.. आणि मी पैज जिंकली !

माझे जुने मेल्स चाळताना हा मेल सापडला आणि आमच्या पत्रकट्यातल्या या लाजऱ्या दोस्ताचं हे दिलखुलास मनोगत इथे सर्वांसमोर ठेवावंसं वाटलं, म्हणून हा लेखप्रपंच. त्याने केलेले अनुभवकथन जसेच्या तसे इथे लिहित आहे ( काळ्या अक्षरात लिहिलेला सर्व भाग 'चिंटूच्या काका'ने लिहिलेला आहे ). हा उपद्व्याप करण्याआधी त्याची पूर्वपरवानगी घेतलेली नाही .. पण तो आक्षेप घेईल असं वाटत नाही. चिंटूचे काका चु.भू.द्या.घ्या. :D

संदर्भ : मागच्या भागात पाहिल्यानुसार सुप्रसिद्ध काका ( आस्मादिक ! ) आणि त्यांचे थोरले बंधू यांची पैज लागली होती की जर काकाने चिंटूकडून पहिले 'काका' वदवून घेतले तर काका जिंकला आणि जर बाबांनी 'बाबा' वदवून घेतले तर बाबा जिंकले आणि चिंटूची 'आका' पर्यंत प्रगती झाली होती.

चिंटूचे हे 'आका'पुराण खूप दिवस चाललेले. काय करावे काही कळत नव्हते.

"बाळ इथे बघ.. ( बळेबळेच तिची मान माझ्याकडे वळवायचा खटाटोप चाललेला. मान वळवली की.. ) ह्म्म आता म्हण काऽऽका.."
"आऽऽकाऽऽ"
हाच कार्यक्रम १०-१५ वेळेस डोळ्यासमोर आणा बघू.. आणलात का? ओके...

माझे शर्थीचे प्रयत्न चालूच...

"ओके.. फक्त 'का' म्हण बघू.."
"का"
"अरे वा ! छोनुली आमची कित्ती छानी." यावर चिंटूचे एक छानसे स्माईल.
"आता म्हणा परत.. काऽऽऽकाऽऽऽ"
"आऽऽऽकाऽऽऽ"
शक्य तितका शांत आवाज ठेवत ( ही लहान मुले आपल्या सहनशक्तीची हद्द बघतात ) "बाळ हे बघ.. 'आ' वेगळा.. ( आ वेगळा आहे दाखवण्यासाठी डावीकडे मान आणि डावीकडे बोट.) आणि 'का' वेगळा..  ( का साठी उजवीकडे मान आणि उजवीकडे बोट. ) आता कळले ना?" 
परत ४-५ वेळा 'आ' आणि 'का' वेगळा हे दाखवण्याची खटपट.
शेवटी चिंटू होकारार्थी मान हलवते.
हुऽऽश्शऽऽऽऽ ! आता नव्या उमेदीने काका परत चालू..
"मग बाळ आता बोल बरे.. काऽऽऽकाऽऽऽ"
"आऽऽऽकाऽऽऽ"
"हे गजानना आता मी ह्या पोरीचे काय करू?" म्हणून काकांचा कपाळाला हात.

अशी माझी खटपट खूप दिवस चाललेली पण काही यश मिळेना. मी तर इरेलाच पेटलो. अरे असा थोडीच पराभव मानीन. मग विचार केला काहितरी वेगळे करायला हवे पण काय ते सुचेना.

तिला गाण्यात म्हणून दाखवले... "काका सांगा कुणाचे? काका आमच्या चिंटूचे.." उड्या मारून 'काका' म्हणून दाखवले. बाळाला मारतानाही 'काका काका' म्हणून ओरडायचो. पण छे ! काही उपयोग नाही. घरी अध्यादेशच काढला, सर्वांनी मला 'काका' म्हणूनच बोलवायचे. पण छे ! तरीही चिंटू काही बधेना !!!

शेवटी मात्र मी हात टेकले. तिच्यासमोर पांढरे निशाण फडकवले.

या सर्व दिवसात बाईसाहेब 'मामा' म्हणायला लागलेल्या. 'मामा' म्हण सांगितले की 'अमामा' म्हणायची.
मग सुचले. चिंटूला परत जवळ घेऊन बसलो आणि चालू..
"बाळ म्हण पाहू... अमामा.."
"अमामा.."
"वा ! छान हो छान.. आता बाळ 'अकाका' म्हण पाहू.. "
"अकाका.."
"येऽऽऽऽऽ ! जिंकलो ! जिंकलो !! जिंकलो !!! ढिंचँक ढिंचॅक.. काका तो फंडू है रे.. काका तुस्सी टॉप हो.. "
दादा आल्यावर आमच्या जवानाला सांगितले,"बाळ, म्हण बघू 'अकाका' "
"अकाका"
छे ! पण आमचे दादासाहेब मान्यच करेना. म्हणे तिने फक्त 'काका' बोलायला हवे. हे असे नाही चालणार. छे ! पण मी कसला मानतोय? म्हटले 'काका' म्हणाली ना मग झाले पण दादा मानेनाच. मग शेवटी माघार घेतली.

परत दुसऱ्या दिवशीपासून पुर्वीचे प्रयत्न चालू पण यश काही हाती लागेना.

आता तुम्ही म्हणाल.. किती हा आप्पलपोटपणा !! फक्त 'काका'च बोलायला शिकवत होतात ते पण नाही हो त्याचबरोबर इतर गोष्टीही शिकवत होतो,"भू.. भू.. म्याव..म्याव...."
एकदा असाच तिला 'म्याव म्याव' शिकवत होतो.
"बाळ, 'म्याव म्याव' बोल बघू.."
"माऽव ( 'व' अगदीच सायलेंट ! )ऽमा"
"बाळ असे नाही. माझ्याकडे लक्ष दे बघू.. परत बोल.. म्याव म्याव.."
"माऽऽ(व)ऽऽमा.."
छे! पण इतक्या लवकर हार मानेल तो चिंटूचा काका कसला !!!
परत १०-१५ वेळेस हीच गोष्ट नजरेसमोर आणा.
आता मात्र काका पुरते थकलेले.. आणि परत कपाळाला हात लावून बसले. ( स्वतःच्याच होऽऽ ! ) परत विचारचक्र चालू.. काय करावे बुवा काही कळत नाही.

काका विचार करतायत..

~!~!~!~

आजचा भाग संपला.

हेऽऽऽय, इथे तुम्हाला एक प्रश्न. ओळखा पाहू काकाने काय केले असेल आणि चिंटूकडून 'काका' वदवून घेतले असेल.

कलोअ.
चिंटूचा काका.