तात्पर्यकथाः काचेचा पेला

(अनेकांच्या तात्पर्यकथांवरुन स्फूर्ती घेऊनः ही कथा कधीतरी कोणाच्या तरी तोंडून ऐकली आहे. मूळ कोणाची आहे ते माहिती नाही.)


नोकरीसाठी मुलाखत चालू होती. समोर असलेल्या उमेदवारांच्या समूहाला साहेबांनी विचारलेः 'हा माझ्या हातात काचेचा पेला आहे. हा मी फोडला तर किती तुकडे होतील?' 
अनेकांनी अनेक उत्तरे दिली.
कोणी म्हणाले, 'ते पेला किती उंचीवरुन टाकला आणि कोणत्या जमिनीवर टाकला त्यावर अवलंबून आहे.'
कोणी म्हणाले, 'बरोबर २३५ तुकडे होतील.'
कोणी म्हणाले, 'तुकडे होणार नाहीत. पेला अभंग काचेचा आहे.'
कोणी म्हणाले, 'सांगता येत नाही. इनसफिशियंट डाटा.'
कोणी म्हणाले, 'मला एक दिवसाचा वेळ द्या.'
कोणी म्हणाले, 'असंख्य'


एका उमेदवाराने 'मी जरा वेगळ्या प्रकारे उत्तर देऊ का' म्हणून परवानगी घेतली. आणि पेला उचलून जोरात जमिनीवर टाकून दिला. 'बघा, आता खाली आहेत तितके तुकडे होतील.'
हा उमेदवार नोकरीसाठी निवडला गेला.


तात्पर्येः
१. नोकरीच्या मुलाखतीला अभ्यास करण्यात जास्त वेळ घालवू नये. कराव्या लागणाऱ्या कामाचा आणि त्या पदासाठी मुलाखतीत विचारलेल्या असंबद्ध प्रश्नांचा बऱ्याचदा कमी संबंध असतो.
२. बसून आणि मिटींगा घेऊन तर्ककुतर्क करण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीत जाऊन प्रश्नाला भिडावे.
३. मुलाखतीच्या ठिकाणी भारी आणि चांगले काचेचे पेले ठेऊ नयेत.
४. दुसऱ्याच्या किंमती चीजवस्तूच्या नुकसानाची पर्वा न करता आपल्याला हवं ते करणारे जगात पुढे जातात.
५. हा प्रयोग पुढच्या वेळी परत हाच प्रश्न विचारुन करु नये. उमेदवार बरेच असतात आणि तितके काचेचे पेले फुटून वाया जाणं परवडत नाही.
६. कचेरीत साफसफाई करणाऱ्या शिपाईवर्गाने आपल्या हक्कांबद्दल सतर्क रहावे. एकदा सफाई केल्यावर कोणी पेला फोडून कचरा केल्यास तो फोडणाऱ्याला स्वच्छ करायला सांगावा.