टर्मिनेटर सीड (भाग - ४)

सतीश सुन्न झाला होता.  रचनाच्या बागेत सतीशनं बघितलेला त्या सुंदर पक्षाचा आणि सरड्याचा अनाकलनीय मृत्यू, रचनाचं विचित्र वागणं, स्वतःला सतीशपासून अलिप्त ठेवणं आणि तिच्या स्पर्शानं कोमेजून गेलेली गुलाबाची फुलं... या साऱ्या घटना आणि संगीताच्या तालावर नाचणाऱ्या दिव्यांप्रमाणे क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावनांचा असा खेळ तो आयुष्यात प्रथमच अनुभवत होता.  त्याच्या मनःशक्तीला न पेलवणारा तो खेळ होता.  या आघातांनी तो दुबळा बनत चालला होता. 


इतक्यात पुन्हा ताजीतवानी होऊन रचना बाहेर आली.  सतीशच्या मनाचा पुरता उडालेला गोंधळ रचनानं ओळखला. 


"सतीश... आय ऍम सॉरी..." रचनानं हळूवारपणे म्हटलं.


"रचना... मला...मला... अं ... काही गोष्टी तुझ्याशी स्पष्टपणे बोलायच्या आहेत."


"सतीश तुझ्या डोक्यात काय काय विचार असतील याची मला कल्पना आहे.  पण सतीश माझं एक ऐकशील?"


"हं.."


"आजचा दिवस फक्त जाऊ दे.  आज माझा वाढदिवस आहे नं? आज त्यामुळे आपण नुसत्या गप्पा मारू.  आणखी कशाला मूड खराब करायचा? अं ? उद्या संध्याकाळी आपण अगदी सखोल चर्चा करू.  तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी अगदी सविस्तर उत्तरं तुला देईन.  सतीश, खरं सांगते, मला तुझ्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही. "


"खरं रचना?"


"खरं रे... तुझ्यापेक्षा जास्त कुठलीच गोष्ट या जगात मला महत्त्वाची नाही.  पण ... प्लीज फक्त आजचा दिवस जाऊ दे..."


"ठीक आहे... रचना.." सतीशनं कसाबसा त्याच्या विचारमंथनावर पडदा टाकायचा प्रयत्न केला.  तरीही गप्पांमधे त्याचं मन रमेना.


सतीश खोलीवर आला.  पण त्याला काहीच करायची इच्छा नव्हती.  सुन्नपणे विचार करत तो बसून राहिला.  विचारचक्र पुन्हा एकदा अतिप्रचंड वेगानं फिरायला लागलं.  डोकं दुखायला लागलं.  तो फारशा कधी सिगारेट ओढायचा नाही, पण त्यानं एक सिगारेट शिलगावली.  एका सिगारेटनं काहीच फरक वाटेना त्यामुळे एका पाठोपाठ एक त्यानं तीन सिगारेट ओढल्या. खोलीत सिगारेटच्या धुराची दाटी झाली.  साठ वॉटच्या दिव्याचा पिवळा प्रकाश अन कोंदटलेल्या धुराचं घाण मिश्रण तयार झालं.  ते अंगावर धावून यायला लागलं.  त्यानं डोकं अधिकच ठणकायला लागलं.  मोठमोठ्यांदा ओरडून रडावं, असं सतीशला वाटायला लागलं. संपूर्ण रात्रभर तो तसाच भकास बसून राहिला. 


रचनाचा हात लागताच ज्या शक्तीमुळे गुलाबाची फुलं मरगळून गेली होती, त्या अदृश्य शक्तीची सतीशला भीती वाटायला लागली होती. रचनानं अगदी कणाकणानं सतीशच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतला होता.  एक प्रकारचं विषच साऱ्या मनःसंस्थेत सोडलं होतं.  ते प्रेम होतं की तिच्या स्वर्गीय सौंदर्याबद्दलचं आकर्षण होतं?  आणि त्या काळ्या अदृश्य शक्तीबद्दल त्याला खरंच भीती वाटत होती? कुणास ठावूक. पण एक गोष्ट मात्र नक्कीच.  ते प्रेम आणि ती भीती दोन्हीचंही बीज सतीशच्या मनःसंस्थेत तिनं सोडलेल्या विषात होतं.  सतीशला कशाची भीती वाटत होती हेही नक्की कळत नव्हतं किंवा त्याच्या मनात असलेल्या आशेचंही नीटसं आकलन होत नहतं.  आशा आणि भीती यांचं घनघोर युध्द त्याच्या हृदयात उसळलं होतं.  त्यात दोघंही एकमेकांचा पराजय करत होते आणि पुन्हा पहिल्यापासून सुरवात करत होते.  हे भयंकर होतं... सहन करणं अशक्य होतं.


सकाळी आंघोळ वगैरे उरकून सतीश युनिव्हर्सिटीत गेला.  रात्रभरच्या जागरणानं त्याचे डोळे सुजले होते, चेहरा भकास दिसत होता.


"सतीश तब्येत ठीक आहे ना तुझी? चेहरा असा का दिसतोय?" सरांनी त्याची अवस्था बघून विचारलं.


"काही नाही सर..." सतीशनं कसंबसं उत्तर दिलं.


"काही नाही काय? तुझा चेहरा बघ.  काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?" सरांनी काळजीनं विचारलं.  माणसाचं मन अशा वेळेला एवढं मृदू होतं की घातलेल्या हलक्या फुंकरीनं सुध्दा भडभडून येतं. सतीशचंही तसच झालं आणि तो सरळ ओक्साबोक्शी रडायला लागला.


"सतीश काय झालं? मला सांग तरी... " सरांना सतीशची काळजी वाटायला लागली.  रडण्याचा आवेग ओसरला.  सतीश थोडा शांत झाला.  सरांनी त्याला ग्लासभर थंडगार पाणी प्यायला दिलं. 


"सर, खरं तर... सुरवातीलाच तुम्ही मला रचनापासून दूर रहायला सांगितलं होतं, पण मी तुमचं ऐकलं नाही..." सतीश.


"ओssह!" सरांना कल्पनाच नव्हती की हे असं काहीतरी असेल.  "ठीक आहे. पण काय घडलंय ते सारं काही नीट सांग पाहू.  काहीही लपवून ठेवू नकोस. " सरांच्या आवाजात आज्ञा होती.  सतीशनं कुठलाही आडपडदा न ठेवता अथ पासून इति पर्यंत सारं काही सरांना सांगितलं.  पूर्ण लक्ष देऊन अगदी बारिक सारिक विशेषांसहित सरांनी सारं काही ऐकलं. 


"हं... " अगदी खोल आवाजात सरांनी हुंकार दिला.  काही क्षण नीरव शांततेत गेले आणि मग मनात काही विशिष्ट आखणी केल्यागत सरांनी बोलायला सुरवात केली. 


"सतीश मला असं वाटतं की या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी तुला आता समजणं आवश्यक आहे.  साधारणपणे वीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.  मोझेन्टो केमिकल कंपनीनं आमच्या युनिव्हर्सिटीला संशोधनासाठी एक प्रकल्प दिला.  त्यांना वनस्पतीचं अशा प्रकारचं बीज तयार करून हवं होतं की ज्यापासून मानवानं स्वप्नातच फक्त बघितल्या असतील अशा प्रकारच्या वनस्पती तयार व्हाव्यात.  त्या वनस्पतींची पानं, फळं, फुलं इतकी सुंदर असतील की निसर्गानं सुध्दा आश्चर्यानं तोंडात बोटं घातली पाहिजेत.  त्यांची वाढ निकोप आणि वेगवान असली पाहिजे.  कुठल्याही प्रकारची कीड रोग या वनस्पतींसमोर टिकावच धरू शकता कामा नयेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतींच्या फळातून तयार होणाऱ्या बीजात पुनरुत्पादनाची क्षमता असता कामा नये.  मोझेन्टोचा आडाखा होता की अशा बियाण्यांच्या उत्पादनानं जागतिक बाजारपेठेवर ते पूर्ण कब्जा करू शकतील.  त्यामुळे या संशोधनासाठी कोट्यावधी रुपयांची बिदागी त्यांनी युनिव्हर्सिटीला देऊ केली.  जागतिक पर्यावरण, पर्यावरण संतुलन वगैरे असल्या गोष्टींचा विचार न करता युनिव्हर्सिटीनं कोट्यावधी रुपयांच्या देणगीसमोर मान तुकवली.  युनिव्हर्सिटीनं हे संशोधन करण्याचं स्वीकारलं आणि आपल्या डिपार्टमेंट्वर ती कामगिरी सोपवली.  चॅटर्जी त्यावेळेस डिपार्टमेंटचा एचोडी होता.  चॅटर्जी, मी आणि आमचे आणखी तीन सहकारी, आम्ही सगळ्यांनी मिळून हे संशोधन सुरू केलं." सर एकाग्रतेनं बोलत होते.


वनस्पतींच्या जीन्समध्ये विशिष्ट प्रकारचे बदल करायचे आणि त्यांच्या डीएनएमध्ये अशा प्रकारच्या जीन्सचं रोपण करायचं की ज्यामुळे त्या वनस्पतीला मोझेन्टोला अभिप्रेत असलेले गुणधर्म प्राप्त होतील.  अशा प्रकारचं हे संशोधन होतं.  म्हणजे थोडक्यात जेनेटीकली एंजीनीयर्ड सीड तयार करायचं.  दोन वर्षांच्या खडतर परिश्रमांनंतर आम्ही आमच्या साध्याच्या खूपच जवळ जाऊन पोहोचलो.  परंतु आमच्या असं लक्षात आलं की रोग आणि किडीला प्रतीकार करू शकणाऱ्या या वनस्पती एवढ्या जहाल विषारी होतील की रोग आणि कीटकच काय, पण प्राणी पक्षी एवढंच नाही तर मानव जातीसाठीही त्या घातक ठरू शकतील.  त्यांच्यातलं हरीतद्रव्य म्हणजे विषद्रव्य असेल.  त्यामुळे या हरितद्रव्याचा एखादा थेंबही हातावर पडला, तर हाताच्या साऱ्या पेशी मृत होतील." सतीश अवाक होऊन हे सारं ऐकत होता. 


"त्यामुळेच हे संशोधन मानवजातीच्या कल्याणासाठी नसून उलट मानवजातीचा ऱ्हास करणारं ठरु शकेल, असा निष्कर्ष काढून आम्ही हे संशोधन बंद करून टाकलं आणि मोझेन्टोला तसं कळवलं सुध्दा. परंतु चॅटर्जीनं मात्र गुप्तपणे मोझेन्टोबरोबर पत्रव्यवहार चालू ठेवला.  त्यानं मोझेन्टोला असं सांगितलं की त्यांना अपेक्षित असलेलं बीज तर तो तयार करेलच, परंतु मानवाच्या जीन्समधेही फेरफार करून तो अशी मानवजात तयार करू शकेल जिला या जेनेटिकली एंजीनीयर्ड वनस्पतींपासून कुठलाही धोका नसेल.  हे सारं महाभयंकर होतं, पण बाजारपेठेवर वर्चस्व मिळायला उतावीळ झालेल्या मोझेन्टोनं त्याचा प्रस्ताव स्विकारला अन संशोधनासाठी सारी मदत आणि प्रचंड मोठी रक्कम मोझेन्टोनं त्याला दिली.  आम्हाला या साऱ्याचा सुगावा लागला.  चॅटर्जीचं मन वळविण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण सारं व्यर्थ गेलं.  आम्ही युनिव्हर्सिटीकडे तक्रार केली आणि चॅटर्जीला युनिव्हर्सिटी सोडवी लागली." सर अखंड बोलत होते.


- क्रमशः