून लावले. त्यांचा गोलकीपर प्लेटीकोसा च्या बचावाची तर स्तुती करावी तेवढी कमीच. शिवाय, मध्यंतरानंतर क्रोएशिआने उत्तम ऍटॅक करत सामना १-१ असा अनिर्णित करायचा अथक प्रयत्न केला. तीन वेळा चेंडू थेट ब्राझील गोलकीपर च्या हातात गेला. यावरून ब्राझील ला टिकाव धरण्यासाठी अजून परिश्रम  घ्यावे लागतील हे सिध्द झाले. 
                पण हा विजय अर्थातच ब्राझील ला तीन गुण देऊन त्याचे पुढच्या फेरीतले स्थान जवळजवळ निश्चित करून गेला (कारण ग्रुप एफ मध्ये त्यांना क्रोएशिआचेच 'आव्हान' होते.) क्रोएशिआला आता नशिब अजमावण्यासाठी ऑस्ट्रेलिआ व जपान शी टक्कर द्यावी लागेल.
               या सामन्यात ६९ व्या मिनीटाला रोनाल्डो ला काढून दुसऱ्या खेळाडूला (रॉबिनो) खेळवण्यात आले. त्यामुळे या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा 'फॉर्म' हा ब्राझील संघापुढे (आणि अर्थात फुटबॉल विश्वाला) पडलेला प्रश्न आहे. 'वजन' वाढल्याचा तर हा परिणाम नाही?..

                          रोनाल्डो विषयी थोडेसे
            इथे रोनाल्डो विषयी थोडे लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण सध्या तरी रोनाल्डो शिवाय फुटबॉल म्हणजे सचिन शिवाय क्रिकेट किंवा लतादीदींशिवाय चित्रपट गीते.

            
              सर्वोत्कृष्ट 'स्ट्रायकर्स' मध्ये गणना
              वयाच्या १७ व्या वर्षी पासून राष्ट्रीय खेळात सहभाग
              एकूण आंतरराष्ट्रीय गोल्स - ५९.
              तीन वेळा वर्ल्ड कप प्लेअर ऑफ द इयर
              दोन वेळा त्याचा संघ विश्वविजेता.


थोड्याच वेळात जर्मनी विरूध्द पोलंड हा उत्कंठावर्धक सामना खेळला जाणार आहे. हा सामना झाल्यावर त्या पुढील भागात इतर सामन्यांकडे वळू या.

--मेघदूत.